ब्रेक्झिटच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान जॉन्सन यांच्याकडून ब्रिटनची संसद स्थगित करण्याचा निर्णय

ब्रेक्झिटच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान जॉन्सन यांच्याकडून ब्रिटनची संसद स्थगित करण्याचा निर्णय

लंडन – ब्रिटन युरोपिय महासंघातून बाहेर पडण्यास अवघा दोन महिन्यांचा कालावधी उरला असतानाच पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी संसद स्थगित करण्याची घोषणा केली. पंतप्रधान जॉन्सन यांच्या निर्णयाला ब्रिटनच्या राजघराण्याच्या प्रमुख ‘क्वीन एलिझाबेथ’ यांनी मंजुरी दिली आहे. त्यानुसार, ९ सप्टेंबर ते १२ ऑक्टोबर या कालावधीत ब्रिटनच्या संसदेचे कामकाज होणार नाही. पंतप्रधान जॉन्सन यांच्या या निर्णयाने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून ब्रिटीश चलन ‘पौंड’ व शेअरबाजारात जबरदस्त घसरण झाली आहे.

जुलै महिन्यात पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारलेल्या जॉन्सन यांनी कोणत्याही परिस्थितीत ३१ ऑक्टोबर अथवा त्यापूर्वी ब्रिटन युरोपिय महासंघातून बाहेर पडेल, अशी ग्वाही दिली होती. त्यानंतर पंतप्रधान जॉन्सन यांनी आपल्या सहकार्‍यांसह याच मुद्यावर लक्ष केंद्रित केले असून ‘नो डील ब्रेक्झिट’ हा महासंघातून बाहेर पडण्यासाठीचा सर्वोत्तम पर्याय असेल, असे जाहीर केले आहे. मात्र गेल्या काही दिवसात कोणत्याही परिस्थितीत ‘नो डील’सह ब्रिटनला महासंघातून बाहेर पडावे लागू नये यासाठी जॉन्सन यांच्या विरोधकांनी आक्रमक हालचाली सुरू केल्या आहेत.

संसदेत ‘ब्रेक्झिट’च्या मुद्यावर मतदान घेऊन जॉन्सन यांना पराभूत करणे, त्यांच्यावर अविश्‍वास ठराव दाखल करणे यासह अनेक योजना पुढे येऊ लागल्या आहेत. सध्या जॉन्सन सरकारकडे संसदेत अवघ्या एका मताचे निसटते बहुमत आहे. याचा फायदा उचलून विरोधी पक्षांनी जॉन्सन यांच्या पक्षांतर्गत विरोधकांना हाताशी धरले असून ‘नो डील’ व पंतप्रधान जॉन्सन यांना रोखण्यासाठी टोकाचे पर्याय वापरण्याचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्‍वभूमीवर, जॉन्सन यांनी संसद स्थगित करण्याचा निर्णय राजकीय विरोधकांना जबरदस्त धक्का देणारा ठरला.

पंतप्रधान जॉन्सन यांनी ब्रिटनच्या राणीला सादर केलेल्या प्रस्तावानुसार, ९ सप्टेंबर ते १२ ऑक्टोबर संसदेचे कामकाज बंद राहणार आहे. त्यानंतर १४ ऑक्टोबर रोजी ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांच्या भाषणाने संसदेचे नवे सत्र सुरू होणार आहे. ब्रिटीश घटनेनुसार राणीच्या भाषणापूर्वी काही दिवस संसदेला सुट्टी देण्याची प्रथा असली तरी यावेळी पंतप्रधान जॉन्सन यांनी तब्बल एक महिन्यांहून अधिक कालावधीसाठी घेतलेली मंजुरी वादाच्या भोवर्‍यात सापडली आहे. जॉन्सन यांचा हा निर्णय म्हणजे ‘लोकशाहीविरोधी बंड’ असून पंतप्रधान जॉन्सन हुकूमशहा असल्याची विखारी टीका त्यांच्या राजकीय विरोधकांनी केली आहे.

पंतप्रधान जॉन्सन यांच्या निर्णयाचे पडसाद ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेवरही उमटले असून ब्रिटीश चलन ‘स्टर्लिंग पौंड’ काही तासांच्या अवधीत एक टक्क्यांहून अधिक घसरला आहे. ब्रिटनमधील शेअरबाजारातही घसरण सुरू झाली असून गुंतवणूकदारांना मोठा फटका बसेल, असे संकेत मिळत आहेत. ‘ब्रेक्झिट’ला विरोध करणारे राजकीय पक्ष तसेच गट जॉन्सन यांच्या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरले असून देशाच्या कानाकोपर्‍यात जोरदार निदर्शनांना सुरुवात झाली आहे.

त्याचवेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्रिटीश पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत केले असून जॉन्सन ब्रिटनसाठी योग्य नेतृत्त्व असल्याची प्रशंसा केली आहे. तर युरोपिय महासंघाने मात्र तीव्र प्रतिक्रिया देत सदर निर्णय अतिशय भयानक असल्याची टीका केली.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info