Breaking News

इस्रायलचे पंतप्रधान नेत्यान्याहू व जॉर्डनचे राजे अब्दुल्ला यांची चर्चा

जेरूसलेम – अमेरिकेने आपला इस्रायलमधील दूतावास जेरूसलेममध्ये हलविला, तर आखाती देशातून त्याचे भयंकर पडसाद उमटतील, अशी धमकी जॉर्डनचे राजे अब्दुल्ला यांनी दिली होती. त्याचवेळी इस्रायलचे गाझापट्टीवरील हल्ले आणि पॅलेस्टिनी निदर्शकांवर कारवाई याच्या विरोधात जॉर्डनने भूमिका घेतली होती. जॉर्डनच्या या भूमिकेत बदल झालेला नसला तरी, जॉर्डनच्या राजधानीत राजे अब्दुल्ला व इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांच्यात झालेली भेट निराळेच संकेत देत आहे. अमेरिकेने या भेटीचे स्वागत केले आहे.

नेत्यान्याहूया भेटीच्या आधी याची माहिती उघड करण्यात आली नव्हती. मात्र सोमवारी ही भेट पार पडल्यानंतर इस्रायलच्या सूत्रांनी याबाबतची माहिती दिली. इस्रायलच्या माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार जॉर्डनची राजधानी अम्मान येथे राजे अब्दुल्ला व इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांच्यात ही भेट पार पडली. यावेळी इस्रायलची गुप्तचर संघटना ‘मोसाद’चे संचालक योसी कोहेन, पंतप्रधानांचे लष्करी सचिव लिझर तोलेदानो आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांचे पथक उपस्थित असल्याचे सांगितले जाते.

पंतप्रधान नेत्यान्याहू आणि राजे अब्दुल्ला यांच्यातील भेटीत आखातातील महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा झाली. यामध्ये गाझापट्टीतील हमासने सुरू केलेली हिंसक निदर्शने तसेच पॅलेस्टिनी राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांच्याबरोबरच्या वाटाघाटीवर चर्चा पार पडल्याची माहिती इस्रायली सूत्रांनी दिली. त्याचबरोबर जेरूसलेममधील धार्मिक स्थळांच्या मुद्यावरही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचा दावा जॉर्डनच्या सरकारी मुखपत्राने केला आहे.

इस्रायल-पॅलेस्टाईन शांतीचर्चेसाठी अमेरिकेने नियुक्त केलेले विशेषदूत जेसन ग्रीनब्लॅट यांनी पंतप्रधान नेत्यान्याहू आणि राजे अब्दुल्ला यांच्यात पार पडलेल्या या बैठकीचे स्वागत केले. आखातातील महत्त्वाच्या घडामोडींबाबत इस्रायल आणि जॉर्डनच्या नेत्यांमध्ये झालेली ही भेट आखातासाठी महत्त्वाची असल्याची प्रतिक्रिया ग्रीनब्लॅट यांनी दिली. याआधीही नेत्यान्याहू आणि राजे अब्दुल्ला यांच्या भेटी झाल्या होत्या. पण इस्रायल-पॅलेस्टाईन शांतीचर्चेच्या निमित्ताने सदर भेटीचे महत्त्व वाढल्याचा दावा अमेरिकेतील माध्यमे करीत आहेत.

दरम्यान, येत्या काही तासात अमेरिकेचे विशेषदूत ग्रीनब्लॅट तसेच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार व जावई जॅरेड कश्‍नर आखाती देशांच्या दौर्‍यावर येत आहेत. इस्रायल-पॅलेस्टाईन शांतीचर्चेचा प्रस्ताव घेऊन कश्‍नर कतार, सौदी अरेबिया, इजिप्त, जॉर्डन आणि इस्रायलचा दौरा करणार आहेत. पण पॅलेस्टिनी राष्ट्राध्यक्ष अब्बास यांनी सदर प्रस्ताव अमान्य असल्याचे याआधीच जाहीर केले आहे.

English   हिंदी

इस समाचार के प्रति अपने विचार एवं अभिप्राय व्यक्त करने के लिए नीचे क्लिक करें:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info