इराणवर बोट उगारणार्‍या युरोपमध्येच दहशतवादी गट सक्रीय – युरोपिय महासंघावर इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाची टीका

तेहरान/ब्रुसेल्स – अमेरिकेच्या अणुकरारातील माघारीनंतर इराणबरोबर सहकार्य ठेवणार्‍या युरोपिय महासंघ आणि इराणमध्ये तीव्र मतभेद निर्माण झाले आहेत. क्षेपणास्त्रनिर्मिती व दहशतवादी हल्ल्यांचे कट रचल्याचा आरोप करून युरोपिय महासंघाने इराणवर निर्बंध लादले आहेत. तर इराणवर ठपका ठेवणार्‍या युरोपमध्येच दहशतवादी आणि गुन्हेगारी टोळ्या सक्रिय असल्याचा पलटवार इराणने केला. त्याचबरोबर अमेरिकेच्या निर्बंधांना बगल देण्यासाठी फ्रान्स, जर्मनी व ब्रिटनने सुचविलेली पर्यायी व्यवस्थाही इराणने धुडकावली आहे.

‘इन्स्टेक्स’, कार्यान्वित, SPV, चलन व्यवस्था, आरोप, ww3, इराण, FATFगेल्या वर्षी फ्रान्स, जर्मनी, बेल्जिअम या युरोपिय देशांमध्ये दहशतवादी हल्ले उधळण्यात आले होते. याप्रकरणी युरोपिय देशांमधून अटक झालेल्या दहशतवाद्यांचे थेट संबंध इराणची प्रमुख लष्करी संघटना ‘रिव्होल्युशनरी गार्ड्स’शी असल्याचे उघड झाले होते. या व्यतिरिक्त गेल्या वर्षी इराणने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणीही केली होती. इराणच्या या दोन्ही कारवायांवर जोरदार टीका करून युरोपिय महासंघाने इराणवर निर्बंध टाकण्याचे संकेत दिले होते. इराणने युरोपमधील दहशतवादी कारवाया थांबविल्या आणि क्षेपणास्त्रनिर्मिती रोखली तर निर्बंध टाळता येतील, असे महासंघाने सुचविले होते.

पण इराण क्षेपणास्त्रनिर्मिती व चाचणीच्या आपल्या भूमिकेवर ठाम आहे. अमेरिकेच्या दबावाला बळी पडून युरोपिय महासंघाने इराणवर निर्बंध लादले तर त्याचे गंभीर परिणाम होतील, असा इशारा इराणने दिला होता. पण सोमवारी महासंघाने इराणच्या दोन अधिकारी व एका संघटनेवर निर्बंध लादले. युरोपच्या सुरक्षेला धोका निर्माण करणार्‍या इराणी गटांवर निर्बंध लादल्याचे महासंघाने जाहीर केले. यावरुन इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने युरोपिय महासंघाला धमकावले. ‘दहशतवादी हल्ल्याचा कट रचल्याचा युरोपिय महासंघाचा आरोप खोटा आणि बेजबाबदार आहे. महासंघाच्या या आरोपांमुळे इराण निराश झाला आहे’, अशी नाराजी इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने व्यक्त केली.

तसेच, ‘इराणवर आरोप करणार्‍या महासंघाने आत्मपरीक्षण करावे. युरोपमध्येच दहशतवादी आणि गुन्हेगारी टोळ्या अधिकप्रमाणात सक्रिय आहेत. त्यामुळे महासंघाने दहशतवादाच्या मुद्यावर इराणला दोष देऊ नये’, असे इराणने खडसावले. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने देखील महासंघाला धमकावले आहे. ‘युरोपिय महासंघ यापुढेही आपल्या इराणविरोधी भूमिकेवर ठाम राहिला तर इराणला आपल्या क्षेपणास्त्रांची क्षमता वाढवावी लागेल’, असा इशारा रिव्होल्युशनरी गार्ड्सने दिला.

तर अमेरिकेच्या निर्बंधांना बगल देऊन इराण व युरोपमधील व्यवहार सुरळीत सुरू ठेवण्यासाठी सरू केलेली पर्यायी चलन व्यवस्था इराणने धुडकावली आहे. सदर चलन व्यवस्था कार्यान्वित करण्यासाठी ‘फायनान्शियल अ‍ॅक्शन टास्क फोर्स’च्या नियमांचे पालन करणे शक्य नसल्याचे सांगून युरोपिय देशांची सदर व्यवस्था इराणने फेटाळली. यामुळे इराण आणि युरोपिय महासंघातील मतभेद गंभीर स्वरुप धारण करीत असल्याचे समोर येत आहे.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info