Breaking News

परग्रहवासियांच्या तबकड्यांचे व्हिडिओ खरे – अमेरिकी नौदलाची कबुली

वॉशिंग्टन – अमेरिकी प्रसारमाध्यमे व सार्वजनिक संस्थेकडून प्रदर्शित करण्यात आलेले उडत्या तबकड्यांचे तिन्ही व्हिडिओ खरे असल्याची कबुली अमेरिकी नौदलाकडून देण्यात आली आहे. उडत्या तबकड्यांबाबत (अनआयडेंटिफाईड फ्लाईंग ऑब्जेक्ट) अशा रितीने उघड कबुली दिली जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. या कबुलीमुळे प्रसारमाध्यमे व सोशल मीडियावर परग्रहवासिय तसेच उडत्या तबकड्यांच्या मुद्यावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

अमेरिकेच्या ‘एफ-१८’ या लढाऊ विमानाच्या गन कॅमेर्‍यातून नोव्हेंबर २००४, जानेवारी २०१५ या महिन्यात तीन घटना चित्रित करण्यात आल्या होत्या. या तिन्ही व्हिडिओंमध्ये उडत्या तबकड्यांप्रमाणे गोष्टी दिसत असून विमानातील वैमानिकही त्याबद्दल बोलत असल्याचे दाखविण्यात आले आहे. या व्हिडिओंना ‘गिंबल’, ‘फ्लिर१’ व ‘गो फास्ट’ अशी नावेही देण्यात आली आहेत.

‘टॉम डिलॉंज’, ‘टू द स्टार्स ऍकॅडमी ऑफ आर्टस् ऍण्ड सायन्स’ आणि ‘द न्यूयॉर्क टाईम्स’ यांनी एकत्र येऊन २०१७ व २०१८ साली हे तिन्ही व्हिडिओ प्रदर्शित केले होते. त्यानंतर अमेरिकेचे माजी सिनेटर हॅरी रीड यांनी या घटनेची चौकशी करावी अशी मागणी केली होती. त्यानंतर ‘पेंटॅगॉन’ने याबाबत स्वतंत्र चौकशीही सुरू केल्याचे उघड झाले होते. या मुद्यावर अमेरिकेच्या संरक्षण विभागाने संसदीय समितीच्या निवडक सदस्यांना माहिती दिल्याचे वृत्तही प्रसिद्ध झाले होते.

जुलै महिन्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘फॉक्स न्यूज’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत या घटनेचा उल्लेख केला होता. मुलाखतीत ट्रम्प यांनी, उडत्या तबकड्यांच्या (अनआयडेंटिफाईड फ्लाईंग ऑब्जेक्ट) प्रश्‍नावर उत्तर देताना, आपला त्यावर विश्‍वास नाही, पण काहीही शक्य आहे, असे उत्तर दिले होते. आता अमेरिकी नौदलाच्या कबुलीमुळे हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर येण्याचे संकेत मिळाले आहेत.

अमेरिकी नौदलाने आपल्या कबुलीत ‘अनआयडेंटिफाईड फ्लाईंग ऑब्जेक्ट’ असा उल्लेख न करता ‘अनआयडेंटिफाईड एरिअल फेनॉमेना’ असे म्हंटले आहे.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info