अमेरिकेचे ‘चॅम्प’ क्षेपणास्त्र तैनात – ब्रिटिश वृत्तपत्राचा दावा

अमेरिकेचे ‘चॅम्प’ क्षेपणास्त्र तैनात – ब्रिटिश वृत्तपत्राचा दावा

वॉशिंग्टन – शत्रूची बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे, लष्करी तळ, रडार यंत्रणा आणि आतापर्यंत अतिसंरक्षित मानल्या जाणार्‍या बंकर्समधील सुरक्षा यंत्रणा निकामी करणारी ‘चॅम्प’ क्षेपणास्त्रे अमेरिकेने विकसित केली आहेत. अमेरिकेच्या वायुसेनेने अशी २० क्षेपणास्त्रे जगभरात तैनात केली असून या क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यांमुळे जीवितहानी टाळता येईल, असा दावा ब्रिटनच्या वृत्तपत्राने केला आहे. सध्या अमेरिकेने ही क्षेपणास्त्रे इराण व उत्तर कोरियाविरोधात तैनात केल्याचे या वृत्तपत्राने म्हटले आहे.

इराणने आखातातील अमेरिकेच्या हितसंबंधांवर हल्ले चढविण्याची धमकी दिली आहे. अमेरिकेने देखील आखातात सैन्यतैनाती वाढविल्यामुळे कोणत्याही क्षणी अमेरिका व इराणमध्ये युद्धाचा भडका उडू शकतो, असे बोलले जाते. असे झाले तर आखातात मोठ्या प्रमाणात जीवितहानी होईल, अशी टीकाही जगभरातून केली जात आहे. पण अमेरिकेने विकसित आणि तैनात केलेल्या एका क्षेपणास्त्रामुळे इराणबरोबरच्या युद्धात जीवितहानी होणार नाही आणि इराण देखील गुडघ्यावर येईल, असा दावा एका वरिष्ठ शोध पत्रकाराने केला आहे.

अमेरिकेतील आघाडीच्या वृत्तपत्रांमध्ये शोधपत्रकार राहिलेल्या आणि गाजलेल्या पुस्तकांचे लेखक ‘रोनाल्ड केस्लर’ यांनी ब्रिटनच्या वृत्तपत्राशी बोलताना अमेरिकेच्या ‘चॅम्प’ या क्षेपणास्त्राची माहिती उघड केली. ‘काऊंटर-इलेक्ट्रॉनिक्स हाय पॉवर मायक्रोवेव्ह अ‍ॅडव्हान्स्ड् मिसाईल प्रोजेक्ट’ (चॅम्प) या नावाने ओळखले जाणारे हे क्षेपणास्त्र ‘हाय पॉवर मायक्रोवेव्हज्’चा (एचपीएम) वापर करून तयार केले आहे. ‘चॅम्प’ क्षेपणास्त्रातून उत्सर्जित होणार्‍या ‘एचपीएम’मुळे शत्रूची मारकक्षमता संपुष्टात येते, असा दावा केस्लर यांनी केला. तर चॅम्प क्षेपणास्त्राच्या तैनातीमुळे ‘कल्पनेच्याही पलिकडच्या गोष्टी आता प्रत्यक्षात उतरल्याचे दिसत आहे’, अशी प्रतिक्रिया या क्षेपणास्त्रावर काम करणार्‍या बोईंग कंपनीचे जनरल मॅनेजर ‘किथ कोलमन’ यांनी दिली.

अमेरिकेतील सर्वात मोठी शस्त्रनिर्मिती कंपनी ‘बोईंग’ गेली दहा वर्षे ‘एचपीएम’ प्रोजेक्टवर काम करीत होती. अमेरिकेच्या वायुसेनेशी संबंधित या प्रोजेक्टमध्ये ‘मायक्रोवेव्ह’ किंवा ‘अतिलघु रेडिओलहरी’ंचा वापर करून क्षेपणास्त्राची निर्मिती सुरू होती. २०१२ साली बोईंग आणि अमेरिकेच्या वायुसेनेने यशस्वीरित्या अतिलघु रेडिओलहरींवर आधारित ‘चॅम्प’चू निर्मिती व त्यानंतर यशस्वी चाचणी घेतली होती. पण तत्कालिन ओबामा प्रशासनाने या क्षेपणास्त्रांना अमेरिकेने वायुसेनेमध्ये तैनात करण्यास नकार दिला होता, अशी माहिती केस्लर यांनी दिली.

मात्र दोन वर्षांपूर्वी केस्लर यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे तत्कालिन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ‘एच. आर. मॅकमास्टर’ यांनी या क्षेपणास्त्राबाबत सांगितले. त्यानंतर ट्रम्प प्रशासनाने ‘चॅम्प’च्या प्रोजेक्टला फंडिंग जाहीर केले आणि वायुसेनेच्या जगभरातील तळांवर या क्षेपणास्त्रांची तैनाती करण्याचे आदेश दिले. ‘चॅम्प’ क्षेपणास्त्रे वायुसेनेच्या ‘बी-५२’ या अण्वस्त्रवाहू बॉम्बर विमानांमध्ये तैनात आहेत. ही बॉम्बर विमाने सध्या पर्शियन आखात, गुआम बेटांवर तैनात आहेत. या क्षेपणास्त्रांची मारक क्षमता ७०० मैल असून शत्रूच्या हद्दीत कमी उंचीवरुन ‘चॅम्प’ क्षेपणास्त्रे प्रवास करू शकतात.
‘चॅम्प’ क्षेपणास्त्रांना प्रक्षेपित करण्यासाठी इलेक्ट्रोमॅग्नेटिक तोफांचा वापर केला जातो. त्यामुळे ही क्षेपणास्त्रे वेगाने प्रवास करतात. शत्रूच्या हद्दीत पोहोचल्यानंतर ही क्षेपणास्त्रे कार्यरत होतात. कमी उंचीवरुन प्रवास करताना सदर क्षेपणास्त्रे रेडिओलहरी अर्थात ‘एचपीएम’ प्रवाहित करतात. त्यामुळे कॉम्प्युटर चिप्स किंवा इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानाशी जोडलेली क्षेपणास्त्रे, रडार यंत्रणा निकामी होतात. ‘एचपीएम’च्या लहरी लष्करी तळावरील सर्व इलेक्ट्रॉनिक गोष्टी अकार्यक्षम करतात.

याची यशस्वी चाचणी अमेरिकेच्या हवाईतळावर घेण्यात आली होती, असे केस्लर यांनी ब्रिटिश वृत्तपत्राशी बोलताना सांगितले. या चाचणीत वायुसेनेच्या तळावरील सीसीटीव्ही कॅमेरे निकामी झाले. पण कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. त्यामुळे सदर क्षेपणास्त्र सर्वात खतरनाक असल्याचा दावा केस्लर यांनी केला आहे.

English हिंदी

 

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info