Breaking News

हॉंगकॉंगबाबतच्या अमेरिकेच्या कारवाईवर चीनची प्रत्युत्तराची धमकी

बीजिंग/वॉशिंग्टन – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हॉंगकॉंगविरोधात सुरू केलेल्या कारवाईला चीनकडून खणखणीत प्रत्युत्तर मिळेल, अशी धमकी चीनच्या परराष्ट्र विभागाने दिली आहे. हॉंगकॉंगवरील कारवाईच्या मुद्द्यावरून चीनने अमेरिकेचा राजदूतांना समन्सही बजावले असून कोणत्याही परिस्थितीत अमेरिकेचा हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही, असे बजावल्याचे सांगण्यात येते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, हॉंगकॉंगवर निर्बंध लादणाऱ्या कायद्यावर स्वाक्षरी केली असून त्याचा स्पेशल स्टेटस रद्द करणारा वटहुकूमही काढला आहे. हॉंगकॉंगवरील ही कारवाई अमेरिकेने चीनविरोधात घेतलेला महत्त्वाचा व मोठा निर्णय मानला जातो.

‘हॉंगकॉंग कायद्याच्या मुद्द्यावर अमेरिकेने सुरू केलेली कारवाई मोठी चूक असून ती ताबडतोब मागे घेण्यात यावी. हॉंगकॉंग ऑटोनोमी ॲक्ट व इतर निर्णयांच्या माध्यमातून चीन तसेच हॉंगकॉंगच्या कारभारात सुरू असणारे ढवळाढवळ लगेच थांबविण्यात यावी. जर अमेरिकेने आपली कारवाई सुरूच ठेवली तर आपले हितसंबंध जपण्यासाठी चीन अमेरिकेला खणखणीत प्रत्युत्तर देईल, असा इशारा चीनच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्या हुआ चुनयिंग यांनी दिला. चीनकडून अमेरिकी अधिकारी व यंत्रणांवर निर्बंध लादण्यात येतील, असे सांगून हॉंगकॉंग कायद्याची अंमलबजावणी रोखण्याचे अमेरिकेचे प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाहीत, असेही चिनी प्रवक्त्यांनी बजावले. अमेरिकेचे कारवाई आंतरराष्ट्रीय संबंधांचे उल्लंघन करणारी असल्याचा दावाही त्यांनी केला.

अमेरिकेला हा इशारा देत असतानाच चीनने हॉंगकॉंगच्या मुद्द्यावरून अमेरिकेचे राजदूतांना समन्स बजावल्याचेही समोर आले. चीनमधील अमेरिकेचे राजदूत टेरी ब्रॅनस्टेड यांना बोलावून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात तीव्र निषेध नोंदविण्यात आला. चीनची प्रतिमा मलीन करण्याचे व चीनविरोधात चिथावणी देण्याचे प्रयत्न अमेरिकेने ताबडतोब थांबवावेत, या शब्दात अमेरिकी राजदूतांना सुनावण्यात आल्याची माहिती चीनच्या परराष्ट्र विभागाकडून देण्यात आली.

त्यापूर्वी मंगळवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हॉंगकॉंग मुद्द्यावरून चीनविरोधात मोठ्या कारवाईची घोषणा केली. हॉंगकॉंगच्या जनतेवर सुरू असणाऱ्या दडपशाहीला चीनच जबाबदार असून त्यासाठी त्याला योग्य जरब बसणे आवश्यक आहे, या शब्दात ट्रम्प यांनी हॉंगकॉंगवर लादण्यात येणाऱ्या निर्बंधांचे समर्थन केले. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी स्वाक्षरी केलेल्या ‘हॉंगकॉंग ऑटोनॉमी ॲक्ट’नुसार, हॉंगकॉंगमध्ये चीनकडून होणाऱ्या कारवायांमध्ये सहभागी असणाऱ्या अधिकारी व संस्थांवर निर्बंध लादण्यात येणार आहेत. यात चिनी राजवटीला साथ देणाऱ्या बँका व इतर वित्तसंस्थांचाही समावेश आहे. यावेळी ट्रम्प यांनी हॉंगकॉंगचे स्पेशल स्टेटस रद्द करणारा वटहुकूम जारी करत असल्याचेही जाहीर केले.

चीनने हॉंगकॉंगमध्ये लादलेल्या कायद्याविरोधात आक्रमक निर्णय घेतानाच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी हॉंगकॉंग सोडून बाहेर पडणाऱ्या नागरिकांना अमेरिका आश्रय देईल असे संकेतही दिले. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनीही याला दुजोरा दिला असून हॉंगकॉंगवासियांना प्राधान्य देण्यात येईल, असे वक्तव्य केले आहे. चीनच्या दडपशाहीमुळे येत्या काही महिन्यात हजारो हॉंगकॉंगवासीय शहर सोडून बाहेर पडतील असे मानले जाते. हॉंगकॉंग सोडणार्‍या या नागरिकांसाठी ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, जपान व तैवान या देशांनी आपले दरवाजे खुले असल्याची भूमिका यापूर्वीच जाहीर केली आहे.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info