‘डीआर काँगो’मध्ये एबोलाची इतिहासातील सर्वात भयंकर साथ – एबोलाच्या बळींची संख्या 200 वर

‘डीआर काँगो’मध्ये एबोलाची इतिहासातील सर्वात भयंकर साथ – एबोलाच्या बळींची संख्या 200 वर

किन्शासा – अवघ्या वर्षभरात दुसर्‍यांदा फटका देणार्‍या एबोलाच्या भयानक साथीत 200हून अधिक जणांचा बळी गेल्याची माहिती ‘डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो’(डीआर काँगो) सरकारने दिली. आतापर्यंत ‘डीआर काँगो’मध्ये आलेल्या एबोलाच्या साथींमध्ये ही सर्वात भयानक साथ असल्याचा दावाही आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांनी केला आहे. ‘डीआर काँगो’मधील साथीची वाढती व्याप्ती लक्षात घेऊन शेजारी देश युगांडानेही एबोलाला तोंड द्यायची तयारी सुरू केली असून अतिरिक्त तपासणी तसेच प्रतिबंधक लसींचा साठा यासारखे उपाय हाती घेतले आहेत.

एबोला, बळी, डीआर काँगो, साथ, उपाययोजना, किन्शासा, स्वयंसेवी गटएबोलाच्या नव्या साथीने ‘डीआर काँगो’च्या पूर्व भागात थैमान घातले असून त्यात आतापर्यंत 200हून अधिक जणांचा बळी गेला आहे. रोगाची लागण झालेल्यांची संख्या 300च्या वर गेली असून नोंद न झालेल्यांची संख्या त्याहून अधिक असू शकते, अशी भीती स्थानिक अधिकार्‍यांकडून व्यक्त करण्यात आली आहे. एबोलाची साथ सुरू असलेल्या भागात बंडखोर संघटनांचा संघर्ष सुरू असल्याने स्थिती अधिकच बिघडण्याची शक्यता आहे, अशी भीती जागतिक आरोग्य संघटनेने गेल्याच महिन्यात व्यक्त केली होती.

ऑगस्ट महिन्यात ‘डीआर काँगो’च्या ‘किवु’ व ‘इतुरी’ प्रांतात एबोलाच्या साथीची सुरुवात झाल्याचे समोर आले होते. गेल्या चार दशकांमध्ये देशाच्या ईशान्य भागात एबोलाची साथ येण्याची ही पहिलीच वेळ आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यातच एबोलाच्या साथीत तब्बल 44 जणांचा बळी गेला होता. त्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेसह सरकार, आंतरराष्ट्रीय व स्थानिक स्वयंसेवी गटांकडून मोठ्या प्रमाणावर उपाययोजना हाती घेण्यात आल्या होत्या.

मात्र त्यानंतरही एबोलाच्या साथीची व्याप्ती अधिकाधिक वाढत असल्याचे समोर येत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालांनुसार, पाच हजारांहून अधिक जणांना एबोलाची लागण झाल्याचा अंदाज आहे. ‘डीआर काँगो’मध्ये 1976 साली पहिल्यांदा एबोलाची साथ आली होती. त्यानंतर आतापर्यंत नऊ वेळा या देशाला एबोलाच्या साथीचा फटका बसला असून ऑगस्ट महिन्यात सुरू झालेली साथ 10वी वेळ आहे.

यापूर्वी 1976 तसेच 1995 साली आलेल्या एबोलाच्या साथीत 200हून अधिक बळी गेल्याची नोंद झाली होती. त्यानंतर 200हून अधिक बळींची नोंद होण्याची ही तिसरी वेळ आहे. पायाभूत सुविधा व प्रतिबंधक योजना तसेच आर्थिक तरतूद मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतानाही बळींची संख्या वाढण्याची बाब चिंताजनक मानली जाते. ‘डीआर काँगो’मधील एबोलाची वाढती व्याप्ती शेजारी देशांना अस्वस्थ करणारी ठरली असून युगांडा सरकारने प्रतिबंधक हालचालींना सुरुवात केली आहे. एबोलाला रोखण्यासाठी दोन हजारांहून अधिक प्रतिबंधक लसी तयार ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info