Breaking News

सिरियातील इदलिब-अलेप्पो संघर्षामुळे आठ लाखांहून अधिक जण विस्थापित संयुक्त राष्ट्रसंघाचा दावा

दमास्कस, दि. १५ (वृत्तसंस्था) – सिरियाच्या इदलिब प्रांतासह अलेप्पोमध्ये सिरियन सरकार व रशियाचे आक्रमक हल्ले सुरू आहेत. सिरिया व रशियाची ही लष्करी मोहीम जवळपास अडीच महिन्यांहून अधिक काळ सुरू असून त्यामुळे तब्बल आठ लाखांहून अधिक जण विस्थापित झाल्याचा दावा संयुक्त राष्ट्रसंघटनेने केला आहे. दरम्यान, गेल्या चार दिवसात सिरियन बंडखोरांनी इदलिबनध्ये सिरियन सरकारची दोन लष्करी हेलिकॉप्टर्स पाडल्याचा दावा केला आहे.

सिरियातील इदलिबमध्ये राष्ट्राध्यक्ष अस्साद यांच्या राजवटीविरोधात लढणार्‍या दहशतवादी संघटनांचे तळ आहेत. या गटांना तुर्कीचे सहाय्य असून त्यांच्या सहाय्यासाठी तुर्कीने आपले लष्करही तैनात केल्याचे मानले जाते. मात्र अस्साद राजवट व त्याला समर्थन देणार्‍या रशियासाठी इदलिब तसेच अलेप्पो निर्णायक टप्पा मानला जातो. त्यामुळे इदलिब प्रांत व अलेप्पो ताब्यात घेण्यासाठी सिरियन सरकार व रशियाने डिसेंबर महिन्यापासून आक्रमक लष्करी मोहीम हाती घेतली आहे.

सिरिया व रशियाच्या या मोहिमेत गेल्या अडीच महिन्यात शेकडो दहशतवादी मारले गेले असून मोठा भाग ताब्यात घेण्यात यश आले आहे. मात्र त्याचा मोठा फटका या भागातील सिरियन जनतेला बसल्याचे समोर येत आहे. सिरिया-रशियाकडून तुर्कीसमर्थक दहशतवादी गटांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेमुळे आतापर्यंत तब्बल आठ लाखांहून अधिक जणांवर निर्वासित होण्याची वेळ ओढवली आहे.

गेल्या चार दिवसांच्या अवधीत एक लाखांहून अधिक जण विस्थापित झाल्याची माहितीही संयुक्त राष्ट्रसंघाने दिली. या विस्थापितांमुळे सिरिया नव्या मानवतावादी आपत्तीच्या उंबरठ्यावर उभा असल्याचा इशाराही संयुक्त राष्ट्रांकडून देण्यात आला आहे. या भागात अन्नपाणी, औषधे व इतर गोष्टींचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला असून सहाय्य पोहोचविण्यात अडथळे येत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

सिरियन राजवट व रशिया इदलिबमधील आपल्या या कारवाईवर फारसे बोलण्यास तयार नाहीत. यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरून जोरदार टीका होत असतानाही, सिरियन राजवटीने व रशियाने त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून ही कारवाई सुरू ठेवल्याचे दिसत आहे. तुर्कीने या प्रकरणी रशियावर जोरदार आरोप केले असून त्यातून रशिया व तुर्कीत तीव्र मतभेद निर्माण झाल्याचे समोर येत आहे. काही दिवसांपूर्वीच अस्साद राजवटीने इदलिबमध्ये सुरू केलेल्या नरसंहाराला रशियाचा पाठिंबा असल्याचा आरोप तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप एर्दोगन यांनी केला होता.

 

English हिंदी

 

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info