Breaking News

मानवाधिकारांचे हनन करणार्‍यांचा अड्डा बनल्याचा आरोप करून अमेरिकेची संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार आयोगातून माघार

वॉशिंग्टन – अमेरिकेने संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार आयोगातून माघार घेतली आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ आणि संयुक्त राष्ट्रसंघातील अमेरिकेच्या राजदूत निक्की हॅले यांनी याची घोषणा केली. इस्रायलद्वेष्ट्या, राजकीय पूर्वाग्रहाने पछाडलेल्या व मानवाधिकारांचे हनन करणार्‍यांचाच अड्डा बनलेल्या या किळसवाण्या संघटनेचा भाग बनण्यात अमेरिकेला स्वारस्य नसल्याचे हॅले यांनी ठणकावले आहे. मात्र मानवाधिकार आयोगातून माघार घेतल्याचा अर्थ अमेरिकेने मानवाधिकारांचा मुद्दा सोडून दिला, असा होत नाही. उलट अमेरिका जगभरातील मानवाधिकरांच्या रक्षणासाठी अमेरिका अधिक जोमाने काम करील, असे हॅले यांनी म्हटले आहे.

मानवाधिकारगेल्या काही दिवसांपासून मानवाधिकार आयोगातून अमेरिका माघार घेणार असल्याच्या बातम्या येऊ लागल्या होत्या. मात्र परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ व राजदूत निक्की हॅले यांनी याची घोषणा करून मानवाधिकार आयोगावर सडकून टीका केली. ‘४७ सदस्यदेशांचा सहभाग असलेला मानवाधिकार आयोग म्हणजे इस्रायलद्वेष्ट्या व मानवाधिकारांचे हनन करणार्‍यांचा अड्डा बनला आहे. चीन, क्युबा आणि व्हेनेझुएला सारखे मानवाधिकारांचे हनन करणारे देश या आयोगाचे सदस्य आहेत’, असा टोला हॅले यांनी लगावला. मानवाधिकार पायदळी तुडविणार्‍यांचा गट बनलेला हा आयोग म्हणजे मानवाधिकारांचे पालन करणार्‍यांचा वैरी बनलेला आहे’, असे घणाघाती प्रहार हॅले यांनी केले.

असे असले तरी ट्रम्प प्रशासनाने आयोगातून माघार घेण्याचा निर्णय एकाएकी घेतलेला नाही. अगदी सुरूवातीपासून आयोगाच्या सदोष व पूर्वग्रहदूषित कार्यपद्धतीमधील दोष दाखविण्याचे व त्यात सुधारणा घडविण्याचा प्रयत्न अमेरिकेने करून पाहिला होता. या प्रयत्नांना यश मिळत नसल्याने आयोगातून माघार घेण्याचा निर्णय अमेरिकेने घेतल्याचे हॅले यांनी स्पष्ट केले. मात्र मानवाधिकार आयोगातून अमेरिकेच्या माघारीचा अर्थ अमेरिकेने मानवाधिकारांचा मुद्दा सोडून दिला असा अजिबात होत नाही. उलट जगभरात मानवाधिकारांच्या पालनासाठी अमेरिका अधिक जोमाने पावले उचलणार असल्याचे सांगून हॅले यांनी यासाठी अमेरिका बांधिल असल्याची ग्वाही दिली.

दरम्यान, इस्रायलने गाझापट्टीतील निदर्शकांवर केलेल्या कारवाईवर आयोगाने केलेल्या टीकेवर अमेरिकेने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. आयोगाची भूमिका इस्रायलद्वेष्टी असल्याचा ठपका अमेरिकेने ठेवला होता. ट्रम्प प्रशासनाने अमेरिकेत बेकायदेशीररित्या शिरलेल्या निर्वासितांपासून त्यांच्या मुलांना दूर करण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. हे मानवाधिकारांचे हनन ठरते, अशी टीका सुरू झाली आहे. मानवाधिकार आयोगाच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित करून यावरून अमेरिकेला लक्ष्य करण्याची तयारी आयोगाच्या सदस्यदेशांनी केल्याची चर्चा आहे. त्यामुळे अमेरिकेने आयोगातून माघार घेण्याचा घेतलेला निर्णय इस्रायलच्या बचावापेक्षाही आपल्यावरील टीका टाळण्यासाठी असावा, असा दावा माध्यमांचा एक गट करीत आहे.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info