युरोपिय देशांमध्ये कोरोनाव्हायरसचे थैमान – इटलीतील बळींची संख्या ६३१ वर

युरोपिय देशांमध्ये कोरोनाव्हायरसचे थैमान – इटलीतील बळींची संख्या ६३१ वर

रोम/बीजिंग – इटलीमध्ये कोरोनाव्हायरसच्या बळींची संख्या ६३१ वर गेली आहे. तर या देशात कोरानाव्हायरसची लागण झालेल्यांची संख्या १० हजारांच्या पुढे गेली असून इटली या साथीचे युरोपातील केंद्र बनल्याचे दिसते आहे. त्याचवेळी जगभरातील या साथीने ४,३६० जणांचा बळी घेतला असून १,१८,२४६ जणांना याची लागण झाली आहे. अमेरिकेसारख्या देशातही कोरोनाव्हायरसच्या बळींची संख्या २९ वर गेली असून हजाराहून अधिकजणांना याची लागण झाली आहे. दुसर्‍या कुठल्याही देशापेक्षा अमेरिका या साथीचा अधिक समर्थपणे सामना करील, असा दावा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी काही दिवसांपूर्वी केला होता.

इटलीच्या सोळा प्रांतातील सहा कोटी नागरिकांच्या हालचालींवर बंदी टाकून कोरोनाव्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू झाले होते. तरीही ही साथ इटलीमध्ये थैमान घालत असल्याचे उघड झाले आहे. इटली हे कोरोनाव्हायरसचे युरोपातील केंद्र बनले असून चीननंतर इटलीमध्ये या साथीचा जबरदस्त वेगाने प्रसार होत असल्याचे पहायला मिळत आहे. एकाच दिवसात इटलीमधील या साथीच्या बळींची संख्या १६८ने वाढली. आत्तापर्यंत इटलीमध्ये याचे ६३१ बळी गेले आहेत. पुढच्या काळात यात मोठी वाढ होऊ शकेल, अशी भयावह शक्यता समोर येत असून इटलीत १०,१४९ जणांना या साथीची लागण झाली आहे. इटलीमध्ये बर्‍याच ठिकाणी हॉटेल्स व रेस्टॉरंट बंद ठेवण्यात आली असून विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहे.

इटली हा पर्यटनावर अवलंबून असलेला देश असून कोरोनाव्हायरसच्या संकटामुळे इटलीची अर्थव्यवस्था धोक्यात आली आहे. युरोचा वापर करणार्‍या देशांमध्ये इटली ही तिसर्‍या क्रमांकाची अर्थव्यवस्था असून याचा फटका युरोपिय देशांनाही बसणार असल्याचे स्पष्टपणे दिसू लागले आहे. स्पेनमध्ये कोरोनाव्हायरसचे ३५ बळी गेले असून १६२२ जणांना याची लागण झाली आहे. जर्मनीच्या ७० टक्के जनतेला या साथीची लागण होऊ शकते, असे जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांनी म्हटले आहे. ही भीती खरी ठरली जवळपास सहा कोटी जर्मन नागरिक या साथीच्या विळख्यात सापडू शकतात.

ब्रिटनच्या आरोग्यमंत्र्यांनाच कोरोनाव्हायरसची लागण झाल्याच्या बातम्या आल्या आहेत. आरोग्यमंत्री नॅडील डॉरिस यांच्या संपर्कात आलेल्या ब्रिटनच्या मंत्रिमंडळाचे इतर सदस्य व अधिकार्‍यांची वैद्यकीय चाचणी केली जात आहे. इराणमध्ये कोरोनाव्हायरसमुळे ३५४ जण दगावले आहेत. मात्र उघड केले जात आहे, त्यापेक्षा कितीतरी भयावह प्रमाणात इराणमध्ये ही साथ हाहाकार माजवित असून याची सारी माहिती समोर येत नसल्याचे दावे केले जात आहेत. इतर देशही ही साथ फैलावू नये, यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करीत असल्याच्या बातम्या येत आहेत. आपल्या देशाची अर्धी लोकसंख्या या साथीच्या कचाट्यात सापडू शकते, अशी चिंता न्यूझीलंडच्या वैद्यकीय क्षेत्रातील काहीजणांनी व्यक्त केली आहे.

अमेरिकेच्या बोस्टन राज्यात कोरोनाव्हायरसचा सर्वाधिक फैलाव होत आहे. न्यूयॉर्कमध्येही ही साथ वेगाने फैलाव होत असल्याचे सांगितले जाते. अमेरिकेत आत्तापर्यंत या साथीने २९ जणांचा बळी घेतला असून हजाराहून अधिकजणांना याची लागण झाली आहे. अमेरिकेला इतर कुठल्याही देशापेक्षा अधिक समर्थपणे कोरोनाव्हायरसचा फैलाव रोखेल, असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. मात्र अमेरिकन यंत्रणाही ही साथ रोखू शकलेली नसल्याचे यामुळे समोर येत आहे.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info