Breaking News

चीनच्या राष्ट्राध्यक्षांचे ‘एक देश, दोन व्यवस्था’चा प्रस्ताव धुडकावून हॉंगकॉंगमधील आंदोलकांची तीव्र निदर्शने

बीजिंग/हॉंगकॉंग – चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी मंगळवारी राजधानी बीजिंगमध्ये झालेल्या ‘नॅशनल डे’ कार्यक्रमात ‘एक देश, दोन व्यवस्था’चा नव्याने प्रस्ताव दिला. मात्र राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्या या आश्‍वासनाचा हॉंगकॉंगमधील आंदोलकांवर काडीचाही परिणाम झाला नसल्याचे मंगळवारी झालेल्या निदर्शनांमधून दिसून आले. उलट हॉंगकॉंगमधील निदर्शकांनी चीनचा ‘नॅशनल डे’ म्हणजे शोकदिन असल्याची संभावना करीत राष्ट्रध्वजही पेटविला. यावेळी सुरक्षायंत्रणांनी केलेल्या कारवाईत एका निदर्शकाला गोळी लागली असून ३० जण जखमी झाल्याचे समोर आले.

चीनमध्ये कम्युनिस्ट राजवट स्थापन झाल्याला ७० वर्षे पूर्ण झाली असून १ ऑक्टोबर हा दिवस ‘नॅशनल डे’ म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी चीनसह हॉंगकॉंग, मकाव अशा चीनशी जोडलेल्या सर्व वसाहतींमध्ये रोषणाई, संचलन, ध्वजवंदन असे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. मात्र यावर्षीच्या ‘नॅशनल डे’वर हॉंगकॉंगमधील आंदोलनाचे सावट असल्याने त्याकडे आंतरराष्ट्रीय समुदायाचे विशेष लक्ष होते.

हॉंगकॉंगमध्ये गेल्या चार महिन्यांपासून सुरू असणारे चीनविरोधी आंदोलन थंड करण्यासाठी सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच वादग्रस्त प्रत्यार्पण विधेयक मागे घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर विविध नागरी गटांशी चर्चाही सुरू करण्यात आली होती. मात्र हॉंगकॉंगमधील आंदोलकांवर त्याचा कोणताही परिणाम झालेला नसून उलट आंदोलन अधिकच चिघळल्याचे दिसत आहे. चीनची राजधानी बीजिंगमध्ये राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी हॉंगकॉंगमधील आंदोलनावर बोलण्याचे टाळले असले तरी ‘एक देश, दोन व्यवस्था’चा पुनरुच्चार हॉंगकॉंगलाच उद्देशून होता, असे मानले जाते.

त्याचवेळी जगातील कोणताही देश अथवा शक्ती चीनच्या राजवटीला प्रगतीपासून रोखू शकत नाही, असे सांगून जिनपिंग यांनी हॉंगकॉंगमध्ये हस्तक्षेप करणार्‍या देशांनाही सज्जड इशारा दिला. मात्र हा इशाराही आंदोलकांनी धुडकावून लावल्याचे मंगळवारी हॉंगकॉंगच्या विविध भागांमध्ये झालेल्या निदर्शनांवरून दिसून आले. चीनच्या सत्ताधार्‍यांविरोधात असलेला तीव्र असंतोष आंदोलकांनी जाळपोळ तसेच चीनधर्जिण्या उपक्रमांना लक्ष्य करून व्यक्त केला. निदर्शकांना रोखण्यासाठी हॉंगकॉंगमधील सुरक्षायंत्रणांनी ‘लाईव्ह राऊंड्स’चा वापर केला असून एका निदर्शकाला छातीवर गोळी लागल्याची गंभीर घटना समोर आली आहे.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info