इराणविरोधात आघाडी उभारण्यासाठी अमेरिका मित्रदेशांची बैठक आयोजित करणार

इराणविरोधात आघाडी उभारण्यासाठी अमेरिका मित्रदेशांची बैठक आयोजित करणार

कैरो/वॉशिंग्टन/तेहरान – ‘आखातात स्थैर्य, स्वातंत्र्य, शांती आणि सुरक्षा हवी असेल तर या क्षेत्रातील अस्थैर्यासाठी कारणीभूत असलेल्या इराणचा प्रश्‍न सोडविणे आवश्यक आहे’, असा इशारा अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री ‘माईक पॉम्पिओ’ यांनी दिला. यासाठी अमेरिकेने पुढच्या महिन्यात पोलंड येथे इराणविरोधी बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीत इराणविरोधी इस्रायल तसेच आखाती मित्रदेशांचाही समावेश असेल. दरम्यान, पोलंड येथील या बैठकीवर इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी टीका केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री आठ दिवसांच्या आखाती देशांच्या दौर्‍यावर आहेत. इजिप्त, बाहरिन, संयुक्त अरब अमिरातीच्या आपल्या या दौर्‍यात पॉम्पिओ यांनी अमेरिकेच्या अरब मित्रदेशांना आश्‍वस्त केले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सिरियातून सैन्यमाघार घोषित केली असली तरी अमेरिका आपल्या अरब मित्रदेशांना वार्‍यावर सोडणार नाही. अमेरिकेच्या सैन्यमाघारीचा परिणाम या क्षेत्रातील अमेरिकेच्या मित्रदेशांच्या सुरक्षेवर होणार नाही, असे पॉम्पिओ यांनी सांगितले.

तसेच अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी इराणच्या धोकादायक हालचालींविषयीही आखाती मित्रदेशांना सावध केले. सिरियासह इराक, लेबेनॉन, येमेन या देशांमधील इराणचा वाढता प्रभाव या क्षेत्राचे स्थैर्य, स्वातंत्र्य, शांती व सुरक्षा धोक्यात टाकणारे आहे, असे पॉम्पिओ यांनी आपल्या इजिप्त व बाहरिनच्या दौर्‍यात सांगितले. इराणच्या या वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठी अरब देशांनी नाटो प्रमाणे स्वतंत्र ‘अरब नाटो’ लष्करी संघटना उभारणे आवश्यक असल्याची आठवण पॉम्पिओ यांनी करून दिली. इराणविरोधातील मित्रदेशांची ही आघाडी मजबूत करण्यासाठी अमेरिका पोलंडमध्ये बैठक आयोजित करणार असल्याचे पॉम्पिओ यांनी जाहीर केले.

अमेरिकी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पॉम्पिओ यांनी इराणविरोधी ‘वर्ल्ड समिट’ची घोषणा केली. १३ आणि १४ फेब्रुवारी रोजी पोलंडमध्ये होणार्‍या या बैठकीत आखात अस्थैर्य करण्यासाठी इराणचे सुरू असलेले प्रयत्न आणि आखातात स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी अमेरिकेची भूमिका यावर चर्चा करणार असल्याचे अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले. या बैठकीत अमेरिकेचे जगभरातील मित्रदेश सहभागी होणार आहेत.

अमेरिकेने पोलंडमध्ये आयोजित केलेल्या या बैठकीवर इराणचे परराष्ट्रमंत्री जावेद झरीफ यांनी निशाणा साधला. अमेरिका व मित्रदेशांची ही बैठक म्हणजे हताश इराणविरोधकांची सर्कस असल्याची टीका झरीफ यांनी केली. त्याचबरोबर ‘याआधी इराणच्या विरोधात आयोजित केलेल्या बैठकीत सहभागी झालेले एक तर हयात नाहीत किंवा त्यांची मानहानी झाली किंवा कोपर्‍यात ढकलले गेले. तर अशा बैठकीनंतर इराण अधिकच बलशाली झाला’, असा इशारा झरीफ यांनी दिला.

दरम्यान, अरब व इस्लामी देशांनी एकत्र येऊन ‘अरब नाटो’ लष्करी संघटना उभारावी, असे आवाहन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी याआधीही केले होते. त्यानंतर सौदी अरेबियाच्या नेतृत्वात जगभरातील सुमारे ७० अरब-इस्लामी देशांनी संयुक्त लष्कर उभारणीची घोषणा केली होती.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info