Breaking News

‘हायपरसॉनिक’ क्षेपणास्त्रांच्या स्पर्धेमुळे नव्या शीतयुद्धाचे संकेत

अमेरिकेतील माजी संरक्षण सल्लागाराचा इशारा

वॉशिंग्टन – जगातील आघाडीच्या देशांमध्ये ‘हायपरसॉनिक’ क्षेपणास्त्रे तयार करण्यासाठी सुरू असलेली स्पर्धा नव्या शीतयुद्धाचे संकेत देणारी असल्याचा इशारा अमेरिकेचे माजी संरक्षणविषयक सल्लागार फिलिप कॉयल यांनी दिला. जगातील विविध देशांची ‘हायपरसॉनिक’ क्षेपणास्त्रांसाठीची तयारी अमेरिकेच्या क्षेपणास्त्रभेदी यंत्रणेला कुचकामी बनविणारी ठरू शकते, असा दावाही कॉयल यांनी केला. त्याचवेळी त्यांनी, या नव्या वेगवान क्षेपणास्त्रांमुळे अण्वस्त्रांचा धोका अधिकच वाढल्याची चिंताही व्यक्त केली आहे.

ब्रिटनच्या एका दैनिकाशी बोलताना अमेरिकेचे माजी संरक्षणविषयक सल्लागार फिलिप कॉयल यांनी, आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘हायपरसॉनिक’ क्षेपणास्त्रांच्या वाढत्या वापराचे संकेत दिले. ‘आंतरखंडीय क्षेपणास्त्रे एखाद्या लक्ष्यावर ३० ते ३५ मिनिटात पोहोचू शकत असतील तर हायपरसॉनिक क्षेपणास्त्रे हाच टप्पा केवळ २० मिनिटात गाठू शकतात. आंतरखंडीय क्षेपणास्त्रे किंवा क्रूझ क्षेपणास्त्रांप्रमाणेच या क्षेपणास्त्रांमध्येही अण्वस्त्रे वाहून नेण्याची क्षमता आहे’, अशा शब्दात कॉयल यांनी हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांच्या धोक्याची जाणीव करून दिली.

हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांमध्ये असणारी आण्विक क्षमता ही सर्वाधिक चिंताजनक गोष्ट असल्याचेही कॉयल यांनी निदर्शनास आणून दिले.

‘हायपरसॉनिक’ क्षेपणास्त्र

अमेरिका, रशिया आणि चीन हे तीन आघाडीचे देश हायपरसॉनिक क्षेपणास्त्र निर्मितीच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचले आहेत. ध्वनीच्या वेगापेक्षा पाच ते दहा पट वेगाने किंवा ताशी पंचवीस हजार किलोमीटर वेगाने प्रवास करणारी ही क्षेपणास्त्रे अमेरिका, रशिया आणि चीनच्या सामर्थ्यात वाढ करणारी असल्याचा दावा केला जातो. शत्रूदेशाची क्षेपणास्त्रे काही सेकंदातच हवेत नष्ट करण्याची क्षमता या क्षेपणास्त्रांमध्ये आहेे.

अमेरिकेनेे ‘एक्स-५१ वेव्हरायडर’ तसेच ‘फॅल्कन’ अशी दोन हायपरसॉनिक क्षेपणास्त्रे विकसित केली असून त्यांच्या चाचण्याही घेण्यात आल्या आहेत. रशियाने ‘केएच-९०’ आणि ‘केएच-८०’ या दोन हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांच्या चाचणीनंतर ‘झिरकॉन’ हे नवे हायपरसॉनिक क्षेपणास्त्र विकसित केले आहे. चीनकडून क्षेपणास्त्रभेदी यंत्रणांना गुंगारा देऊन अमेरिकेच्या विमानवाहू युद्धनौकांना लक्ष्य करण्याची क्षमता असलेलल्या ‘डीएफ-झेडएफ’ हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची निर्मिती सुरू करण्यात आली आहे.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info