Breaking News

पाकिस्तानी लष्कराचे तालिबानबरोबर ‘सिक्रेट डिल’ – पाकिस्तानच्या कैदेतून फरार झालेल्या तालिबानच्या प्रवक्त्याचा दावा

इस्लामाबाद – पाकिस्तानच्या लष्करी तुरुंगातून पलायन केलेल्या तालिबानचा प्रवक्ता ‘एहसानुल्ला एहसान’ याने खळबळजनक दावा केला. ‘‘तालिबान आणि पाकिस्तानी लष्करामध्ये ‘सिक्रेट डिल’ झाले आहे. आपली कैद देखील याच गोपनीय कराराचा भाग होती’’, असा हादरवून सोडणारा दावा एहसान याने प्रसिद्ध केलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये केला आहे. तालिबानच्या प्रवक्त्याने प्रसिद्ध केलेल्या या माहितीमुळे, पाकिस्तानी लष्कर आणि तालिबानमधील घनिष्ठ संबंध पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय समुदायासमोर आले आहे. यामुळे पाकिस्तान चांगलाच अडचणीत सापडला आहे.

गेल्या महिन्यात ११ जानेवारी रोजी तालिबानचा प्रवक्ता एहसानुल्ला एहसान पाकिस्तानी लष्कराच्या तुरुंगातून पलायन केले होते. पाश्‍चिमात्य माध्यमांनी तालिबानच्या प्रवक्त्याच्या या पलायनाची बातमी प्रसिद्ध केली होती. पाकिस्तानी लष्कराच्या कैदेतून तालिबानचा प्रवक्ता त्याच्या कुटुंबियांसह कसा फरार होतो? असे प्रश्‍नही माध्यमांनी उपस्थित केले होते. पण पाकिस्तान सरकार तसेच लष्कराने यावर प्रतिक्रिया देण्याचे टाळले होते.

मात्र तालिबानचा प्रवक्ता एहसान यानेच ऑडिओ क्लिपद्वारे याचा खुलासा केला आहे. ‘‘५ फेब्रुवारी २०१७ साली मी पाकिस्तानी लष्कराला शरण गेलो होतो. पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणेबरोबर झालेल्या ‘सिक्रेट डिल’च्या पार्श्‍वभूमीवर मी स्वत:ला अटक करून घेतली होती. तीन वर्षे अतिसंयमाने मी या कराराचा आदर केला. पण पाकिस्तानी लष्करानेच आमच्यात झालेल्या कराराचे उल्लंघन केले’’, असा आरोप तालिबानच्या प्रवक्त्याने केला. ‘येत्या काळात तालिबानबरोबर झालेल्या या सिक्रेट डिलबाबत आणि यात सहभागी असलेल्या पाकिस्तानी लष्कराच्या अधिकार्‍यांबाबत आपण खुलासा करू’, असेही एहसान याने जाहीर केले.

तालिबानच्या प्रवक्त्याचा हा खुलासा हादरवून सोडणारा ठरला आहे. गेल्या महिन्यात एहसानच्या पलायनाबाबत मौन पाळणार्‍या पाकिस्तानच्या लष्कराने यावेळेसही तालिबानच्या प्रवक्त्याने केलेल्या दाव्याबाबत बोलण्याचे टाळले आहे. त्यामुळे तालिबानच्या प्रवक्त्याने केलेल्या या दाव्याचे गांभीर्य अधिकच वाढले आहे.

पाकिस्तानी लष्कर व कुख्यात गुप्तचर यंत्रणा ‘आयएसआय’ यांचे दहशतवादी संघटनांशी साटेलोटे असल्याचा आरोप जगभरातून केला जातो. पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणा या दहशतवादी संघटनांना हाताशी धरून देशांतर्गत तसेच भारत व अफगाणिस्तानात या शेजारी देशांमध्ये अस्थैर्य निर्माण करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. भारतातील दहशतवादी हल्ल्यांचा सूत्रधार व अमेरिकेने आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केलेल्या ‘हफीझ सईद’ याला कडेकोट सुरक्षा व्यवस्था पुरविली जात असल्याचेही समोर आले आहे.

दरम्यान, दहशतवादी संघटनांबरोबरचे सहकार्य तोडून त्यांच्यावर कारवाई करा, अन्यथा पाकिस्तानला ब्लॅकलिस्ट करण्याचा इशारा ‘फायनॅन्शियल अ‍ॅक्शन टास्क फोर्स’ने (एफएटीएफ) दिला आहे. अशा परिस्थितीत, तालिबानच्या प्रवक्त्याचा दावा पाकिस्तानवरील कारवाईचा मार्ग मोकळा करणारा ठरू शकतो.

 

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info