रशियाकडून लेझर यंत्रणेच्या तैनातीची घोषणा – ‘आयएनएफ’वरील अमेरिकेच्या अल्टिमेटमला रशियाचे प्रत्युत्तर

रशियाकडून लेझर यंत्रणेच्या तैनातीची घोषणा – ‘आयएनएफ’वरील अमेरिकेच्या अल्टिमेटमला रशियाचे प्रत्युत्तर

मॉस्को – अमेरिकेने रशियाला ‘इंटरमिजेट-रेंज न्यूक्लिअर फोर्सेस ट्रिटी’ (आयएनएफ) संबंधीच्या तरतुदींचे पालन करण्यासाठी ६० दिवसांच्या मुदतीचा इशारा दिला होता. ‘आयएनएफ’बाबतच्या अमेरिकेच्या या अल्टिमेटमला प्रत्युत्तर देताना रशियाने लेझर यंत्रणेच्या तैनातीची घोषणा केली. शत्रूची क्षेपणास्त्रे, विमाने आणि लष्करी तळ भेदण्यासाठी या लेझर यंत्रणेचा वापर होईल, असा दावा रशियाने केला आहे.

दोन दिवसांपूर्वी रशियन संरक्षण मंत्रालयाच्या मुखपत्राने ‘पेरेसव्हेट’ या लेझर यंत्रणेच्या तैनातीची माहिती दिली. गेल्या शनिवारी रशियातील लष्करी तळावर ‘पेरेसव्हेट’ची तैनाती पूर्ण झाली झाली. वर्षभरापूर्वीच रशियन लष्कर सदर लेझर यंत्रणेने सज्ज करण्यात आले होते. पण आता ही यंत्रणा कारवाईसाठी सज्ज असल्याची माहिती रशियन संरक्षण मंत्रालयाच्या मुखपत्राने दिली. एका सेकंदात टार्गेट निकामी करण्याची क्षमता या लेझरमध्ये असल्याचा दावा रशियाकडून केला जातो. या लेझर यंत्रणेच्या चाचणीची व्हिडिओ देखील प्रसिद्ध करण्यात आला आहे.

या वर्षी मार्च महिन्यात राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी रशियन संसदेसमोर बोलताना अण्वस्त्रवाहू आंतरखंडिय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र, पाण्याखालील ड्रोन्स तसेच अण्वस्त्रवाहू ड्रोन्स, क्रूस् क्षेपणास्त्रे अशा प्रगत शस्त्रसाठ्याची निर्मिती केल्याचे जाहीर केले होते. याच भाषणात राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी थेट उल्लेख न करता ‘पेरेसव्हेट’ लेझर यंत्रणेचा संदर्भ दिला होता. ‘लेझर शस्त्रास्त्रे ही फक्त संकल्पना उरली नसून रशियाने या क्षेत्रात मोठी उडी घेतली आहे. गेल्या वर्षीपासून रशियन सैनिक लेझर शस्त्रास्त्रांनी सज्ज झाले असून योग्य वेळी सार्‍या जगाला याची माहिती मिळेल’, असे पुतिन यांनी संसदेत सांगितले होते.

त्यानंतर रशियाने ‘पेरेसव्हेट’बाबतची माहिती उघड केली नव्हती. पण सोमवारी ब्रुसेल्स येथे झालेल्या नाटोच्या बैठकीत अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी अमेरिका व रशियामध्ये झालेल्या ‘इंटरमिजेट-रेंज न्यूक्लिअर फोर्सेस ट्रिटी’ (आयएनएफ) कराराबाबत रशियाला सज्जड इशारा दिला. रशिया जाणीवपूर्वक ‘आयएनएफ’च्या कराराचे उल्लंघन करून अण्वस्त्रे आणि आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांची निर्मिती व चाचणी केल्याचा आरोप पॉम्पिओ यांनी केला होता. त्याचबरोबर पुढील ६० दिवसात रशियाने ‘आयएनएफ’च्या तरतूदींचे पालन केले नाही तर अमेरिका देखील सदर करारातून बाहेर पडून यापुढील कारवाई करील, असे अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी बजावले होते.

अमेरिकेचा हा आरोप रशियाने फेटाळला होता. तसेच रशियाच्या चाचणी घेतलेल्या ठिकाणांची अमेरिकेने तपासणी करावी, असेही रशियाने खडसावले होते. पण लेझर यंत्रणेच्या तैनातीबाबत घोषणा करून रशियाने अमेरिकेला ६० दिवसांच्या अल्टिमेटमवर खणखणीत इशारा दिल्याचे दिसत आहे. याआधीही रशियाने अमेरिकेचे सारे इशारे धुडकावून लावले असून एकाच वेळी सिरिया तसेच युक्रेनच्या प्रश्‍नावर अमेरिकेशी टक्कर घेण्याची धमक आपल्या देशाकडे असल्याचा इशारा रशियाच्या राजकीय नेतृत्त्वाकडून दिला जात आहे.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info