Breaking News

अमेरिकेने रशियावर लादलेल्या निर्बंधांमुळे रशिया-अमेरिकेमधील अण्वस्त्रकरार धोक्यात – रशियाचा गंभीर इशारा

जीनिव्हा/मॉस्को – अमेरिकेकडून रशियाविरोधात सातत्याने लादण्यात येणार्‍या निर्बंधांमुळे दोन्ही देशांमधील अण्वस्त्रकराराचे भवितव्य संकटात आले असून हे धोक्याचे संकेत आहेत, असा इशारा रशियन मंत्र्यांनी दिला. अमेरिका व रशियादरम्यान करण्यात आलेल्या ‘न्यू स्टार्ट’ या अण्वस्त्रांबाबतच्या कराराची मुदत २०२१ साली संपत आहे. या कराराद्वारे दोन्ही देशांनी त्यांच्याकडील अण्वस्त्रांची संख्या ५० टक्क्यांनी कमी करण्याचे मान्य केले आहे.

‘पाश्‍चिमात्य देश रशियाचे मित्र नसून शत्रू आहेत. अमेरिकेतील व्यवस्था डळमळीत झाली असून त्यात कधीही बिघाड निर्माण होऊ शकतो. याचे परिणाम शस्त्रास्त्रस्पर्धेवर नियंत्रणासाठी जे घटक उपलब्ध आहेत त्याच्या कार्यक्षमतेवर होऊ शकतो’, असा दावा रशियाचे परराष्ट्र उपमंत्री सर्जेई रायब्कोव यांनी केला. त्याचवेळी अमेरिकेकडून लादण्यात येणार्‍या निर्बंधांना लक्ष्य करीत त्याचे गंभीर परिणाम अण्वस्त्र करारावर होऊ शकतात, असेही रायब्कोव यांनी बजावले.

‘अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाकडून लादलेल्या निर्बंधांमुळे अण्वस्त्र कराराबाबतच्या चर्चेत अडथळे निर्माण झाले आहेत. त्यात जर काही प्रगती झाली नाही तर संपूर्ण प्रक्रिया उलटू शकते आणि त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. नव्या कराराचे भवितव्य उज्ज्वल असल्याचे सध्या तरी दिसत नाही. अमेरिका याबाबत कोणत्याही प्रकारे पुढाकार घेताना दिसत नाही’, असा दावा रशियाच्या परराष्ट्र उपमंत्र्यांनी केला.

गेल्याच आठवड्यात अमेरिकेकडून, रशियाने १९८७ साली अमेरिकेबरोबर केलेल्या आंतरराष्ट्रीय ‘न्यूक्लिअर फोर्सेस ट्रिटी’चे उल्लंघन केले असून नवी क्षेपणास्त्रे विकसित करण्याचे थांबविले नाही, तर अमेरिकेला कराराचा भाग नसलेल्या गोष्टी करण्यासाठी कठोर पावले उचलावी लागतील, असा खरमरीत इशारा देण्यात आला होता.

रशियाने ‘९एम७२९’ हे मध्यम पल्ल्याचे क्षेपणास्त्र विकसित केले असून ते मध्यम पल्ल्याचे असल्याचा दावा अमेरिकेकडून करण्यात येत आहे. दोन देशांमध्ये झालेल्या करारानुसार ३०० ते ३,४०० मैलांची क्षमता असलेले ‘बॅलिस्टिक’ अथवा ‘क्रूझ’ क्षेपणास्त्र विकसित करता येणार नाही किंवा त्याची चाचणीही घेता येणार नाही. मात्र ‘९एम७२९’च्या माध्यमातून रशियाने त्याचे उल्लंघन केल्याचा अमेरिकेचा आरोप आहे.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info