पॅसिफिक महासागरात अमेरिकेच्या आण्विक कचर्‍याची गळती झाल्याचा दावा – ‘मार्शल आयलंडस्’वरील ‘न्यूक्लिअर टॉम्ब’मध्ये आठ कोटी लीटर्स आण्विक कचर्‍याचा साठा

पॅसिफिक महासागरात अमेरिकेच्या आण्विक कचर्‍याची गळती झाल्याचा दावा – ‘मार्शल आयलंडस्’वरील ‘न्यूक्लिअर टॉम्ब’मध्ये आठ कोटी लीटर्स आण्विक कचर्‍याचा साठा

मार्शल आयलंडस् – अमेरिकेने ‘असोसिएटेड स्टेट’ असा दर्जा दिलेल्या पॅसिफिक महासागरातील ‘मार्शल आयलंडस्’मधून आण्विक गळती सुरू झाल्याचा दावा करण्यात आला आहे. ‘मार्शल आयलंडस्’वरील एका बेटावर अमेरिकेने विविध अण्वस्त्र चाचण्यांमधून जमा झालेला तब्बल आठ कोटी ३२ लाख लीटर्स इतका प्रचंड आण्विक कचरा (न्यूक्लिअर वेस्ट) एकत्र ठेवला आहे. आण्विक कचरा ठेवलेल्या या प्रकल्पातून थेट पॅसिफिक महासागरात गळती सुरू झाल्याचा धक्कादायक दावा संशोधक तसेच प्रसारमाध्यमांनी केला.

१९४० ते १९६०च्या दशकांदरम्यान अमेरिकेने पॅसिफिक महासागरातील ‘मार्शल आयलंडस्’ भागात अनेक अणुचाचण्या घेतल्या होत्या. यात १९५४ साली घेतलेल्या तब्बल १५ मेगाटन क्षमतेच्या ‘थर्मोन्यूक्लिअर वॉरहेड’च्या चाचणीचाही समावेश आहे. ‘कॅसल ब्रॅव्हो’ नावाच्या अण्वस्त्राची ही चाचणी अमेरिकेने घेतलेली सर्वात मोठी अण्वस्त्रचाचणी म्हणून ओळखण्यात येते. या चाचणीसह इतर सर्व अणुचाचण्यांमधून निर्माण झालेला कचरा व इतर संबंधित घटक यांची विल्हेवाट लावण्याचे आदेश १९७०च्या दशकात देण्यात आले होते.

त्यानंतर १९७७ ते १९८० या चार वर्षांच्या कालावधीत अमेरिकेच्या सुमारे चार हजार जवानांनी आण्विक कचर्‍यासह इतर घटक ‘मार्शल आयलंडस्’चा भाग असणार्‍या ‘एनेवेटक अ‍ॅटॉल’ भागातील एका छोट्या बेटावर पुरले. त्यावर एक प्रचंड आकाराचे काँक्रिटचे झाकणही बसविण्यात आले. आण्विक कचरा ठेवलेल्या या भागाला ‘रुनिट डोम’ असे नाव देण्यात आले. स्थानिक रहिवाशी व संशोधकांमध्ये ही जागा ‘न्यूक्लिअर टॉम्ब’ या नावाने ओळखण्यात येते.

‘मार्शल आयलंडस्’ भागातून मोठ्या प्रमाणावर किरणोत्सर्ग होत असल्याची माहिती या भागात संशोधन करणार्‍या विविध गटांनी दिली आहे. ‘कोलंबिया युनिव्हर्सिटी’ने केलेल्या अभ्यासानुसार, ‘मार्शल आयलंडस्’मधून होणारा किरणोत्सर्ग रशियाच्या ‘चेर्नोबिल’ तसेच जपानच्या ‘फुकुशिमा’मध्ये झालेल्या दुर्घटनांपेक्षा जास्त आहे. त्याचवेळी हवामानबदलामुळे समुद्रसपाटीनजिक असणारे ‘मार्शल आयलंडस्’ येत्या काही दशकात पूर्णपणे पाण्याखाली जाण्याची भीतीही वर्तविण्यात आली आहे.

असे झाल्यास ‘न्यूक्लिअर टॉम्ब’मधून कोट्यवधी लीटर्सचा आण्विक कचरा पॅसिफिक महासागरात पसरून हाहाकार उडेल, असा इशारा संशोधक तसेच स्थानिकांकडून देण्यात येत आहे. या कचर्‍यात ‘प्लुटोनियम’सारख्या घातक संयुगाचाही समावेश आहे. काही संशोधकांनी अशा प्रकारची गळती सुरू झाली असण्याची भीतीही व्यक्त केली आहे.

अमेरिकेने ‘मार्शल आयलंडस्’मधील काहीशे रहिवाशांचे स्थलांतर केले असून ४० लाख डॉलर्सच्या भरपाईव्यतिरिक्त काहीही देण्यास नकार दिला आहे. आता यापुढे ‘न्यूक्लिअर टॉम्ब’ची जबाबदारी ‘मार्शल आयलंडस्’ प्रशासनाची असल्याची भूमिका अमेरिकी प्रशासनाने घेतली आहे. त्यामुळे स्थानिक रहिवासी व प्रशासनात प्रचंड नाराजीची भावना असून जी गोष्ट अमेरिकेनेच उभारली त्याची जबाबदारी आमची कशी असू शकते, असा प्रश्‍न विचारला जात आहे.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info