Breaking News

… तर व्हेनेझुएलात अमेरिकेचे लष्करच धाडले असते – राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

वॉशिंग्टन – मला जर व्हेनेझुएलात जायचे असते तर ते मी लपवून ठेवले नसते; त्यासाठी छोटे पथक नाही तर अमेरिकेचे लष्करच पाठविले असते, असा टोला लगावीत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हुकूमशहा मदुरो यांच्या आरोपांची खिल्ली उडवली. काही दिवसांपूर्वी व्हेनेझुएलाचे हुकूमशहा मदुरो यांनी, आपली राजवट उलथवण्याचा कट उधळल्याचा दावा करताना त्यामागे अमेरिकेचा हात असल्याचे म्हटले होते. आपल्या दाव्यांच्या समर्थनार्थ मदुरो यांनी अमेरिकी सैनिकांचे फोटोग्राफ्स, पासपोर्ट व अमेरिकेची शस्त्रे सादर केली होती.

सोमवारी निकोलस मदुरो यांनी सरकारी वृत्तवाहिनीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत, दोन अमेरिकी सैनिकांना अटक केल्याचेही जाहीर केले होते. ही अटक आपल्याविरोधात फसलेल्या कटाचा भाग असल्याचे सांगून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी यासाठी आदेश दिल्याचा आरोप केला होता. अमेरिकेतील एका कंपनीने अटक करण्यात आलेले दोन जवान आपले असल्याचे सांगितल्याने काही काळ खळबळ उडाली होती.

मात्र ट्रम्प यांच्यासह अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने मदुरो यांचे दावे फेटाळताना हा देशातील समस्यांपासून लक्ष इतरत्र वळविण्याचा डाव असल्याची टीका केली होती.अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने, मदुरो यांच्या बनावामागे क्युबाच्या गुप्तचर यंत्रणांचा सहभाग असू शकतो असेही म्हटले होते.

शुक्रवारी ‘फॉक्स न्यूज’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी, मदुरो यांचे दावे धुडकावून लावले. त्याचवेळी आपण व्हेनेझुएलावर थेट आक्रमण केले असते आणि त्यांनी काहीही न करता आपल्यासमोर नांगी टाकली असती, अशा शब्दात अमेरिका व्हेनेझुएलावर कधीही हल्ले चढवू शकतो, असेही बजावले. व्हेनेझुएलात पकडण्यात आलेला गट बदमाश लोकांचा होता व त्यात अमेरिकेव्यतिरिक्त इतर देशांच्या नागरिकांचाही सहभाग होता, असा दावाही ट्रम्प यांनी केला.

बुधवारी परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनीही व्हेनेझुएलात घडलेल्या गोष्टींशी अमेरिकेचा काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले होते. त्याचवेळी अमेरिकेकडे व्हेनेझुएलावर कारवाईसाठी सर्व पर्याय उपलब्ध असल्याचा दावाही परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ यांनी केला होता.

व्हेनेझुएलात सध्या अराजक माजले असून इथली जनता अन्नानदशेत आहे. तरी हुकूमशहा मदुरो यांनी रशिया, चीन व क्युबासारख्या मित्रदेशांच्या सहाय्याने आपली राजवट टिकवली आहे. या देशांच्या बळावर मदुरो यांनी अमेरिका, युरोप व लॅटिन अमेरिकी देशांकडून टाकण्यात आलेले निर्बंध व इतर कारवायांचा मुकाबला केला आहे. मात्र त्याचे विपरीत परिणाम व्हेनेझुएलातील जनतेला भोगावे लागत असून त्यांना उपासमारी, रोगराई, बेरोजगारी, दडपशाही व इतर भयानक समस्यांचा सामना करावा लागत आहे.