दहा दिवसांपूर्वी झालेली संघर्षबंदी म्हणजे इस्रायल व हमासमधील युद्ध टाळण्याची अखेरची संधी – संयुक्त राष्ट्रसंघाच्या राजदूतांचा दावा

दहा दिवसांपूर्वी झालेली संघर्षबंदी म्हणजे इस्रायल व हमासमधील युद्ध टाळण्याची अखेरची संधी – संयुक्त राष्ट्रसंघाच्या राजदूतांचा दावा

गाझा – ‘इस्रायल आणि हमासमध्ये झालेली ही संघर्षबंदी म्हणजे युद्ध टाळणारी अखेरची संधी आहे’, याची परखड जाणीव संयुक्त राष्ट्रसंघाचे आखाती क्षेत्रातील राजदूत ‘निकोलाय मियादेनेव्ह’ यांनी करून दिली. घनघोर संघर्षानंतर इस्रायल आणि हमासमध्ये दहा दिवसांपूर्वी संघर्षबंदी झाली होती. त्याआधी झालेल्या संघर्षात २५ पॅलेस्टिनी व ४ इस्रायली नागरिकांचा बळी गेला होता.

संघर्षबंदी, रॉकेट हल्ले, निकोलाय मियादेनेव्ह, संयुक्त राष्ट्रसंघ, मध्यस्थी, ww3, गाझा, अमेरिका‘इस्लामिक जिहाद’ व ‘हमास’ या गाझापट्टीतील संघटनांनी इस्रायलवर रॉकेट हल्ले चढविले होते. इस्रायलने गाझातील हमासच्या ठिकाणांवर हवाई हल्ले चढवून त्याला प्रत्युत्तर दिले होते. तसेच हमासच्या विरोधात व्यापक युद्ध छेडण्याची तयारीही इस्रायलने केली होती. मात्र इजिप्तने मध्यस्थी करून इस्रायल व हमासमध्ये संघर्षबंदी घडवून आणली. कतार व संयुक्त राष्ट्रसंघानेही या संघर्षबंदीसाठी प्रयत्न केले होते. ही संघर्षबंदी झाली नसती तर इस्रायलचे हमासबरोबर भयंकर युद्ध पेटले असते.

संयुक्त राष्ट्रसंघाचे आखाती क्षेत्रातील राजदूत ‘निकोलाय मियादेनेव्ह’ यांनी याची जाणीव करून दिली. गाझातील एका हॉस्पिटलसाठी ‘सोलर पॉवर प्लँट’चे उद्घाटन करताना राजदूत मियादेनेव्ह बोलत होते. इस्रायल व गाझाने या संघर्षबंदीचे महत्त्व नीट समजून घ्यावे, अशी अपेक्षा यावेळी मियादेनेव्ह यांनी व्यक्त केली. या संघर्षबंदीमुळे आत्तापर्यंत घनघोर युद्ध टळले आहे, हे राजदूत मियादेनेव्ह इस्रायल व हमासच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न करीत आहेत.

सध्या संघर्षबंदी झालेली असली तरी इस्रायलवर हल्ला झाल्यास कुठल्याही क्षणी गाझातील हमासवर घणाघाती हल्ले चढविण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, असे इस्रायलच्या पंतप्रधानांनी बजावले होते. तर संघर्षबंदी म्हणजे इस्रायलचा मोठा पराभव व आपला विजय ठरतो, असा दावा हमास करीत आहे. अशा परिस्थितीत इस्रायल व हमासमध्ये झालेली संघर्षबंदी कुठल्याही क्षणी संपुष्टात येण्याची दाट शक्यता आहे. अमेरिकेनेही हमास व गाझापट्टीतील जहाल संघटनांना कठोर कारवाईचा इशारा देऊन इस्रायलवर हल्ले न चढविण्याची ताकीद दिली होती.

या पार्श्‍वभूमीवर, संयुक्त राष्ट्रसंघाच्या राजदूतांनी दिलेल्या इशार्‍याचे औचित्य अधिकच वाढल्याचे दिसत आहे. दरम्यान, इस्रायलच्या हल्ल्यात गाझाचे फार मोठे नुकसान झाले होते. गाझातील जनतेला सहाय्य करण्यासाठी कतारने फार मोठे सहाय्य दिले आहे. कतारचे राजदूत ‘मोहम्मद अल-इमादी’ सुमारे तीन कोटी डॉलर्सचे अर्थसहाय्य्य घेऊन गाझात आले. हानी झालेल्या गाझातील पॅलेस्टिनींना कतारने रोख रक्कम दिली आहे. हे सहाय्य पुरेसे नसल्याची तक्रार काही पॅलेस्टिनी नागरिक करीत आहेत.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info