Breaking News

साऊथ चायना सीमध्ये अमेरिकेची विनाशिका दाखल – ब्रिटनकडून विमानवाहू युद्धनौकेच्या तैनातीचे संकेत

US warship, South China Sea

वॉशिंग्टन/लंडन – अमेरिकेने साऊथ चायना सीमधील चीनच्या महत्त्वाकांक्षा धुळीला मिळवण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. सोमवारी अमेरिकेकडून, चीनचे साऊथ चायना सीवरील दावे धुडकावून आक्रमक धोरण जाहीर करण्यात आले होते. अवघ्या २४ तासात त्याची अंमलबजावणी सुरू करीत अमेरिकेने आपली विनाशिका चीननजीकच्या सागरी क्षेत्रात धाडली आहे. अमेरिकी युद्धनौका चीनला उघड आव्हान देत असतानाच ब्रिटनने आपली विमानवाहू युद्धनौका पॅसिफिक क्षेत्रात तैनात करणार असल्याचे संकेत दिले आहेत.

अमेरिकेची विनाशिका ‘यूएसएस राल्फ जॉन्सन’ने मंगळवारी साऊथ चायना सी मधील ‘स्प्रेटले आयलंड्स’ भागात गस्त घातली. ही गस्त अमेरिकेने जाहीर केलेल्या ‘फ्रीडम ऑफ नेव्हिगेशन’ मोहिमेअंतर्गत होती, अशी माहिती अमेरिकी नौदलाने दिली. नौदलाने याचे दोन फोटोग्राफ्सही प्रसिद्ध केले आहेत.’साऊथ चायना सीवरील हक्काबाबत करण्यात येणारे बेकायदेशीर दावे सागरी वाहतुकीच्या स्वातंत्र्यासाठी धोकादायक आहेत. अमेरिकी विनाशिकेची गस्त या स्वातंत्र्यात अडथळे आणणार्‍या देशांना दिलेले आव्हान असून आंतरराष्ट्रीय नियमानुसार देण्यात आलेले अधिकार अधोरेखित करणारी करते,’ या शब्दात अमेरिकी नौदलाने चीनला फटकारले आहे.

फिलिपाईन्स, मलेशिया व व्हिएतनामच्या सागरी हद्दीचा भाग असणाऱ्या ‘स्प्रेटले आयलंड्स’वर चीनने आपला हक्क सांगितला आहे. यातील काही छोटी बेटे चीनने लष्करी बळाच्या जोरावर ताब्यात घेतले असून तिथे तैनातीही केली आहे. या भागासह साऊथ चायना सीमधील इतर बेटांवरही चीनने आपले दावे सांगून मोठ्या प्रमाणावर संरक्षणदलाची तैनाती सुरू केली आहे. सागरी क्षेत्रावर वर्चस्व मिळवण्यासाठी सुरू असलेल्या चीनच्या या कारवायांना अमेरिकेसह मित्रदेशांनी आव्हान दिले आहे. अमेरिकेने आपल्या विमानवाहू युद्धनौकांसह प्रगत विनाशिका, बॉम्बर्स, लढाऊ विमाने व ड्रोन्सची साऊथ चायना सीमधील तैनाती व गस्तही वाढविली आहे.

‘यूएसएस राल्फ जॉन्सन’ने घातलेली गस्त फ्रीडम ऑफ नेव्हिगेशन मोहिमेअंतर्गत अमेरिकेच्या युद्धनौकेची या वर्षातील सहावी मोहिम ठरते. या मोहिमांसह अमेरिकी विमानवाहू युद्धनौकांच्या तैनातीतून साऊथ चायना सी क्षेत्रात चीनला देण्यात येणारे आव्हान हेच अमेरिकेचे अधिकृत धोरण असल्याचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी नुकतेच जाहीर केले होते. त्यात अमेरिका आपल्या मित्रदेशांचे सहकार्य घेईल असेही संकेत देण्यात आले होते.

याच पार्श्वभूमीवर, ब्रिटन आपली विमानवाहू युद्धनौका पॅसिफिक क्षेत्रात तैनात करेल असे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. ब्रिटनच्या ‘द टाइम्स’ या दैनिकाने संरक्षणदलातील सूत्रांच्या हवाल्याने हा दावा करीत असल्याचे म्हटले आहे. गेल्यावर्षी ब्रिटनच्या नौदलात दाखल झालेल्या ‘एचएमएस एलिझाबेथ’सह सात युद्धनौकांचा ताफा पुढील वर्षी पॅसिफिक महासागरात दाखल होईल, असे ब्रिटीश संरक्षणदलातील सूत्रांनी सांगितले.

चीनच्या कारवायांपासून असणारा वाढता धोका रोखण्यासाठी ही तैनाती असेल असेही सूत्रांनी सांगितल्याचा दावा ब्रिटिश दैनिकाने केला. ब्रिटनच्या या मोहिमेत कॅनडा व ऑस्ट्रेलियासारख्या मित्रदेशांच्या युद्धनौकाही सहभागी होतील, असे संकेतही देण्यात आले आहेत. कोरोना साथीसह हॉंगकॉंग व हुवेईच्या मुद्यावरून ब्रिटन व चीनमध्ये जबरदस्त तणाव असून, विमानवाहू युद्धनौकेची तैनाती दोन देशांमधील संबंध विकोपाला नेणारी ठरु शकते, असा दावा विश्लेषकांकडून करण्यात येत आहे.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info