Breaking News

इस्लामधर्मियांमुळे बदलणारा नेदरलँड बघवत नसेल तर चालते व्हा – स्थानिकांना इस्लामधर्मियांच्या नेत्याचा इशारा

अ‍ॅमस्टरडॅम – नेदरलँडमधील इस्लामधर्मियांचे प्रतिनिधित्त्व करणार्‍या ‘डेंक’ पक्षाचे नेते ‘तुनाहान कुझू’ यांनी अत्यंत जहाल विधान करून खळबळ माजविली आहे. ‘ज्या कुणाला इतर संस्कृतीतून आलेल्यांमुळे नेदरलँड बदलत असलेला बघवत नाही, त्यांनी इथून चालते व्हावे’, असे कुझू यांनी बजावले आहे. नेदरलँडमधील इस्लामधर्मियांच्या वाढत्या संख्येबाबत काही उजव्या गटाचे नेते इशारे देत आहेत. त्यांना उद्देशून कुझू यांनी हे उद्गार काढले आहेत. त्यावर नेदरलँडमधून तीव्र प्रतिक्रिया अपेक्षित आहे.

इतर युरोपिय देशांप्रमाणे नेदरलँडमध्ये इस्लामधर्मियांची संख्या व प्रभाव वाढत चालला आहे. परिस्थिती अशीच राहिली तर पुढच्या काळात आपल्या देशावर इस्लामधर्मियांचे वर्चस्व प्रस्थापित होईल, असे गीर्ट विल्डर्स यांच्यासारखे नेदरलँडचे नेते बजावत आहेत. त्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद मिळू लागल्याचेही दिसत आहे. सध्या युरोपिय देशांमध्ये निर्वासितांच्या विरोधात वातावरण तापले असून नेदरलँडमध्येही त्याचे पडसाद उमटत आहे. या पार्श्‍वभूमीवर, ‘डेंक’ पक्षाचे नेते ‘तुनाहान कुझू’ यांनी हे जहाल व प्रक्षोभक विधान केले आहे.

इस्लामधर्मिय नेता‘ज्यांना इतर संस्कृतीतून आलेल्यांच्या वास्तव्यामुळे बदलत असलेली झानडॅमसारखी शहरे पाहवत नाही, त्यांनी या देशातून चालते व्हावे’, असे कुझू यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे. काही युरोपिय वृत्तसंस्थांनी त्यांच्या या विधानाला प्रसिद्धी दिली आहे. तुनाहान कुझू संस्थापकांपैकी एक असलेला ‘डेंक’ पक्ष नेदरलँडमध्ये इस्लामधर्मियांचे प्रतिनिधित्त्व करतो. तीन २०१५ साली स्थापन झालेल्या या पक्षाला इस्लामधर्मियांच्या वस्त्यांमधून या पक्षाचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. २०१७ सालच्या मार्च महिन्यात झालेल्या निवडणुकीत डेंक पक्षाचे दोन प्रतिनिधी निवडून आले होते व या पक्षाला तब्बल दोन लाख मते मिळाली होती.

यानंतर झालेल्या नगरपालिकांच्या निवडणुकीतही ‘डेंक’ पक्षाने उसळी मारून इथे प्रभाव असलेल्या डाव्या पक्षाला मागे टाकले होते. ‘डेंक’ पक्ष उघडपणे इस्लामधर्मियांचा पुरस्कार करून नेदरलँडवर आपला तितकाच अधिकार असल्याचा दावा करीत आहे. २०१६ साली एका आंतरराष्ट्रीय परिषदेत इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांच्याशी हस्तांदोलन करण्यास नकार दिल्याने तुनाहान कुझू चर्चेत आले होते. पॅलेस्टाईनमध्ये इस्रायल करीत असलेल्या मानवाधिकारांच्या हननामुळे आपण पंतप्रधान नेत्यान्याहू यांच्याशी हस्तांदोलन करण्यास नकार दिल्याचे कुझू यांनी म्हटले होते. तुनाहान कुझू हे तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांचे समर्थक असल्याचा दावा केला जातो. नेदरलँडच्या संसदेने तुर्कीच्या विरोधात भूमिका घेतलेली असताना, कुझू यांचा डेंक पक्ष तुर्कीच्या बाजूने ठामपणे उभा राहिला, याची आठवण नेदरलँडची माध्यमे करून देत आहेत.

डेंक पक्ष तसेच तुनाहान कुझू यांच्यासारख्या आक्रमक नेत्याने स्वीकारलेल्या जहाल भूमिकेवर नेदरलँडमधून तीव्र प्रतिक्रिया उमटू शकते. उजव्या गटाचे आक्रमक नेते गीर्ट विल्डर्स व त्यांचा पक्ष ‘पार्टी फॉर फ्रिडम’ ‘तुनाहान कुझू’ व त्यांच्या डेंक पक्षाला कडाडून विरोध करू शकतील. त्यामुळे पुढच्या काळात नेदरलँडमध्ये या प्रश्‍नावर रणकंदन माजण्याची दाट शक्यता आहे.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info