चीनपासून असणारा धोका वाढत चालला आहे – तैवानच्या राष्ट्राध्यक्षांचा इशारा

चीनपासून असणारा धोका वाढत चालला आहे – तैवानच्या राष्ट्राध्यक्षांचा इशारा

तैपेई – ‘चीनच्या गेल्या काही दिवसातील आक्रमक कारवाया त्यांच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेसाठी नक्कीच हिताच्या नाहीत. या कारवायांनी तैवानच्या जनतेलाही चीनबाबत अधिक सावध केले आहे. चीनच्या कम्युनिस्ट राजवटीचे खरे स्वरूप तैवानसमोर आले आहे. त्याचवेळी या क्षेत्रात असणाऱ्या इतर देशांनाही चीनच्या वाढत्या धोक्याची योग्य जाणीव झाली असेल, अशी आशा आहे’, या शब्दात तैवानच्या राष्ट्राध्यक्ष त्साई इंग वेन यांनी चीनच्या कारवाया हा गंभीर धोका असल्याचा इशारा दिला. चीनने तैवानच्या सागरी क्षेत्रानजिक मोठा युद्धसराव सुरू केला असून, त्यापूर्वी तैवानच्या हवाईहद्दीत चीनच्या तब्बल ३७ लढाऊ विमानांनी घुसखोरीचा प्रयत्न केला होता.

शुक्रवारी व शनिवारी सलग दोन दिवस चीनच्या लढाऊ विमानांनी तैवानच्या हद्दीत घुसखोरीचे प्रयत्न करून दडपण आणण्याचा प्रयत्न केला. शुक्रवारी १८ तर शनिवारी १९ विमानांनी तैवानच्या हद्दीवर धडक दिल्याची माहिती तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने दिली. सलग दोन दिवसात इतक्या मोठ्या प्रमाणात घुसखोरीचा प्रयत्न करण्याची ही पहिलीच वेळ होती. या घुसखोरी पाठोपाठ चीनच्या संरक्षणदलाने तैवानच्या सागरी क्षेत्रानजिक नव्या युद्धसरावाला सुरुवात केल्याचेही समोर आले होते. या सरावात युद्धनौका, विनाशिका, लढाऊ तसेच बॉम्बर्स विमाने, पाणबुड्या व हेलिकॉप्टर्सचा समावेश होता. त्यानंतर चीनने एक व्हिडिओ प्रसिद्ध करून त्यात चीनचे बॉम्बर विमान अमेरिकेच्या गुआममधील संरक्षणातळावर हल्ला करीत असल्याचे दाखविण्यात आले होते.

तैवानच्या राष्ट्राध्यक्ष त्साई इंग वेन यांनी चीनच्या या कारवायांकडे लक्ष वेधताना, त्यातील आक्रमकता व धोका अधिक वाढल्याची जाणीव करून दिली. एक मित्र तैवानला भेट द्यायला आला असता चीनने केलेल्या हालचाली चिथावणी देणाऱ्या आहेत, असे तैवानच्या राष्ट्राध्यक्षांनी बजावले. त्याचवेळी चीनचा धोका फक्त तैवानला नसून त्याची व्याप्ती वाढत चालल्याचा इशाराही त्यांनी दिला. त्साई इंग वेन यांनी यावेळी पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय समुदायाला चीनच्या धोक्याकडे लक्ष देण्याबाबत आवाहनही केले.

दरम्यान, तैवानच्या अमेरिकेतील प्रतिनिधी ‘शिआओ बी-खिम’ यांनी, सोशल मीडियावरील माहितीत स्वतःचा उल्लेख राजदूत असा केल्याने चीनकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. तैवानमधील सत्ताधारी चीन व तैवानमधील संबंध बिघडविण्याचा प्रयत्न करीत आहेत; हे खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा चीनच्या प्रवक्त्यांनी दिला. यावेळी चीनने अमेरिकेच्या संयुक्त राष्ट्रसंघातील दूतांनी तैवानच्या प्रतिनिधींना दिलेल्या भेटीवरही नाराजी व्यक्त केली.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info