जगातील शक्तिशाली देशांचा ‘क्लब’ डॉलरपासून दूर चालला आहे – अमेरिकी विश्‍लेषिकेचा दावा

जगातील शक्तिशाली देशांचा ‘क्लब’ डॉलरपासून दूर चालला आहे – अमेरिकी विश्‍लेषिकेचा दावा

वॉशिंग्टन – चीन व रशियासह युरोपिय देशांचा समावेश असलेला सामर्थ्यशाली देशांचा ‘क्लब’ अमेरिकी डॉलरपासून दूर चालला असून डॉलरचे ‘प्रमुख आंतरराष्ट्रीय चलन’ हे स्थान धोक्यात येत आहे, असा दावा अमेरिकी विश्‍लेषिका अ‍ॅन कॉरिन यांनी केला. गेल्या काही वर्षात आकार घेत असलेला ‘पेट्रो-युआन’ ही अमेरिकी डॉलरचे वर्चस्व संपत असल्याचे सांगणारी ‘अर्ली वॉर्निंग सिस्टिम’ असल्याचेही कॉरिन यांनी बजावले.

कॉरिन या अमेरिकेतील ‘इन्स्टिट्यूट फॉर अ‍ॅनॅलिसिस ऑफ ग्लोबल सिक्युरिटी’ या अभ्यासगटाच्या सहसंचालक असून अमेरिकी सरकारच्या ‘एनर्जी सिक्युरिटी कौन्सिल’च्या सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. काही महिन्यांपूर्वीच त्यांचे ‘डि-डॉलरायझेशन: द रिव्हॉल्ट अगेन्स्ट द डॉलर अ‍ॅण्ड द राईज ऑफ ए न्यू फायनान्शिअल वर्ल्ड ऑर्डर’ नावाचे पुस्तकही प्रसिद्ध झाले आहे. यात त्यांनी अमेरिकी डॉलरच्या वर्चस्वाला गेल्या दशकभरात मिळणारे आव्हान, जगातील विविध चलनांच्या वर्चस्वात होत गेलेले बदल यासारख्या गोष्टींचा वेध घेतला आहे.

अमेरिकेतील एका खाजगी वृत्तवाहिनीतील कार्यक्रमात कॉरिन यांनी, डॉलरचे वर्चस्व संपण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचा दावा करून जगातील आघाडीचे देश त्याला अधिक वेग देण्यास उत्सुक असल्याचे बजावले. ‘पुढे काय होणार आहे, याची आपल्याला कल्पना नाही, मात्र सध्याची स्थिती कायम टिकणारी नाही. डॉलर नको असलेल्या देशांचा गट वाढतो आहे आणि त्यात सामर्थ्यशाली देशांचा समावेश आहे, हे लक्षात ठेवायला हवे’, असे कॉरिन यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी अमेरिकेने इराण अणुकरारातून बाहेर पडण्याबाबत घेतलेल्या एकतर्फी निर्णयाकडे लक्ष वेधले. ‘युरोपिय देशांना इराणशी व्यापार करायचा आहे. त्याचवेळी त्यांना अमेरिकी कायद्याच्या कचाट्यातही अडकायचे नाही. अमेरिकेची मर्जी नसलेल्या देशांबरोबर व्यवहार करून अडकण्याची कोणाचीही इच्छा नाही. त्यामुळे युरोपिय देशांचा डॉलरला व्यवहारांमधून वगळण्याकडे असलेला कल अधिकच वाढतो आहे’, याची जाणीव अमेरिकी विश्‍लेषिकेने करून दिली.

                   

चीन व रशियाच्या वाढत्या सहकार्यातून तयार झालेल्या ‘पेट्रो युआन’चा उल्लेख करताना ही बाब अमेरिकी डॉलरला आंतरराष्ट्रीय स्तरावरून हद्दपार करण्यासाठी महत्त्वाची गोष्ट ठरु शकते, असा दावा कॉरिन यांनी केला. मात्र त्याचवेळी फक्त ‘पेट्रो युआन’ अमेरिकी डॉलरचे वर्चस्व संपवून त्याची जागा घेण्यासाठी सक्षम नाही, असा इशाराही दिला.

गेल्या काही वर्षात रशिया व चीनकडून अमेरिकी डॉलरला व्यापार तसेच व्यवहारांमधून हद्दपार करण्यासाठी सातत्याने आक्रमक पावले उचलण्यात आली आहेत. चीनच्या युआनला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून मिळालेला दर्जा आणि सोने, इंधन यासारख्या प्रमुख वस्तूंसाठी विकसित केलेली स्वतंत्र व्यवस्था यातून चीनने डॉलरचा प्रभाव कमी करण्यास सुरुवात केली आहे. तर रशियाने सोन्याचे राखीव साठे वाढवून तसेच परकीय गंगाजळीतील डॉलरचा हिस्सा नगण्य करून आपले इरादे स्पष्ट केले आहेत.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info