Breaking News

चीनची व्यापारी घोडदौड रोखण्यासाठी अमेरिका ‘पॉयझन पिल’चा वापर करेल – व्यापारमंत्री विल्बर रॉस यांचा खरमरीत इशारा

वॉशिंग्टन – चीनने आपली बाजारपेठ खुली करावी यासाठी अमेरिका दडपण कायम ठेवणार आहे. त्यासाठी इतर देशांबरोबर करार करताना अमेरिका पुन्हा ‘पॉयझन पिल’चा वापर करू शकतो, असा खरमरीत इशारा अमेरिकेचे व्यापारमंत्री विल्बर रॉस यांनी दिला. गेल्याच आठवड्यात अमेरिकेने कॅनडा व मेक्सिकोबरोबर केलेल्या व्यापारी करारामध्ये, चीनबरोबरील व्यापारी सहकार्य रोखण्याच्या तरतुदीचा समावेश केला होता. यापुढे अमेरिकेबरोबर जे देश व्यापारी करारासाठी इच्छुक असतील, त्यांनाही अशा तरतुदीची तयारी ठेवावी लागणार असल्याचे संकेत रॉस यांनी दिले आहेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या एक महिन्याच्या कालावधीत मेक्सिको, दक्षिण कोरिया व कॅनडा यांच्याबरोबर व्यापारी करार करण्यात यश मिळविले आहे. कॅनडा व मेक्सिकोबरोबर केलेला व्यापारी करार बहुराष्ट्रीय असून तो यापूर्वीचा ‘नाफ्टा’ करार रद्द करून करण्यात आला आहे. नव्या कराराला ‘युएस-मेक्सिको-कॅनडा अ‍ॅग्रीमेंट’ (यूएसएमसीए) असे नाव देण्यात आले आहे. हा करार करताना अमेरिकेने त्यात चीनविरोधातील आक्रमक तरतुदीचा समावेश केला असून ही तरतूद ‘पॉयझन पिल’ म्हणून ओळखण्यात येते.

‘यूएसएमसीए’ करारानुसार, तीनपैकी कोणत्याही देशाने ‘मार्केट इकॉनॉमी’ हा दर्जा नसलेल्या देशाबरोबर व्यापारी करार करण्याचा प्रयत्न केला, तर इतर दोन देशांना ‘यूएसएमसीए’मधून बाहेर पडण्याची मोकळीक असणार आहे. हे देश स्वतंत्ररित्या द्विपक्षीय करार करण्यास मोकळे असून त्यासाठी सहा महिन्यांची मुद्त देण्यात आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या सूचनेवरून अशा प्रकारच्या तरतुदीचा करारात समावेश करण्यात आल्याचे मानले जाते.

अमेरिका व युरोपिय देशांकडून चीनला अजूनही ‘मार्केट इकॉनॉमी’चा दर्जा देण्यात आलेला नाही. त्यामुळे अमेरिकेची ही तरतूद चीनलाच लक्ष्य करणारी असल्याचे उघड झाले आहे. व्यापारमंत्री रॉस यांनी एका मुलाखतीदरम्यान, सदर तरतूद चीनच्या व्यापाराला व व्यापारी पद्धतींना कायदेशीर मान्यता देण्यासाठी असलेल्या पळवाटा बंद करणारा उपाय असल्याचे स्पष्ट केले. त्याचा उल्लेख ‘पॉयझन पिल’ असा करून अमेरिका इतर देशांबरोबर करार करताना त्याचा वापर करेल, असे उघड संकेतही दिले.

नजिकच्या काळात ब्रिटन, जपान तसेच युरोपिय महासंघ अमेरिकेबरोबर व्यापारी करार करण्याच्या तयारीत असल्याचे समोर आले आहे. या तिन्ही देशांबरोबरील करारात ‘पॉयझन पिल’चा समावेश झाल्यास त्याचा मोठा फटका चीनला बसू शकतो. पुढच्या काळात व्यापारी भागीदार म्हणून अमेरिका किंवा चीन यापैकी एकाचीच निवड करा, असा इशारा अमेरिका इतर देशांना देत आहे. चीनची निवड केल्यास, अमेरिका तुमचा व्यापारी सहकारी देश राहणार नाही, ही अमेरिकेची निर्णायक भूमिका म्हणजे ‘व्यापारयुद्धाचा’ पुढचा टप्पा ठरतो.

आत्तापर्यंत व्यापारयुद्धात अमेरिकेने घेतलेल्या निर्णयाचे परिणाम चीनच्या अर्थव्यवस्थेवर दिसू लागले असून चीन व्यापारयुद्ध टाळण्यासाठी हालचाली करू लागल्याचे दिसत आहे. अमेरिकेमधील चीनचे राजदूत कुई तियांकाई यांनी चीनला अमेरिकेबरोबर व्यापारयुद्ध नको असल्याचे म्हटले आहे.

English हिंदी

 

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info