Breaking News

इराण व अमेरिकेतील तणाव चिघळला तर इराण इस्रायलवर थेट हल्ले चढविल – इस्रायलचे इंधनमंत्री युवल स्टेनिट्झ

जेरुसलेम : ‘जर इराण व अमेरिकेतील तणाव चिघळला किंवा इराण व त्याच्या शेजारी देशांमधील स्थिती अधिकच तणावपूर्ण बनली तर इराण इस्रायलवर आक्रमण करू शकतो. त्यासाठी इराण हिजबुल्लाह तसेच गाझातून पॅलेस्टिनी इस्लामिक जिहादला हल्ल्यांसाठी चिथावणी देऊ शकतो. इराणकडून इस्रायलवर थेट क्षेपणास्त्रेसुद्धा डागली जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही’, अशा शब्दात इस्रायलचे वरिष्ठ मंत्री युवल स्टेनिट्झ यांनी इराण इस्रायलवर हल्ल्याच्या तयारीत असल्याचा इशारा दिला.

अमेरिकेने इराणनजिकच्या क्षेत्रात आपल्या विमानवाहू युद्धनौकेसह मोठ्या प्रमाणात संरक्षणसज्जता वाढविली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर एकामागोमाग एक निर्बंध लादल्याने इराण जेरीला आला असून होर्मुझच्या आखातासह नजिकच्या भागात हल्ल्यांच्या रुपात प्रत्युत्तर देण्याची शक्यता आहे. अमेरिकी अधिकार्‍यांनी इराणनजिक प्रवास करणारी व्यापारी जहाजे हल्ल्याचे लक्ष्य ठरु शकतात, असा इशारा यापूर्वीच दिला आहे.

अमेरिका व इराणमधील हा तणाव चिघळला तर इराण आखातातील अमेरिकेच्या हितसंबंधांवर थेट हल्ले चढवू शकतो. अमेरिकेकडून आखातात सुरू झालेल्या हालचालींमागे इस्रायलकडून देण्यात आलेली माहिती व इस्रायलला असलेला धोका हा महत्त्वाचा घटक ठरला आहे. त्यामुळे इराण अमेरिकाविरोधी संघर्षाचा भाग म्हणून इस्रायलला पहिल्यांदा लक्ष्य करु शकतो. इस्रायली मंत्र्यांनी दिलेल्या इशार्‍यातून हा धोका स्पष्टपणे समोर आल्याचे दिसते.

इराण व इराणसमर्थक संघटनांनी गेल्या काही महिन्यात सातत्याने इस्रायलला लक्ष्य करण्याच्या धमक्या दिल्या आहेत. त्यात पॅलेस्टाईनमधील दहशतवादी संघटनांबरोबरच लेबेनॉनमधील ‘हिजबुल्लाह’चा देखील समावेश आहे. या संघटनांनी इस्रायलविरोधात युद्धाची तयारी झाल्याचे तसेच इस्रायली शहरांना लक्ष्य करण्याचे उघड इशारे दिले आहेत. इराण व अमेरिकेदरम्यान तणाव चिघळल्यास इराणकडून या संघटनांना चिथावणी तसेच सहाय्य पुरवून इस्रायलवर हल्ल्यांची सुरुवात होऊ शकते, अशी शक्यता इस्रायलच्या मंत्र्यांनी व्यक्त केल्याचे दिसत आहे.

आखातात प्रबळ देश म्हणून पुढे येण्याची आकांक्षा बाळगणार्‍या इराणकडून सातत्याने अण्वस्त्रसज्जतेबाबत दावे करण्यात आले असून या अण्वस्त्रांचा वापर इस्रायलविरोधात करण्याचा इशाराही इराणच्या सत्ताधारी राजवटीकडून देण्यात आला आहे. अण्वस्त्रांबरोबरच इराण इस्रायलला लक्ष्य करता येतील, अशी दीर्घ पल्ल्याची क्षेपणास्त्रे विकसित करीत असल्याचेही उघड झाले आहे. इराणच्या लष्करी संघटना व वरिष्ठ अधिकार्‍यांनी आपल्या वक्तव्यात इस्रायलची शहरे इराणी क्षेपणास्त्रांचे लक्ष्य असतील, असेही वारंवार बजावले आहे. इस्रायली मंत्र्यांनी आपल्या वक्तव्यात याची दखल घेऊन इस्रायल त्यासाठी पूर्ण सज्ज असल्याचेही संकेत दिले आहेत.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info