अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडून चीनवर घणाघाती प्रहार – हॉंगकॉंग, कोरोनाव्हायरस, बुद्धिसंपदा चोरी यासारख्या मुद्द्यांवरुन चीनवर तोफ डागली

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडून चीनवर घणाघाती प्रहार – हॉंगकॉंग, कोरोनाव्हायरस, बुद्धिसंपदा चोरी यासारख्या मुद्द्यांवरुन चीनवर तोफ डागली

वॉशिंग्टन – ‘अमेरिकेला चीनबरोबर खुले व रचनात्मक संबंध ठेवायचे आहेत. पण हे संबंध राखण्यासाठी अमेरिकी हितसंबंधांच्या सुरक्षेला प्राधान्य देणे अत्यंत महत्त्वाचे आहे’, असे सांगून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनच्या कारवायांविरोधात रोखठोक भूमिका घेणाऱ्या निर्णयाची घोषणा केली. ही घोषणा करताना ट्रम्प यांनी, हॉंगकॉंगचा कायदा, कोरोनाव्हायरस, अमेरिकेतील बुद्धीसंपदेची चोरी व गुंतवणूक यासारख्या मुद्द्यांवरून चीन विरोधात घणाघाती प्रहार केले. यावेळी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घेतलेले निर्णय अमेरिका व चीनमध्ये निर्णायक संघर्षाची सुरुवात होत असल्याचे संकेत देत आहेत.

चीन, डोनाल्ड ट्रम्प, कोरोनाव्हायरस, अमेरिका

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेची सूत्रे स्वीकारल्यापासून सातत्याने चीनविरोधात भूमिका घेतली होती. गेल्या तीन वर्षात डोनाल्ड ट्रम्प यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून चीनला लक्ष्य करणारे निर्णय घेतले आहेत. हे निर्णय घेत असतानाच चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आपले मित्र आहेत, असे सांगून व्यापारी करारासारख्या गोष्टींवर सकारात्मक भूमिकाही घेतली होती. मात्र कोरोनाव्हायरस साथीच्या हाताळणीवरून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प चीनविरोधात चांगलेच भडकले असून एकामागोमाग एक आरोपांच्या फैरी झाडत आहेत. शुक्रवारी व्हाइट हाउसमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी, अमेरिका एकाच वेळी चीनला अनेक आघाड्यांवर संघर्ष करण्यास भाग पाडेल, अशा निर्णयांची घोषणा केली.

‘चीनच्या सत्ताधारी राजवटीने अमेरिकेसह आंतरराष्ट्रीय समुदायातील अनेक देशांना दिलेली वचने पाळलेली नाहीत आणि ही गोष्ट दुर्लक्षित करण्याजोगी नक्कीच नाही. चीन गेली अनेक वर्ष अमेरिकेची व्यापारी लुट करीत आला आहे व त्यातून त्यांनी अब्जावधी डॉलर्सचा फायदा कमावला आहे. चीनने अमेरिकेतील कारखाने बंद पाडले, लक्षावधी रोजगार घालविले आणि बुद्धीसंपत्देची चोरी करीत राहिले. इतकेच नाही तर जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांचेही चीनने उल्लंघन केले. पॅसिफिक महासागरातील प्रदेशांवर अतिक्रमण करून जागतिक व्यापार आणि वाहतुकीत अडथळे आणण्याचा प्रयत्न केला. आता तर त्यांनी हॉंगकॉंगच्या स्वायत्ततेच्या मुद्दावरन संपूर्ण जगाला दिलेले आश्वासनही तोडले आहे’, या शब्दात ट्रम्प यांनी चीनच्या सत्ताधारी राजवटीच्या कारवायांचे वाभाडे काढले. त्यानंतर अमेरिकेकडून घेण्यात येणार्‍या निर्णयांची माहिती देताना ट्रम्प यांनी, प्रथम कोरोनाव्हायरसच्या मुद्द्यावरून चीनला लक्ष्य केले.

