Breaking News

चीनने कोरोना साथीला दिलेला प्रतिसाद सोव्हिएत रशियातील चेर्नोबिल दुर्घटनेप्रमाणे – अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांचा दावा  

वॉशिंग्टन  –  कोरोनाची साथ सुरू झाल्यानंतर चीनने त्याला दिलेला प्रतिसाद, १९८६ सालच्या सोव्हिएत रशियातील चेर्नोबिल आण्विक दुर्घटनेसारखा आहे, असा दावा अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओब्रायन यांनी केला. ओब्रायन यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान हे वक्तव्य केले. एप्रिल १९८६ मध्ये तत्कालिन सोव्हिएत रशियातील चेर्नोबिल अणुप्रकल्पात झालेल्या अपघातात १० हजारांहून अधिक बळी गेल्याचे मानले जाते.

‘कोरोनाव्हायरसची सुरुवात चीनकडूनच झाली. त्यानंतर चीनने ही साथ लपविण्यासाठी खूप प्रयत्न केले. १९८६ साली झालेल्या चेर्नोबिल दुर्घटनेचे वास्तव लपविण्यासाठीही सोव्हिएत रशियाने प्रयत्न केले होते. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या एका मालिकेत  सोव्हिएत रशियाच्या या प्रयत्नांची माहिती उलगडण्यात आली होती. काही काळाने चीनच्या कोरोना साथीच्या प्रतिसादाबाबतही असाच उलगडा होईल’, असा दावा अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओब्रायन यांनी केला.  यावेळी ओब्रायन यांनी, अमेरिका चीनने केलेला लपवाछपवीच्या मुळाशी जाईल, असेही वक्तव्य केले आहे.

‘सध्या अमेरिकेला कोरोनाव्हायरस नक्की कोणी पसरविला याची ठोस माहिती नाही. साथ पसरण्यास सुरुवात झाल्यानंतर चीनने पत्रकारांची हकालपट्टी केली होती. तसेच अमेरिकी यंत्रणांनाही प्रवेश दिला नाही. साथीच्या फैलावामागे स्थानिक अधिकारी आहेत की चीनची सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टी या गोष्टींनी विशेष फरक पडत नाही. साथीचे वास्तव लपविण्याचा प्रयत्न झाला आणि अमेरिका त्याचा शोध घेईलच’, अशी ग्वाही सुरक्षा सल्लागार ओब्रायन यांनी दिली. यावेळी त्यांनी कोरोना साथीची लस व उपचार याबाबतचे संशोधन चोरण्यासाठी चीनकडून प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही केला.

चीनमध्ये कोरोनाची साथ पसरण्यास गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यातच सुरुवात झाली होती. मात्र चीनने जगापासून हे सत्य  जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत दडविले होते. त्यानंतरही चीन साथीच्या संसर्गाबाबत खरी माहिती देण्याचे सातत्याने टाळले. साथीबाबत बोलणाऱ्या पत्रकार तसेच डॉक्टरांना गायब करण्यात आले आणि काहींचा संशयास्पदरित्या मृत्यूही झाला. त्याचवेळी परदेशी वैद्यकीय तज्ञांनाही साथीचे नमुने दिले नाहीत.  या लपवाछपवीसाठी चीनने ‘डब्ल्यूएचओ‘ अर्थात ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’शी देखील हातमिळवणी केली होती.

आजच्या घडीला जगातील बहुतांश देशात कोरोनाची साथ पसरली असून  त्यात जवळपास साडेतीन लाख जणांचा बळी गेला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात बळी जाण्यामागे चीनची लपवाछपवीच कारणीभूत ठरली, असे आरोप आता आंतरराष्ट्रीय समुदायाकडून होत आहेत. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ओब्रायन यांनी  त्याची तुलना सोव्हिएत रशियातील चेर्नोबिल आण्विक दुर्घटनेशी करून  साथीची व्याप्ती खूपच जास्त भयावह असल्याचे संकेत दिले आहेत.

२६ एप्रिल १९८६ रोजी सोव्हिएत रशियातील चेर्नोबिल अणुप्रकल्पात झालेल्या अपघातात फक्त काहीजणांचा बळी गेला आहे असे दाखवून  त्याबाबतचे वास्तव दडपण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र कालांतराने त्याची व्याप्ती खूपच  वाढल्याचे निदर्शनास आले होते. अपघातात झालेल्या भयावह किरणोत्सर्गामुळे सोव्हिएत रशियाला हजारो किलोमीटरचा  परिसर रिकामा करणे भाग पडले होते. त्यानंतर पुढील काही वर्षात या आण्विक प्रकल्पातील दुर्घटनेमुळे  बळी गेलेल्यांची संख्या हजारोंच्या घरात असल्याचे समोर आले होते  चेर्नोबिलची दुर्घटना जगातील सर्वात मोठे ‘न्यूक्लियर डिझास्टर’ म्हणून ओळखली जाते.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info