Breaking News

अमेरिकेच्या ‘ओहिओ’ प्रांतात कोरोनाव्हायरसचे एक लाख रुग्ण – आरोग्य यंत्रणेच्या प्रमुखांचा दावा

वॉशिंग्टन – अमेरिकेच्या ‘ओहिओ’ प्रांतात ‘कोरोनाव्हायरस’च्या रुग्णांची संख्या एक लाखांहून अधिक असू शकते, असा खळबळजनक दावा स्थानिक आरोग्य विभागाच्या प्रमुखांकडून करण्यात आला आहे. ओहिओच्या आरोग्य विभागाच्या संचालक ऍमी ऍक्टन यांनी गुरुवारी एका पत्रकार परिषदेत हा दावा करतानाच स्थानिक यंत्रणेकडे रुग्णांची ठोस आकडेवारी नसल्याची धक्कादायक कबुलीही दिली. या कबुलीमुळे अमेरिकेत ‘कोरोनाव्हायरस’च्या साथीची व्याप्ती मोठी असल्याच्या दाव्यांना दुजोरा मिळत असल्याचे दिसत आहे.

अमेरिकेत गेल्या काही दिवसात ‘कोरोनाव्हायरस’च्या रुग्णांची तसेच बळींची संख्या वाढते आहे. गुरुवारी अमेरिकेत ‘कोरोनाव्हायरस’च्या रुग्णांची संख्या १८००च्या वर गेल्याची माहिती देण्यात आली असून बळींची आकडेवारी ४०हून अधिक झाली आहे. अमेरिकेतील आघाडीचे आरोग्य तज्ज्ञ तसेच अधिकारी देशातील ‘कोरोनाव्हायरस’च्या साथीबाबत सातत्याने गंभीर इशारे देत असून त्यात लाखो नागरिकांना लागण होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

ओहिओच्या आरोग्य प्रमुखांनी दिलेली माहितीही याचाच भाग दिसत आहे. ओहिओ राज्याची लोकसंख्या एक कोटी १० लाखांहून अधिक असून किमान एक टक्का इतक्या लोकांना साथीची लागण झालेली असू शकते. याचाच अर्थ राज्यातील एक लाखाहून अधिक नागरिक ‘कोरोनाव्हायरस’चे रुग्ण असल्याची शक्यता आहे, असे ऍमी ऍक्टन यांनी सांगितले. ‘कोरोनाव्हायरस’ची साथ अमेरिकेत अनेक दशकांमधून येणारी मोठी साथ असल्याचेही ऍक्टन यांनी बजावले.

ओहिओमध्ये सध्या पाच रुग्णांची नोंद झाली असून ५०हून अधिक जणांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info