Breaking News

इराणने पाकिस्तानला ‘सर्जिकल स्ट्राईक’ची धमकी दिली

तेहरान – शेजारी देशांमध्ये घुसखोरी करणार्‍या दहशतवाद्यांवर कारवाई करण्याचे टाळणार्‍या पाकिस्तानला इराणने सज्जड इशारा दिला आहे. ‘पाकिस्तान आपल्या सीमारेषेतील दहशतवाद्यांच्या सुरक्षित स्वर्गांवर कारवाई करणार नसेल तर इराण या ठिकाणांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’ करील’, असा इशारा इराणच्या ‘रिव्होल्युशनरी गार्ड्स’ने दिला. गेल्या काही दिवसांमध्ये पाकिस्तानमधील दहशतवाद्यांनी इराणच्या सीमारेषेत?घुसखोरी करून १४ इराणी सैनिकांचे अपहरण केले आहे. या पार्श्‍वभूमीवर इराणने पाकिस्तानला बजावले आहे.

पाकिस्तानच्या सीमारेषेजवळ असलेल्या इराणच्या ‘सिस्तान बलुचिस्तान’ प्रांतातून गेल्या काही दिवसांमध्ये इराणी सैनिकांच्या अपहरणाच्या घटना वाढल्या आहेत. सीमारेषेवर गस्त घालणार्‍या इराणच्या सैनिकांचे अपहरण करून दहशतवादी त्यांना पाकिस्तानातील आपल्या ठिकाणी नेत असल्याचा आरोप इराण करीत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये दहशतवाद्यांनी इराणच्या ‘लूलाकदान’ भागात गस्त घालणार्‍या १४ इराणी सैनिकांचे अपहरण केले. यामध्ये इराणच्या सीमासुरक्षा दलाच्या जवानांबरोबर ‘रिव्होल्युशनरी गार्ड्सच्या जवानांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

पाकिस्तानातील ‘जैश उल-अदल’ या दहशतवादी गटाने इराणी सैनिकांच्या अपहरणाची जबाबदारीही स्वीकारली आहे. इराणमधील खामेनी राजवटविरोधी असलेल्या या दहशतवादी संघटनेचा तळ पाकिस्तानच्या सीमाभागातच आहे. पाकिस्तानच्या लष्कर तसेच गुप्तचर यंत्रणांना दहशतवाद्यांच्या या सुरक्षित स्वर्गाची माहिती आहे. पण पाकिस्तानी लष्कर या दहशतवाद्यांवर कारवाई करीत नसल्याचा ठपका इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सचे वरिष्ठ कमांडर ‘मेजर जनरल मोहम्मद अली जाफरी’ यांनी ठेवला.

‘पाकिस्तानच्या सीमारेषेतून इराणमध्ये दाखल होणारे हे दहशतवादी इराणी सैनिकांचे अपहरण करून निघून जातात, तरी देखील सीमेवरील पाकिस्तानी लष्कर या दहशतवाद्यांवर कारवाई करीत नसल्याचा आरोप जाफरी यांनी केला. पाकिस्तानी लष्कर या दहशतवाद्यांवर कारवाई करणार नसेल तर आपल्या सैनिकांच्या सुटकेसाठी इराणलाच कारवाई करावी लागेल’, असा इशारा मेजर जनरल जाफरी यांनी दिला. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते बहराम कासेमी यांनीही इराणच्या सैनिकांच्या सुटकेसाठी पाकिस्तानकडून त्वरीत कारवाईची अपेक्षा असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, याआधीही पाकिस्तानातील दहशतवाद्यांनी इराणच्या सैनिकांची अपहरण केल्याच्या घटना घडल्या आहेत. पण पाकिस्तानी लष्कर दहशतवाद्यांच्या या कारवाईकडे दुर्लक्ष करीत असल्याची टीका करून इराणने गेल्या महिन्यात पाकिस्तानच्या सीमेजवळ कारवाई केली होती. या कारवाईत ‘जैश उल-अदल’च्या मोठ्या कमांडरला ठार केले होते.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info