Breaking News

तैवानच्या संसदेत चीनविरोधी विधेयक पारित – चीनसमर्थक पक्षांची जोरदार टीका

तैपेई – तैवानमधील चीनचा वाढता प्रभाव व चीनसमर्थक धोरण राबविणार्‍यांच्या विरोधात राष्ट्राध्यक्षा ‘त्साई ईंग-वेन’ यांनी संसदेसमोर सादर केलेले विधेयक मंजूर झाले आहे. तैवानमधील राष्ट्राध्यक्ष निवडणुकीला अवघे दोन आठवडे शिल्लक असताना सदर विधेयक संमत करण्यात आले. पण तैवानचा विरोधी पक्ष असलेल्या ‘कुओमिंतांग’ने (केएमटी) यावर आक्षेप घेऊन जोरदार टीका केली आहे.

गेल्या महिन्यात तैवानच्या राष्ट्राध्यक्षा ‘त्साई’ यांनी संसदेसमोर महत्त्वाचा प्रस्ताव मांडला होता. हाँगकाँगमधील घडामोडी लक्षात घेता तैवानवरील चीनचा प्रभाव वाढू नये यासाठी राष्ट्राध्यक्षा ‘त्साई’ यांनी ‘अँटी-इन्फिल्ट्रेशन बिल’ आणले होते. या विधेयकामुळे चीनधार्जिण्या गटांचा प्रभाव रोखण्यास सहाय्य होईल, असा दावा राष्ट्राध्यक्षा ‘त्साई’ यांनी केला होता.

गुरुवारी तैवानच्या संसदेमध्ये सदर विधेयक संमत झाले. या विधेयकाचा विरोध करणार्‍या ‘केएमटी’ पक्षाचे सदस्य यावेळी अनुपस्थित राहिले. त्यामुळे राष्ट्राध्यक्षा ‘त्साई’ यांचे प्रस्तावित विधेयक बिनविरोध संमत झाले. याअंतर्गत परदेशी सैनिक किंवा गटांचा तैवानमधील हस्तक्षेपाच्या विरोधात कठोर कारवाईची तरतूद करण्यात आली आहे. तैवानच्या राजकीय, लष्करी व सामाजिक क्षेत्रावर प्रभाव टाकणे, राजकीय पक्षांना देणगी देणे, समाजव्यवस्था बिघडवणे किंवा निवडणुकीसंदर्भात चुकीच्या माहितीचा प्रचार करणे हा यामुळे गुन्हा ठरणार आहे.

असे गुन्हे करणार्‍यांना पाच वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा आणि तीन लाख डॉलर्सहून अधिक दंड भरावा लागणार आहे. त्यामुळे तैवानमधील चीनसंलग्न गटांच्या हालचालींना जोरदार धक्का बसला आहे. राष्ट्राध्यक्षा ‘त्साई’ यांनी लागू केलेल्या या विधेयकाचे परिणाम तैवानच्या राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीत पहायला मिळतील, असा इशारा ‘केएमटी’ने दिला आहे.

दरम्यान, ११ जानेवारी रोजी तैवानमध्ये सार्वत्रिक निवडणूक होत असून यावर प्रभाव टाकण्यासाठी व हाँगकाँगप्रमाणे तैवानचा घास गिळण्यासाठी चीन आसुसलेला असल्याचा आरोप राष्ट्राध्यक्षा ‘त्साई’ यांनी केला आहे. यासाठीच सदर विधेयकाची आवश्यकता असल्याचा दावा ‘त्साई’ यांनी केला आहे.

तैवानचे लष्करप्रमुख हेलिकॉप्टर दुर्घटनेत ठार

गुरुवारी तैवानच्या उत्तरेकडील भागात ‘ब्लॅक हॉक’ हेलिकॉप्टरला झालेल्या दुर्घटनेत तैवानचे लष्करप्रमुख ‘जनरल शेन यी-मिंग’ यांच्यासह आठ जणांचा बळी गेला. अमेरिकेच्या हेलिकॉप्टरमधील बिघाडामुळे ही दुर्घटना घडल्याचा दावा केला जातो. पण राष्ट्राध्यक्षा ‘त्साई’ यांचे पाठिराखे आणि कट्टर चीनविरोधी असलेल्या जनरल यी-मिंग यांच्या या हेलिकॉप्टर अपघातामागे चीनचा हात असावा, असा संशय तैवानमधील काही वृत्तसंस्था व्यक्त करीत आहेत.
जनरल ‘यी-मिंग’ यांच्या हेलिकॉप्टरला झालेल्या दुर्घटनेची माहिती मिळताच राष्ट्राध्यक्षा ‘त्साई’ यांनी आपले सारे कार्यक्रम रद्द केले असून त्यांच्या पक्षानेही पुढील तीन दिवसांसाठी निवडणूक प्रचार थांबविला आहे.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info