Breaking News

‘डब्ल्यूएचओ’तील ‘कोरोना’च्या चीनविरोधी ठरावाला भारताचे समर्थन

जीनिव्हा – ‘डब्ल्यूएचओ’ अर्थात ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’च्या बैठकीत मांडण्यात येणाऱ्या चीनविरोधी ठरावाला भारताने पाठिंबा देऊन याबाबत सुस्पष्ट भूमिका घेतली आहे. या आठवड्यात भारत ‘डब्ल्यूएचओ’च्या मुख्य समितीचे  अध्यक्षपदी स्वीकारत असून त्या पार्श्वभूमीवर भारताने घेतलेला हा निर्णय लक्षवेधी ठरतो. भारताने कोरोनाच्या मुद्यावरून उघडपणे चीनविरोधी भूमिका घेण्याची ही पहिलीच वेळ असून याद्वारे भारताने चीनला योग्य संदेश पोहोचविल्याचे दिसते.

सोमवारपासून जीनिव्हामध्ये ‘डब्ल्यूएचओ’तील निर्णयप्रक्रियेत महत्त्वाची भूमिका असणाऱ्या ‘वर्ल्ड हेल्थ असेंब्ली’ची बैठक सुरू झाली आहे. या बैठकीत कोरोनाव्हायरसची साथ व ‘डब्ल्यूएचओ’तील सुधारणा हा प्रमुख अजेंडा असेल, असे सांगण्यात येते. जीनिव्हातील या बैठकीच्या पार्श्वभूमीवर साथीच्या मुद्यावरून चीनला घेरण्याच्या हालचालींनाही वेग आला आहे.

युरोपिय महासंघ व ऑस्ट्रेलियाने कोरोनाव्हायरसची साथ व त्याचे मूळ यांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. याबाबतचा विस्तृत ठरावही तयार करण्यात आला असून त्याचा संपूर्ण रोख चीनवर आहे. ठराव सादर करण्याच्या प्रस्तावाला युरोप व ऑस्ट्रेलियासह ६१ देशांच्या आघाडीने उघड पाठिंबा दिला आहे. त्यात भारताचाही समावेश झाल्याने ठरावाचे उघड समर्थन करणाऱ्या देशांची संख्या ६२ झाली आहे. ‘डब्ल्यूएचओ’चे सदस्य असणाऱ्या १९४ देशांपैकी १२०हुन अधिक देशांनी ठरावाच्या बाजूने कल दर्शविल्याचा दावाही काही प्रसारमाध्यमांनी केला आहे.

भारताने कोरोनाव्हायरस साथीच्या मुद्यावर उघडपणे चीनच्या विरोधात जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. मार्चमध्ये ‘जी२०’च्या बैठकीत भारताने ‘डब्ल्यूएचओ’तील सुधारणा आणि पारदर्शकता हे मुद्दे मांडले होते. मात्र कोरोनाच्या मुद्यावर कुठेही चीनचा उल्लेख केला नव्हता. काही दिवसांपूर्वी भारताच्या एका वरिष्ठ मंत्र्यांनी कोरोनाव्हायरसचा उगम नैसर्गिक नाही, असे वक्तव्य केले होते. पण त्यातही चीनला थेट लक्ष्य करण्याचे टाळले होते. पण ‘डब्ल्यूएचओ’ असेंब्लीच्या बैठकीच्या निमित्ताने भारताने चीनवर उघडपणे निशाणा साधला आहे.

सोमवारी ‘डब्ल्यूएचओ’त चीनविरोधात ठराव येत असतानाच कोरोना साथीच्या मुद्यावर चीन अधिकच अडचणीत येण्याचे संकेत मिळत आहेत. चीनच्या ‘नॅशनल हेल्थ कमिशन’च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने  व्हायरसचे सुरुवातीचे नमुने नष्ट केल्याची कबुली दिली आहे. लिऊ देन्गफेंग यांनी एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत, विषाणूंचे सुरुवातीचे नमुने बेकायदेशीर प्रयोगशाळांच्या माध्यमातून नष्ट केल्याची माहिती दिली. जैविक सुरक्षेच्या हेतूने हा निर्णय घेण्यात आला होता, असा दावाही त्यांनी केला.

चीनच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या या कबुलीतून अमेरिकेसह इतर देशांकडून चीनवर केल्या जाणाऱ्या आरोपांना दुजोरा मिळाल्याचे दिसते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, चीनवर आरोप करताना चिनी यंत्रणांनी साथीच्या सुरुवातीच्या काळात अमेरिका व इतर देशांना आवश्यक सहकार्य केले नव्हते, अशी टीका केली होती. जर चीनने याची माहिती आधीच दिली असती तर साथीला वुहानमध्येच रोखुन पुढचा अनर्थ टाळता आला असता; पण चीनने असे होऊ दिले नाही, अशी जळजळीत टीका अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केली होती. ट्रम्प यांच्या या टिकेला आता इतर देशांकडूनही दुजोरा मिळत असल्याचे दिसत आहे.

दरम्यान, ‘वुहान डायरी’च्या माध्यमातून साथीच्या काळातील चीनचे वास्तव समोर आणणाऱ्या ‘फँग फँग’ या लेखिकेने नवा गौप्यस्फोट केला आहे. चिनी यंत्रणा व अधिकाऱ्यांनी वुहानमधील आजार संसर्गजन्य नसल्याचे सांगून जनतेची दिशाभूल केली होती, असे ‘वुहान डायरी’च्या लेखिकेने म्हटले आहे. प्रत्यक्षात आपल्या मोठ्या भावाने डिसेंबर महिन्यातच व्हायरस धोकादायक व संसर्गजन्य असल्याचे सांगितले होते, असे फँग यांनी सांगितले.

‘डब्ल्यूएचओ’तील ठराव आणि त्यापाठोपाठ वरिष्ठ अधिकारी तसेच लेखिकेने दिलेली माहिती, यातून कोरोनाच्या मुद्यावर चीनविरोधातील फास अधिकच आवळला जात असल्याचे स्पष्ट संकेत मिळू लागले आहेत.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info