चीन व युरोपने मिळून ट्रम्प यांना धडा शिकवावा

चीन व युरोपने मिळून ट्रम्प यांना धडा शिकवावा

चीनच्या सरकारी माध्यमांची मागणी

बीजिंग – ‘अमेरिकेने पुकारलेल्या व्यापार युद्धाचा जबर फटका बसलेल्या चीन व युरोपने हातमिळवणी करून अमेरिकेला धडा शिकवावा आणि ट्रम्प यांना जबर किंमत मोजायला भाग पाडावे’, असे आवाहन चीनच्या सरकारी मुखपत्राने केले आहे. गेल्या आठवड्यात चीनमधून आयात केल्या जाणार्‍या सुमारे ५० अब्ज डॉलर्सच्या उत्पादनांवर अमेरिकेने २५ टक्के कर लादल्याचे ट्रम्प यांनी जाहीर केले होते. अमेरिकी उत्पादनांवर कर लादून चीनने त्याला उत्तर दिले असून यामुळे दोन्ही देशांमध्ये अधिकृत पातळीवर व्यापारयुद्ध सुरू झाले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर चीनच्या सरकारी वृत्तपत्रांनी अमेरिकेच्या धोरणावर नाराज असलेल्या युरोपिय देशांना हाताशी धरून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना धडा शिकविण्याची भाषा सुरू केली आहे.

चीन व युरोपचीनकडून होणारी अमेरिकी तंत्रज्ञानाची चोरी व व्यापारातील गैरव्यवहार यांना लक्ष्य करण्यासाठी चिनी आयातीवर कर लादल्याचा दावा ट्रम्प यांनी गेल्या आठवड्यात केला होता. अमेरिका व चीनमधील व्यापारात समतोल साधण्यासाठी ही भूमिका स्वीकारल्याचे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी जाहीर केले होते. त्यानंतर अमेरिकेच्या ६००हून अधिक उत्पादनांच्या आयातीवर कर वाढविण्याची घोषणा करून चीनने अमेरिकेला प्रत्युत्तर दिले.

चीनच्या या निर्णयाचा फटका ३४ अब्ज डॉलर्सच्या अमेरिकेतून चीनमध्ये होणार्‍या आयातीला बसणार आहे. चीनने अमेरिकेविरोधात व्यापारी करांची घोषणा करण्याची गेल्या तीन महिन्यातील ही दुसरी वेळ होती. यामुळे आता अमेरिका व चीनमध्ये अधिकृतरित्या व्यापारयुद्ध सुरू झाल्याचा दावा केला जातो. गेल्या काही दिवसांपासून चीनच्या सरकारी वृत्तपत्रातूनही तसेच सूर उमटत आहेत. ट्रम्प यांचे प्रशासन गोंधळलेले, एकतर्फी आणि हेकेखोर असल्याची टीका चिनी सरकारच्या मुखपत्राने केली.

ट्रम्प यांच्या हेकेखोर धोरणांमुळे जगातील आघाडीच्या अर्थव्यवस्थांबरोबरचे व्यापारी सहकार्य धोक्यात येऊ शकते. हा धोका टाळायचा असेल तर चीन व युरोपने एकत्र येऊन ट्रम्प यांना अद्दल घडवावी, असे आवाहन चिनी मुखपत्राने केले. तर चीनच्या अन्य एका मुखपत्राने ‘मुर्ख लोक भिंती उभारतात’ असा दावा करून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या मेक्सिको सीमेवर भिंत उभारण्याच्या निर्णयावर निशाणा साधला. त्याचबरोबर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष स्वार्थी असल्याची टीकाही या मुखपत्राने केली.

English हिंदी

Click below to express your thoughts and views on this news:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info