अमेरिकेशी संघर्ष होईल, तयारी ठेवा – चीनच्या कम्युनिस्ट राजवटीला अभ्यासगटाचा इशारा

अमेरिकेशी संघर्ष होईल, तयारी ठेवा – चीनच्या कम्युनिस्ट राजवटीला अभ्यासगटाचा इशारा

बीजिंग – ‘कोरोनाव्हायरसमुळे जगभरात चीनच्या विरोधातील संतापाची भावना पराकोटीला पोहोचली आहे. १९८९ सालच्या तियानमेन हत्याकांडाच्या घटनेनंतर जगभरातून उमटलेल्या प्रतिक्रियांपेक्षाही हा संताप तीव्र आहे. चीनच्या विरोधातील या संतापाचे पर्यावसन अमेरिकेबरोबरच्या युद्धातही होऊ शकते आणि चीनच्या कम्युनिस्ट राजवटीने या युद्धाची तयार करावी’, असा इशारा चीनच्या गुप्तचर यंत्रणेशी संलग्न असलेल्या प्रभावी अभ्यासगटाने दिला आहे.

‘चायना इन्स्टिट्यूटस ऑफ कंटेम्पररी इंटरनॅशनल रिलेशन्स’ या अभ्यासगटाने गेल्या महिन्यात एक अहवाल चीनमधील गुप्तचर यंत्रणेला सुपूर्द केला. सदर अहवाल चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाच्या वरिष्ठ नेत्यांना देण्यात आला. या अहवालात कोरोनाव्हायरसमुळे जगभरात चीनच्या विरोधात दाटून आलेल्या असंतोषाची नोंद करण्यात आली आहे. या असंतोषाची तुलना १९८९ सालच्या चीनमधील तियानमेन हत्याकांडानंतर जगभरातून आलेल्या तीव्र प्रतिक्रीयांशी करण्यात आली आहे.

तियानमेन हत्याकांडानंतर अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांनी चीनवर निर्बंध टाकले होते. याद्वारे पाश्चिमात्यांनी चीनला होणारी शस्त्रास्त्रे आणि तंत्रज्ञानविषयक निर्यात रोखली होती, याची आठवण चीनच्या अभ्यासगटाने करुन दिली. आत्ता कोरोनाव्हायरसमुळे चीनच्या विरोधात निर्माण झालेल्या संतापाचे नेतृत्व अमेरिका करीत असून हा संताप तियानमेन हत्याकांडापेक्षाही कितीतरी मोठा आहे, याची जाणीव या अभ्यासगटाने करुन दिली.

या संतापाचा परिणाम चीनच्या ‘बेल्ट अँड रोड इनिशीएटीव्ह’वर होईल. या व्यतिरिक्त अमेरिका चीनच्या शेजारी देशांना आर्थिक आणि लष्करी सहाय्य वाढवू शकतो. यामुळे या क्षेत्रातील चीनच्या विरोधातील वातावरण तापू शकते, असा इशारा या अभ्यासगटाने दिला. याचे रुपांतर अमेरिका आणि चीनमधील युद्धातही होऊ शकते व त्यासाठी चीनने तयारी ठेवावी, असे या अभ्यासगटाने बजावले आहे. याआधीच व्यापार, हॉंगकॉंगमधील निदर्शने, साऊथ चायना सी, तैवान या मुद्यांवरुन चीन आणि अमेरिकेतील मतभेद टोकाला गेलेले आहेत, याची आठवण या अभ्यासगटाने करुन दिली आहे.

दरम्यान, १९८० सालापर्यंत सदर अभ्यासगट हा चीनच्या कम्युनिस्ट राजवटीला परराष्ट्र धोरण आणि अंतर्गत सुरक्षा याबाबत सल्ले देत होता. पण गेल्या चार दशकांपासून हा गट जास्त चर्चेत नव्हता. कोरोनाव्हायरसमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरुन चीनवर दबाव वाढत असताना, या चिनी अभ्यासगटाने दिलेला हा इशारा महत्वाचा मानला जातो.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info