Breaking News

ट्रम्प यांनी युरोपिय देशांवर दबाव वाढविल्यास ‘नाटो’ शिल्लक राहणार नाही – जर्मनीच्या माजी संरक्षणमंत्र्यांचा इशारा

बर्लिन – ‘रशियाकडून लष्करी, आर्थिक किंवा राजकीय पातळीवर कोणत्याही प्रकारचा धोका आहे, असे पश्‍चिम युरोपमधील देशांना अजिबात वाटत नाही. त्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ब्रुसेल्समध्ये नाटोच्या बैठकीत घेतलेल्या भूमिकेवर त्यांच्यात सहमती होऊ शकणार नाही. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी आक्रमक भूमिका कायम ठेवली तर नाटोची अखेर होईल’, असा इशारा जर्मनीचे माजी संरक्षणमंत्री विली विमर यांनी दिला.

संरक्षणमंत्री, इशारा, विली विमर, नाटो, संरक्षणखर्च, बर्लिन, रशियादोन दिवसांपूर्वी ब्रुसेल्समध्ये झालेल्या नाटोच्या बैठकीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी रशियाकडून युरोपला असलेला धोका व सदस्य देशांचा संरक्षणखर्च या मुद्यांवर अतिशय आक्रमक भूमिका घेतली होती. ट्रम्प यांनी जर्मनीवर टीकास्त्र सोडून अमेरिका एकटा नाटोच्या खर्चाचा भार वाहणार नसल्याचा इशारा दिला होता. नाटोच्या बैठकीपूर्वी केलेल्या एका वक्तव्यात अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी युरोपातील अमेरिकेची सैन्यतैनाती कमी करण्याबाबत संकेतही दिले होते. नाटोच्या बैठकीनंतर केलेल्या एका ‘ट्विट’मध्ये ट्रम्प यांनी, नाटोच्या सदस्य देशांनी संरक्षणखर्च चार टक्क्यांपर्यंत नेण्याची तयारी दर्शविल्याचा दावा केला होता.

अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या या वक्तव्यावर युरोपिय देशांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. बहुतांश युरोपिय देशांनी ट्रम्प यांचा दावा फेटाळून लावला होता. अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी चार टक्क्यांची दिलेली मर्यादा व्यवहार्य नसल्याचा सूर युरोपिय नेत्यांकडून उमटला होता. या पार्श्‍वभूमीवर जर्मनीच्या माजी संरक्षणमंत्र्यांनी दिलेला इशारा लक्ष वेधून घेणारा ठरतो.

संरक्षणमंत्री, इशारा, विली विमर, नाटो, संरक्षणखर्च, बर्लिन, रशिया‘नाटोला युरोपातून मिळणारे समर्थन कमी होत चालले आहे. गेल्या काही वर्षात अमेरिकेच्या नेतृत्त्वाखाली नाटोकडून करण्यात आलेल्या लष्करी साहसांमुळे युरोपात नाराजीची भावना आहे. जर अमेरिकेच्या धोरणांनुसार नाटोने भूमिका घेतली तर नाटोला युरोपातून अजिबात पाठिंबा मिळणार नाही. विशेषतः पश्‍चिम युरोपातील देशांना अँग्लो-सॅक्सन युद्धांना समर्थन देण्यात रस राहिलेला नाही. सध्याच्या युरोपातील निर्वासितांच्या संकटासाठीही नाटोच्या नेतृत्त्वाखाली अफगाणिस्तान व मालीसारख्या देशांमध्ये सुरू असलेले संघर्ष कारणीभूत असल्याचे मानले जात आहे’, अशा शब्दात विमर यांनी नाटोची युरोपातील विश्‍वासार्हता घटल्याची जाणीव करून दिली.

‘१९९० मध्ये ‘चार्टर ऑफ पॅरिस’ स्वीकारल्यानंतर नाटो युरोपसाठी कालबाह्य संघटना झाली होती. यापुढे युरोपात युद्ध नाही, यावर या करारातून शिक्कामोर्तब करण्यात आले होते. मात्र आता नाटोने युरोपात पुन्हा एकदा युद्धाचे ढग आणले आहेत’, असा इशारा जर्मनीच्या माजी संरक्षणमंत्र्यांनी दिला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष युरोपिय देशांवर संरक्षणखर्चाबरोबरच रशियाबरोबरील सहकार्य व व्यापाराच्या मुद्यावरून सातत्याने दबाव टाकत आहेत. युरोपिय देशांनी ट्रम्प यांच्या धोरणानुसार भूमिका स्वीकारली तर युरोपिय जनता अशा देशांमधील सत्ताधार्‍यांना उलथून लावेल, असेही विमर यांनी बजावले.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info