Breaking News

अफगाणी ‘स्पेशल फोर्सेस’च्या कारवाईत ६० तालिबानी ठार

काबुल – अफगाण लष्कराच्या ‘स्पेशल फोर्सेस’ने गेल्या २४ तासात येथील वेगवेगळ्या भागात केलेल्या कारवाईत तालिबानच्या ६० दहशतवाद्यांना ठार केले. या कारवाईत अफगाणी लष्कराने तालिबानी दहशतवाद्यांच्या तळांवर हवाई हल्लेही चढविले. अमेरिका आणि तालिबान यांच्यात कतारमधील वाटाघाटीचा तिसरा टप्पा अपयशी ठरल्यानंतर अफगाणी लष्कराने तालिबानवर ही आक्रमक कारवाई केली आहे.

अफगाणिस्तानातील लोगार, हेल्मंड, उरूझगन आणि वारदाक या दोन प्रांतात अफगाणी लष्कराने ही कारवाई केली. यापैकी लोगार व वारदाक या दोन प्रांतातील ‘बराकी बराक’, ‘चर्ख’ तर ‘सय्यीदाबाद’ या तीन जिल्ह्यांमध्ये अफगाणी ‘स्पेशल फोर्सेस’च्या कारवाईत २९ तालिबानी दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्याचबरोबर तालिबानी दहशतवाद्यांकडे असलेला स्फोटकांचा मोठा साठाही यावेळी नष्ट करण्यात आला.

तर हेल्मंड प्रांतातील ‘नौझाद’ आणि ‘मुसा काला’ आणि उरूझगान प्रांतातील ‘तारींक’ या तीन शहरांमध्ये अफगाणी लष्कराने हवाई हल्ले चढविले. या हवाई हल्ल्यांमध्ये १२ दहशतवादी ठार झाले. तसेच तालिबानचा रेडिओ टॉवर देखील नष्ट करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त पाकिस्तानच्या सीमेजवळील पाकतिया भागातही अफगाणी स्पेशल फोर्सेसने तालिबानच्या ठिकाणांवर धाडी टाकून दहशतवाद्यांना ठार केल्याची माहिती अफगाणी लष्कराने दिली.

गेल्या महिन्याभरात अमेरिकेने तालिबानबरोबर सुरू केलेल्या थेट चर्चेच्या पार्श्‍वभूमीवर, अफगाणी लष्कराने तालिबानवर केलेली ही मोठी कारवाई ठरत आहे. अफगाण तालिबानचा वरिष्ठ कमांडर मुल्ला घनी बरादर आणि अमेरिकेचे विशेषदूत ‘झाल्मे खलिलझाद’ यांच्यात गेल्याच आठवड्यात दुसर्‍या व तिसर्‍या टप्प्याची चर्चा पार पडली. ही चर्चा सुरू असताना, तालिबानने अफगाणिस्तानच्या सुरक्षा दलांवर हल्ले चढवून आपले सामर्थ्य प्रदर्शित केले होते. अमेरिकेने अफगाणिस्तानातून पूर्ण माघार घ्यावी व सध्या अफगाणिस्तानात असलेल्या सरकारला महत्त्व देऊ नये, या तालिबानच्या प्रमुख मागण्या आहेत. या दोन्ही मागण्या अमेरिकेने नाकारल्या आहेत. मेरिकेबरोबरील तालिबानची चर्चा फिस्कटल्यानंतर अफगाणी सुरक्षा दलांनी तालिबानवर चढविलेला हल्ला हा योगायोग नसल्याचे स्पष्ट होत आहे. अफगाणिस्तानातून अमेरिका सैन्यमाघार घेण्याची तयारी करीत असताना, तालिबानने अधिक आक्रमक भूमिका स्वीकारून अमेरिकेवरील दडपण वाढविण्याचा प्रयत्न केल्याचेही या निमित्ताने समोर येत आहे. पण अमेरिकेचे वरिष्ठ लष्करी अधिकारी व नेते अफगाणिस्तानातील अमेरिकेच्या सैन्यमाघारीबाबत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना सावधगिरीचे इशारे देत आहेत. अद्याप आपल्याला अफगाणिस्तानातून माघारीचे आदेश मिळालेले नाहीत, असा दावा अमेरिकेच्या ‘सेंटकॉम’चे प्रमुख जनरल वोटेल यांनी केला होता.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info