Breaking News

‘राष्ट्राध्यक्ष ट्रम्प, कृपया हाँगकाँगला चीनपासून स्वातंत्र्य मिळवून द्या’ – हाँगकाँगमधील निदर्शकांची अमेरिकी राष्ट्राध्यक्षांकडे मागणी

हाँगकाँग/वॉशिंग्टन, दि. ९ (वृत्तसंस्था) – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हाँगकाँगमधील लोकशाहीवादी आंदोलनाला साथ देऊन हाँगकाँगला चीनपासून स्वातंत्र्य मिळवून द्यावे, अशी मागणी करणारे फलक रविवारी हाँगकाँगमध्ये झळकले. गेल्या तीन महिन्यांपासून चीन व चीनधर्जिण्या प्रशासनाविरोधात ठामपणे उभ्या राहिलेल्या हाँगकाँगच्या जनतेने आता आंतरराष्ट्रीय समुदायासमोर आपल्याला चीनपासून स्वातंत्र्य देण्याची मागणी उघडपणे करण्यास सुरुवात केली. रविवारच्या निदर्शनांमध्ये हे प्रकर्षाने समोर आले.

गेल्या आठवड्यात हाँगकाँगमधील चीनधर्जिण्या प्रशासनाच्या प्रमुख कॅरी लॅम यांनी वादग्रस्त प्रत्यार्पण विधेयक मागे घेण्याची घोषणा केली होती. हाँगकाँगमध्ये सध्या सुरू असलेले आंदोलन याच विधेयकाच्या मुद्यावर सुरू झालेले असल्याने ही घोषणा निदर्शकांना शांत करणारी ठरेल, असा लॅम यांचा अंदाज होता. मात्र विधेयक मागे घेण्याच्या निर्णयास खूप उशिर झाल्याचे सांगून आंदोलकांनी यापुढेही लढा चालू राहिल, असे जाहीर केले. विधेयक रद्द करण्याबरोबरच पोलिसी कारवाईची चौकशी आणि इतर सुधारणांबाबतच्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचे आंदोलकांनी म्हटले आहे.

त्यामुळे हाँगकाँगमध्ये पुन्हा एकदा निदर्शनांना वेग आला असून त्याची व्याप्ती पुन्हा एकदा वाढत असल्याचे दिसू लागले आहे. रविवारी हाँगकाँगमधील शेकडो निदर्शकांनी शहरातील अमेरिकेच्या दूतावासासमोर ठाण मांडले. यावेळी निदर्शकांच्या हातात ‘प्रेसिडंट ट्रम्प, प्लीज लिबरेट हाँगकाँग’, ‘ह्युमन राईटस्’, ‘डेमोक्रसी’ असे फलकही झळकत होते. त्याचवेळी निदर्शकांकडून ‘प्रेसिडंट ट्रम्प, प्लीज स्टँड विथ हाँगकाँग’, ‘फाईट फॉर फ्रीडम’ अशा घोषणाही देण्यात आल्या.

अमेरिकेच्या संसदेत हाँगकाँगमधील आंदोलनाच्या मुद्यावरून एक विधेयक मांडण्यात आले आहे. त्यात आंदोलकांविरोधात कारवाई करणार्‍या व त्याबाबतच्या निर्णयांमध्ये सहभागी असणार्‍या चिनी तसेच हाँगकाँगमधील अधिकार्‍यांवर निर्बंध लादण्याची तरतूद आहे. चीन तसेच हाँगकाँगमधील चीनधर्जिण्या प्रशासनाने या विधेयकावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. चीनच्या सत्ताधारी राजवटीने यापूर्वीही वारंवार अमेरिका हाँ

गकाँगमधील आंदोलनात हस्तक्षेप करीत असल्याचे आरोप केले असून त्याचा उल्लेख ‘ब्लॅक हँडस्’ असा केला होता. हाँगकाँगच्या आंदोलनात अमेरिका तसेच ब्रिटनचे राष्ट्रध्वजही झळकवण्यात आले होते.

अमेरिकेचे संरक्षणमंत्री मार्क एस्पर यांनी शनिवारी एका वक्तव्यात, चीनच्या सत्ताधारी राजवटीने हाँगकाँगबाबत संयम दाखवावा, असे बजावले होते. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या महिन्यात हाँगकाँग मुद्यावर भूमिका स्पष्ट करताना, चीन ही समस्या मानवतावादी भूमिकेतून व चर्चा करून सोडवेल, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. या पार्श्‍वभूमीवर हाँगकाँगमधील निदर्शकांकडून थेट अमेरिकी राष्ट्राध्यक्षांना करण्यात आलेले आवाहन लक्ष वेधून घेणारे ठरते.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info