चीन, डोनाल्ड ट्रम्प, कोरोनाव्हायरस, अमेरिका

जगभरात लाखो बळी घेणाऱ्या या साथीसाठी चीनची राजवट व त्या राजवटीच्या हातातील बाहुले बनलेली ‘डब्ल्यूएचओ’ अर्थात ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’ ही संस्था जबाबदार आहे,असा ठपका अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी ठेवला. चीन व ‘डब्ल्यूएचओ’च्या हातमिळवणीमुळे अमेरिका या संघटनेतून बाहेर पडत असून त्यांना देण्यात येणारा निधीही पूर्णपणे थांबविण्यात येईल, असे ट्रम्प यांनी जाहीर केले. यावेळी त्यांनी साथीचा उल्लेख ‘वुहान व्हायरस’ असाच करून ही साथ चीनमधूनच सुरू होऊन फैलावल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित केले.

‘चीनमधून पसरलेल्या साथीने अमेरिका आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असणे किती महत्त्वाचे आहे याची पुन्हा एकदा जाणीव करून दिली. यापुढे अमेरिकी अर्थव्यवस्था सुदृढ व सक्षम करण्यासाठी चीनच्या कारवाया थांबविणे गरजेचे आहे. चीनकडून अमेरिकेच्या औद्योगिक गुपितांची व बुद्धीसंपदेची होणारी चोरी रोखण्यासाठी चिनी संशोधक व विद्यार्थ्यांना यापुढे अमेरिकेत प्रवेश नाकारला जाईल’, अशी घोषणा राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केली. त्याचवेळी येत्या काही दिवसात अमेरिकी कंपन्या व गुंतवणूकदारांचा पैसा सुरक्षित रहावा, यासाठी चीनचा गुंतवणूकीवर नवे निर्बंध लागणारा निर्णय जाहीर करण्यात येईल असेही ट्रम्प म्हणाले.

‘हॉंगकॉंगसाठी वन कंट्री, टू सिस्टिम्स ही व्यवस्था राबविण्याचे वचन देणाऱ्या चिनी राजवटीने आता मात्र तेथे वन कंट्री, वन सिस्टीम लागू करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. चीनच्या राजवटीने एकतर्फी निर्णय घेऊन हॉंगकॉंगवर लादलेला सुरक्षा कायदा त्या शहराची स्वायत्तता नष्ट करणारा आहे. ही घटना केवळ हॉंगकॉंगच्या जनतेसाठीच नाही, तर चिनी जनता व जागतिक समुदायासाठीही शोकांतिका ठरणार आहे’, या शब्दात तीव्र नापसंती व्यक्त करीत ट्रम्प यांनी, अमेरिकेने हॉंगकॉंगला दिलेला स्पेशल स्टेटस काढण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे जाहीर केले. त्याचवेळी यापुढे होंगकाँगसाठी ‘ट्रॅव्हल ऍडव्हायझरी’ जारी करण्यात येईल, अशी माहितीही दिली.

गेल्या दोन महिन्यांपासून अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने कोरोना साथीच्या मुद्द्यावरून चीनविरोधात उघडपणे राजनैतिक संघर्ष छेडला होता. हा संघर्ष फक्त एकाच मुद्द्यावरील निवेदने व इशाऱ्यापुरता मर्यादित नव्हता. तर अमेरिकेच्या संसदेत वेगवेगळ्या क्षेत्रातील चीनविरोधातील प्रस्ताव व विधेयकेही मंजूर केली जात होती. त्यात चीनसाठी संवेदनशील असणाऱ्या तैवान, तिबेट, उघुरवंशीय, ५जी यासारख्या मुद्द्यांचाही समावेश होता. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केलेल्या निर्णयांमधून आता अमेरिका सर्वच मुद्द्यांवरुन चीनविरोधातील संघर्षाच्या पुढच्या टप्प्यात उतरल्याचे दिसत आहे.

English       हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info