आखाती देशांमध्ये लष्करी हालचाली वाढल्या – लेबेनॉन-सिरियालगतच्या सीमेवर इस्रायलचे रणगाडे तैनात

आखाती देशांमध्ये लष्करी हालचाली वाढल्या – लेबेनॉन-सिरियालगतच्या सीमेवर इस्रायलचे रणगाडे तैनात

लंडन, दि. ४ (वृत्तसंस्था) – अमेरिकेने कासेम सुलेमानी यांना ठार केल्यानंतर, इराणने त्याचा भयंकर सूड घेण्याची धमकी दिली आहे. इराण पुढे काय करील, याची चर्चा सुरू असतानाच, आखातातील लष्करी हालचाली तीव्र झाल्या आहेत. कुवैतमध्ये दाखल झालेले अमेरिकेचे सैनिक इराकमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. तर इराण तसेच इराणसमर्थक गटांच्या हल्ल्याची शक्यता बळावल्यानंतर इस्रायलने आपल्या लेबेनॉन व सिरिया लगतच्या सीमेवर रणगाडे तैनात केले आहेत.

मेजर जनरल कासेम सुलेमानी यांच्या हत्येचा सूड घेण्यासाठी अमेरिकेचा निकटतम मित्रदेश असलेल्या इस्रायलवर लाखो रॉकेट्सचा मारा करू शकतो. इराणच्या वरिष्ठ लष्करी अधिकार्‍यांनी तसेच लेबेनॉनमधील हिजबुल्लाह, येमेनमधील हौथी तसेच इराकमधील इराणसंलग्न दहशतवाद्यांनी अशी धमकी याआधी दिली होती. ही शक्यता लक्षात घेऊन इस्रायलचे पंतप्रधान नेत्यान्याहू ग्रीसचा दौरा अर्धवट सोडून मायदेशी परतले आहेत.

गेल्या काही तासात इस्रायलने लेबेनॉन व सिरिया सीमेवर आपल्या सैनिकांची तैनाती वाढविली. तसेच लेबेनॉन व सिरियातून रॉकेट हल्ल्यांची शक्यता ओळखून इस्रायलने या दोन्ही देशांच्या सीमेजवळ रणगाड्यांची फौज तैनात केली आहे. या व्यतिरिक्त लढाऊ विमानांना सतर्कतेचे आदेश दिले असून इस्रायलने जगभरातील आपल्या दूतावासांची सुरक्षा देखील वाढविली आहे.

हिजबुल्लाह प्रमुख हसन नसरल्ला याने देखील सुलेमानी यांच्या हत्येचा सूड घेण्याची धमकी दिली आहे. तर सुलेमानी यांचे कार्य थांबणार नसल्याचे सिरियातील इराणसंलग्न गटांनी जाहीर केले आहे. सिरियातील या इराणसंलग्न गटांनी इस्रायलच्या गोलान सीमेलगतच्या भागात मोठ्या प्रमाणात तळ ठोकले आहेत. त्यामुळे सिरियातून इस्रायलवर हल्ल्याचा धोका वाढल्याचा दावा पाश्‍चिमात्य विश्‍लेषक करीत आहेत.

इराण पर्शियन आखाताची कोंडी करून जगभरातील इंधन तसेच व्यापारी वाहतुकीची मोठ्याप्रमाणात गळचेपी करू शकतो. या पार्श्‍वभूमीवर, अमेरिकेने आखाती देशांसाठी अतिरिक्त सैनिकांची तैनाती करण्याचे संकेत दिले आहेत. या व्यतिरिक्त कुवैतमध्ये दाखल झालेल्या अमेरिकेच्या सैनिकांनी इराकच्या दक्षिण सीमेतून प्रवेश करण्याची तयारी केली आहे.

दरम्यान, आखातात संघर्ष भडकू नये, असे आवाहन करणार्‍या ब्रिटन व फ्रान्सने देखील आपल्या लष्कराला सज्जतेचे आदेश दिले आहेत. नाटोने देखील आखातातील परिस्थितीवर आपली नजर असल्याची माहिती देऊन आपल्या सज्जतेचे संकेत दिले आहेत. 

English

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info