नायजर लष्कराच्या कारवाईत ‘बोको हराम’चे २८०हून अधिक दहशतवादी ठार

निआमे – आफ्रिकेच्या पश्‍चिम भागातील ‘नायजर’ देशाच्या लष्कराने ‘बोको हराम’ या दहशतवादी संघटनेविरोधात केलेल्या मोठ्या कारवाईत तब्बल २८०हून अधिक दहशतवाद्यांना ठार केले. ‘लेक चाड’ व ‘योबे रिव्हर’ भागात चढविलेल्या हवाईहल्ल्यांमध्ये किमान २०० तर लष्करी कारवाईत ८७ दहशतवादी ठार झाल्याची माहिती नायजरच्या संरक्षण विभागाने दिली. नायजरकडून ‘बोको हराम’विरोधात करण्यात आलेली ही सर्वात मोठी कारवाई मानली जाते.

गेल्या वर्षभरात ‘बोको हराम’ ही दहशतवादी संघटना पुन्हा एकदा प्रबळ झाल्याचे संकेत मिळत होते. या दहशतवादी संघटनेने नायजेरिया, चाड, नायजर या देशांमध्ये सातत्याने हल्ले केले असून त्यात लष्करी तळांनाही लक्ष्य करण्यात आले होते. २०१८ साली ‘बोको हराम’ने या तीन देशांमध्ये चढविलेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये हजारांहून अधिक जणांचा बळी गेला असून त्यात सैनिकांचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे. ‘नायजेरिया’च्या लष्कराने २०१८ साली केलेल्या कारवाईत ‘बोको हराम’चा पराभव केल्याचा दावा केला होता. मात्र त्यानंतरही या दहशतवादी संघटनेकडून होणारे हल्ले सातत्याने वाढत असल्याचे समोर आले होते.

या पार्श्‍वभूमीवर, ‘नायजर’ लष्कराने गेल्या आठवड्यात केलेली कारवाई लक्ष वेधून घेणारी ठरते. शुक्रवारी २८ डिसेंबरपासून नायजर लष्कराने दहशतवादविरोधी मोहीम हाती घेतली होती. ‘लेक चाड’ व ‘कोमादोगु योबे रिव्हर’ भागातील छोट्या बेटांवर हवाईहल्ले चढविण्यात आले. हवाईहल्ल्यानंतर नायजर लष्कराच्या तुकड्यांनी जमिनीवरून कारवाई करून ‘बोको हराम’च्या जागांवर हल्ले केले. जमिनीवरुन केलेल्या कारवाईत जवळपास ८७ दहशतवाद्यांना ठार करण्यात आले असून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

‘नायजर’ लष्कराच्या हवाईहल्ल्यांमध्ये २०० दहशतवादी मारले गेल्याचे सांगण्यात येत असले, तरी ही आकडेवारी वाढू शकते असे संकेत देण्यात आले आहेत. गेल्या काही महिन्यात ‘बोको हराम’ने नायजेरियाच्या लष्करी तळांवर मोठ्या प्रमाणात हल्ले केले होते. या हल्ल्यांनंतर ‘बोको हराम’ नायजरला लक्ष्य करेल, अशी भीती वर्तविण्यात आली होती. नोव्हेंबर महिन्यात पश्‍चिम आफ्रिकी देशांची या मुद्यावर विशेष बैठकही घेण्यात आली होती. याच बैठकीत, ‘बोको हराम’कडे ‘ड्रोन्स’ असून लष्करावरील हल्ल्यांसाठी टेहळणी करण्यासाठी त्याचा वापर होत असल्याचा खळबळजनक दावा नायजेरियाच्या राष्ट्राध्यक्षांनी केला होता.

 English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info