लिबियातील संघर्षात तुर्कीला इजिप्तपेक्षाही रशियाची सर्वाधिक चिंता

लिबियातील संघर्षात तुर्कीला इजिप्तपेक्षाही रशियाची सर्वाधिक चिंता

अंकारा/त्रिपोली – लिबियातील संघर्षात रशियाने तटस्थ भूमिका न स्वीकारता हफ्तार बंडखोरांना आपले समर्थन दिले आहे. त्यामुळे लिबियातील इजिप्तच्या लष्करी सहभागापेक्षाही रशियाचा हस्तक्षेप आपल्यासाठी सर्वाधिक चिंतेचा विषय ठरत असल्याचे तुर्कीने म्हटले आहे. सिरियाप्रमाणे लिबियातही रशियासोबत वाटाघाटी करण्यात अपयश मिळत असल्यामुळे तुर्कीकडून ही प्रतिक्रिया आली आहे. दरम्यान, लिबियातील संघर्ष रोखण्यासाठी बर्लिन कराराचे पूर्ण पालन करावे आणि या देशातील शस्त्रतस्करी रोखावी, अशी मागणी रशिया करीत आहे.

रशियाची सर्वाधिक चिंता

लिबियाचा प्रश्न वाटाघाटीने सोडविण्यासाठी तुर्कीचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप एर्दोगन यांच्या कार्यालयाचे प्रवक्ते इब्राहिम कालिन यांनी दिली. ’लिबियाबाबतच्या या आघाडीत रशियाला देखील सहभाग करुन घ्यावे, यासाठी तुर्कीचे प्रयत्न सुरू होते. सिरियाप्रमाणे लिबियातही रशियाबरोबर सहकार्य प्रस्थापित झाले असते तर परिस्थिती बदलली असती. पण रशिया लिबियामध्ये तटस्थ भूमिका स्वीकारण्यासाठी तयार नाही. रशियाने अधिकृतपणे कितीही नाकारले तरी लिबियातील हफ्तार बंडखोरांना रशियाचा पाठिंबा आहे’, अशी टीका कालिन यांनी केली. त्याचबरोबर लिबियातील संघर्षात रशियाचे समर्थन असलेले वॅग्नर या कंपनीचे कंत्राटी जवान हफ्तार बंडखोरांना या संघर्षात सहाय्य करीत असल्याची चिंता तुर्कीला सतावित असल्याचे कालिन म्हणाले.

’संयुक्त अरब अमिरात’ने (युएई) लिबियामध्ये सुदान,नायजर आणि चाड या आफ्रिकी देशांमधील कंत्राटी जवान हफ्तार बंडखोरांच्या सहाय्यासाठी दाखल केले आहेत. इजिप्तने देखील हफ्तार बंडखोरांच्या सहाय्यासाठी लिबियात रणगाडे, लष्करी वाहने दाखल केली आहेत. पण इजिप्तच्या या लष्करी सहाय्यापेक्षाही रशियाकडून हफ्तार बंडखोरांना मिळणारे समर्थन आणि रशियासमर्थक वॅग्नर कंत्राटी जवानांची लिबियातील सराज राजवटीविरोधातील कारवाई तुर्कीसाठी चिंतेचा विषय ठरत असल्याचे कालिन यांनी स्पष्ट केले. रशियाच्या वॅग्नर कंत्राटी जवानांची लिबियातील तैनातीच्या बातम्या याआधी तुर्कीच्या माध्यमांनीच प्रसिद्ध केल्या होत्या. त्याचबरोबर रशियन राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयात जनरल हफ्तार आणि वॅग्नर कंपनीच्या प्रमुखांची भेट झाल्याचे फोटोग्राफ्सही प्रसिद्ध केले होते. पण पहिल्यांदाच तुर्कीने अधिकृतरित्या लिबियाप्रश्नी रशिया आणि वॅग्नर यांचे संबंध अधोरेखित करुन रशियावर हल्ला चढविल्याचे दिसत आहे.

रशियाची सर्वाधिक चिंता

दरम्यान, लिबियातील सराज राजवट आणि हफ्तार बंडखोर यांच्यात गेल्या दोन वर्षांपासून जोरदार संघर्ष सुरू आहे. सराज राजवटीला संयुक्त राष्ट्रसंघाची मान्यता असून जनरल खलिफा हफ्तार यांच्या नेतृत्वाखाली लिबियन लष्करातील एक गटाने या राजवटीच्या विरोधात बंड पुकारले आहे. लिबियातील हा संघर्ष राजकीय राहिला नसून या देशातील इंधनाच्या साठ्यासाठी इतरही देश या संघर्षात उतरले आहेत. या संघर्षात तुर्की, इराण, कतार सराज राजवटीला लष्करी सहाय्य देत आहेत. तर सराज यांची राजवट दहशतवाद्यांची समर्थक असल्याचा आरोप करुन सौदी अरेबिया, इजिप्त, युएई, फ्रान्स तसेच रशियाने हफ्तार बंडखोरांना आपला पाठिंबा दिला आहे. या संघर्षात अमेरिकेने कुठल्याही गटाची बाजू घेतलेली नाही. पण अमेरिका देखील हफ्तार बंडखोरांच्या बाजूने असल्याचा दावा केला जातो.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info