‘कोरोना लसी’चे सिक्रेट चोरण्यासाठी रशिया व इराणचे ब्रिटनवर सायबरहल्ले – ब्रिटनच्या वर्तमानपत्राचा दावा

‘कोरोना लसी’चे सिक्रेट चोरण्यासाठी रशिया व इराणचे ब्रिटनवर सायबरहल्ले – ब्रिटनच्या वर्तमानपत्राचा दावा

लंडन – कोरोना साथीविरोधात लस शोधण्याआठी जगाच्या कानाकोपऱ्यात संशोधन सुरू असतानाच, याबाबतची माहिती चोरण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. ब्रिटनमधील विविध यंत्रणा व विद्यापीठांमध्ये कोरोनाच्या लसीवर संशोधन सुरू असून त्यावर डल्ला मारण्यासाठी रशिया व इराणने सायबरहल्ले केल्याची खळबळजनक माहिती समोर आली. ब्रिटनच्या ‘नॅशनल सायबर सिक्युरिटी सेंटर’ व ‘जीसीएचक्यू’ने या हल्ल्यांना दुजोरा दिल्याचे वृत्त ब्रिटिश दैनिकाने दिले आहे.

जगभरात कोरोनाव्हायरसच्या साथीने हाहाकार उडविला असून साथ रोखण्यासाठी सर्व देशांमध्ये धडपड सुरू आहे. अमेरिका, ब्रिटन, इस्रायल, जर्मनी यासह अनेक देशांमध्ये कोरोनव्हायरस रोखण्यासाठी लस तसेच औषध विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ब्रिटनमधील आघाडीचे विद्यापीठ म्हणून ओळख असणाऱ्या ‘ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी’ने एक लस विकसित करून त्याच्या चाचण्या सुरू केल्याची माहितीही नुकतीच समोर आली होती.

या पार्श्वभूमीवर ब्रिटिश विद्यापीठे व संशोधनसंस्थांवर झालेले सायबरहल्ले लक्ष वेधून घेणारे ठरतात. ‘डेली मेल’ या आघाडीच्या ब्रिटिश दैनिकाने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे. रशिया व इराणच्या हॅकर्सनी ब्रिटीश शिक्षणसंस्थांबरोबरच संशोधक व डॉक्टरांवरही सायबरहल्ले केल्याचे वृत्तात सांगण्यात आले. केवळ लसीबाबतचीच नाही तर कोरोनाच्या चाचण्यांसंदर्भातील माहिती चोरण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे ‘डेली मेल’ने म्हटले आहे.

ब्रिटनचे ‘नॅशनल सायबर सिक्युरिटी सेंटर’ तसेच प्रमुख गुप्तचर यंत्रणा ‘जीसीएचक्यू’ने सायबरहल्ल्यांच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्याचवेळी असे हल्ले निंदनीय असल्याची टीकाही केली. मात्र रशिया व इराणी हॅकर्सना गोपनिय माहिती चोरता आलेली नाही, असे वरिष्ठ ब्रिटीश अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

या सायबरहल्ल्यांच्या घटनेनंतर ब्रिटीश गुप्तचर यंत्रणेने एक विशेष पथक स्थापन केले असून त्याकडे ‘नॅशनल हेल्थ सर्व्हिस’च्या संपूर्ण कॉम्प्युटर नेटवर्कच्या सुरक्षेची जबाबदारी देण्यात आली आहे. त्याचवेळी ब्रिटनच्या ‘डिफेन्स कमिटी’चे प्रमुख टोबिस एलवूड यांनी अशा सायबरहल्ल्यांना ब्रिटन त्याच भाषेत सडेतोड प्रत्युत्तर देईल, असा इशाराही दिला.

ब्रिटनमध्ये झालेल्या सायबर हल्ल्यांपूर्वी अमेरिकेतही कोरोनाच्या संशोधनाचा समावेश असणाऱ्या कॉम्प्युटर नेटवर्क्सना लक्ष्य करण्यात आले होते. त्यानंतर अमेरिकी गुप्तचर यंत्रणेने देशातील सर्व वैद्यकीय संशोधनसंस्थाना सायबरहल्ल्यांच्या धोक्याबाबत दक्षतेचा इशाराही दिला होता. हा इशारा देताना सायबरहल्ल्यांच्या मागे चीनच्या सत्ताधारी राजवटीचाही संबंध असू शकतो, याकडे लक्ष वेधले होते.

गेल्या काही वर्षांत अमेरिका व युरोपिय देशांवर मोठ्या प्रमाणात सायबरहल्ले होत असून हे हल्ले म्हणजे युद्धाचाच भाग असल्याची जाणीव विविध अभ्यासगट व तज्ज्ञांकडून करून देण्यात येत आहे. तर कोरोनाव्हायरसची साथ हे जैविक युद्ध असल्याचेही दावे करण्यात येतात.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info