इराण अमेरिकेजवळ विनाशिका तैनात करणार

इराण अमेरिकेजवळ विनाशिका तैनात करणार

तेहरान – विमानभेदी आणि युद्धनौकाभेदी तोफा, क्षेपणास्त्रे आणि प्रगत रडार यंत्रणेने सज्ज असलेल्या इराणच्या विनाशिकांचा ताफा येत्या काही आठवड्यात अमेरिकेसाठी रवाना होईल, अशी घोषणा इराणने केली. इराणच्या या विनाशिका अटलांटिकच्या महासागरात पाच महिन्यांसाठी तैनात असतील. पर्शियन आखातातील अमेरिकी युद्धनौकांच्या तैनातीला प्रत्युत्तर म्हणून इराण अमेरिकेजवळ या विनाशिका तैनात करणार असल्याचा दावा आंतरराष्ट्रीय माध्यमे करीत आहेत. दरम्यान, अमेरिकी राष्ट्राध्यक्ष मे महिन्यात इराणवरील निर्बंधांबाबत मोठी घोषणा करणार असून त्यापार्श्‍वभूमीवर इराणच्या या तैनातीकडे पाहिले जाते.

इराणचे वरिष्ठ नौदल अधिकारी ‘रेअर-अ‍ॅडमिरल तौराज हसानी’ यांनी विनाशिकांच्या तैनातीची ही माहिती जाहीर केली. इराणच्या सरकारी वृत्तवाहिनीशी बोलताना रेअर-अ‍ॅडमिरल हसानी यांनी मार्च महिन्यात इराणच्या विनाशिकांचा ताफा अटलांटिकच्या महासागरासाठी रवाना होईल, असे सांगितले. ‘अटलांटिक महासागर हे मोठे सागरी क्षेत्र असून इराणच्या विनाशिकांना या क्षेत्रातील मोहिम पूर्ण करण्यासाठी किमान पाच महिने लागतील’, असे हसानी म्हणाले.

इराणच्या विनाशिका कोणत्या मोहिमेवर आहेत? किंवा या मोहिमेत किती विनाशिका सहभागी होतील? याबाबत माहिती देण्याचे हसानी यांनी टाळले. पण इराणनिर्मित ‘साहंद’ ही प्रगत विनाशिका अटलांटिकच्या ताफ्यात असेल, अशी माहिती हसानी यांनी दिली. ‘साहंद’ ही हेलिकॉप्टरवाहू विनाशिका असून यावर जमिनीवरुन जमिनीवर तसेच हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे तैनात आहेत. त्याचबरोबर विमानभेदी आणि युद्धनौकाभेदी तोफांनी सज्ज असलेल्या सदर विनाशिकेत इलेक्ट्रॉनिक युद्धतंत्राची क्षमता असल्याचा दावा इराण करीत आहे.

अटलांटिकमधील इराणच्या या विनाशिकांच्या तैनातीचे कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. पण इराण, रशिया तसेच पाश्‍चिमात्य माध्यमांनी इराणच्या विनाशिकांची ही तैनाती पर्शियन आखातातील अमेरिकी युद्धनौकांच्या तैनातीला प्रत्युत्तर असल्याचा दावा केला आहे. महिन्याभरापूर्वी अमेरिकेची ‘युएसएस जॉन स्टेनिस’ ही विमानवाहू युद्धनौका आपल्या इतर सहाय्यक युद्धनौकांच्या ताफ्यासह पर्शियन आखातात दाखल झाली. इराणच्या नौदलाने त्यावेळी अमेरिकी युद्धनौकांच्या दिशेने रॉकेट हल्ले देखील चढविले होते. यामुळे पर्शियन आखातात तणावही निर्माण झाला होता.

त्यानंतर इराणच्या लष्कराच्या वरिष्ठ अधिकार्‍याने इराणच्या विनाशिका अमेरिकेजवळ रवाना करण्याचे संकेत दिले होते. ‘अमेरिकेच्या युद्धनौका पर्शियन आखातात दाखल झाल्या, त्याचप्रमाणे इराणच्या विनाशिका देखील अटलांटिक महासागरासाठी रवाना होतील’, असे सांगून या अधिकार्‍याने अमेरिकेकडे इराणला रोखण्याची क्षमता नसल्याचा इशारा दिला होता. या पार्श्‍वभूमीवर इराणने अटलांटिकमध्ये आपल्या विनाशिका तैनात करण्याचा निर्णय घेतल्याचा दावा आंतरराष्ट्रीय माध्यमे करीत आहेत.

मात्र इराणी विनाशिका पुढील पाच महिन्यांसाठी अटलांटिकच्या क्षेत्रात तैनात राहणार आहेत. या कालावधीत अमेरिका इराणवरील निर्बंधांबाबत आणखी कठोर निर्णय घेईल, असे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी याआधीच जाहीर केले होते. अमेरिकेचे हे निर्बंध इराणला गुडघ्यावर आणतील, असा दावा पॉम्पिओ यांनी केला होता. त्यामुळे अटलांटिक महासागरातील इराणी विनाशिकांच्या तैनातीकडे गांभीर्याने पाहिले जात आहे.

दरम्यान, अटलांटिकच्या तैनातीत इराणच्या विनाशिका क्यूबाला भेट देऊ शकतात.

English      हिंदी  

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info