तुर्कीकडून अमेरिकेचे पास्टर ब्रुन्सन यांची सुटका-अमेरिका व तुर्कीमधील तणाव निवळल्याचे संकेत

वॉशिंग्टन/अंकारा – तुर्कीच्या ताब्यात असलेले ख्रिस्ती धर्मोपदेशक पास्टर ‘अँड्य्रू ब्रुन्सन’ यांची सुटका झाली आहे. त्यांच्या सुटकेसाठी अमेरिकेकडून तुर्कीवर दडपण टाकण्यात येत होते. यासाठी अमेरिकेने तुर्कीवर कठोर आर्थिक निर्बंधही लादले होते. पास्टर ब्रुन्सन यांच्या सुटकेवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी स्वागत केले. सुटकेचे आदेश मिळाल्यानंतर पास्टर ब्रुन्सन अमेरिकेसाठी रवाना झाले असून त्यांच्या सुटकेमुळे प्रचंड ताणाखाली असलेल्या तुर्कीच्या अर्थव्यवस्थेचीही सुटका होईल, असा दावा काही विश्‍लेषकांनी केला आहे. दरम्यान, तुर्कीच्या ताब्यात असलेल्या इतर अमेरिकन नागरिकांचीही सुटका करण्यात यावी, अशी मागणी अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केली आहे.

पास्टर ब्रुन्सन यांना दोन वर्षांपूर्वी तुर्कीने अटक केली होती. तुर्कीत राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांच्या सरकारविरोधात बंडाच्या कटात ब्रुन्सन यांचा समावेश असल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. बंडखोरांना साथ देण्यासाठी ब्रुन्सन इथे आले होते, असा आरोप तुर्कीच्या यंत्रणा करीत होत्या. मात्र हे आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगून अमेरिकेने ब्रुन्सन यांच्या सुटकेची मागणी केली होती. ही मागणी अमान्य केल्यास तुर्कीला कडक निर्बंधांचा सामना करावा लागेल, असे अमेरिकेने बजावले होते. तुर्कीने हा इशारा धुडकावल्यानंतर अमेरिकेने निर्बंध लादून तुर्कीच्या अर्थव्यवस्थेवरील दबाव प्रचंड प्रमाणात वाढविला होता.

यामुळे पास्टर ब्रुन्सन हे अमेरिका व तुर्कीमधील वादाचे केंद्र बनले होते. अशा परिस्थितीत शनिवारी तुर्कीचे न्यायालय पास्टर ब्रुन्सन यांच्याबाबत कोणता निर्णय देते, याकडे तुर्कीसह प्रमुख देशांचेही लक्ष लागले होते. काही आखाती वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार ब्रुन्सन यांना दोषी ठरवून न्यायालयाने तीन वर्षाहून अधिक काळाची शिक्षा सुनावली. पण या सुनावणीदरम्यान त्यांची चांगली वागणूक पाहता, त्यांच्या सुटकेचे आदेश देण्यात आले. या निर्णयाला फार मोठे राजकीय महत्त्व आले असून पास्टर ब्रुन्सन यांच्या सुटकेमुळे तुर्कीचीही सुटका झाल्याचा दावा या देशातील काही विश्‍लेषकांनी केला आहे.

पुढच्या काळात अमेरिका व तुर्कीमधील संबंध सुरळीत होतील, असे सांगून विश्‍लेषक ब्रुन्सन यांच्या सुटकेला फार मोठे महत्त्व देत आहेत. यामुळे सिरियाची समस्या सोडविण्यासाठी अमेरिका व तुर्की एकजुटीने काम करतील, असा विश्‍वास व्यक्त केला जात आहे. याहून महत्त्वाची बाब म्हणजे मोठ्या प्रमाणात घसरण झालेले तुर्कीचे चलन आता सावरेल, अशी अपेक्षा या देशाच्या जनतेकडून व्यक्त केली जाते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पास्टर ब्रुन्सन यांच्या सुटकेचे स्वागत केले असून लवकरच ते ‘व्हाईट हाऊस’ला भेट देतील, असे म्हटले आहे.

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी पास्टर ब्रुन्सन यांच्या सुटकेचे स्वागत करून तुर्कीसमोर नवी मागणी ठेवली आहे. तुर्कीने आपल्या ताब्यातील अमेरिकन नागरिकांची सुटका करावी, असे पॉम्पिओ यांनी म्हटले आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्रालय आपल्या नागरिकांच्या सुटकेसाठी अशारितीने शर्थीचे प्रयत्न करीत राहणार असल्याचा संदेश यामुळे सार्‍या जगाला मिळाल्याचा दावा परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ यांनी केला आहे.

दरम्यान, अमेरिका व तुर्कीमधील तणाव कमी होऊन या देशांमध्ये पुन्हा सहकार्य प्रस्थापित झाले तर सिरियासह आखातातील समीकरणे पुन्हा एकदा बदलू शकतात. म्हणूनच माध्यमे व विश्‍लेषक पास्टर ब्रुन्सन यांच्या सुटकेकडे अतिशय गांभीर्याने पाहत आहेत.

हिंदी English

 

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info