९/११ स्मृतिदिनाच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेला असलेला दहशतवादी हल्ल्यांचा धोका वाढला

दहशतवादी हल्ल्यांचा धोका

वॉशिंग्टन/लंडन – शनिवारी अमेरिकेवर झालेल्या ९/११च्या हल्ल्याला २० वर्षे पूर्ण होत असतानाच दहशतवादी हल्ल्यांचा धोका वाढला आहे. अफगाणिस्तानवर तालिबानने ताबा मिळविल्यानंतर ‘अल कायदा’ व ‘आयएस’सारख्या दहशतवादी संघटनांना पुन्हा बळ मिळत असल्याचे मानले जाते. ब्रिटीश गुप्तचर यंत्रणा ‘एमआय५’च्या प्रमुखांनी ‘अल कायदा स्टाईल’ दहशतवादी हल्ल्यांचा धोका वाढल्याचा इशारा दिला आहे. तर गेल्या महिन्यात अफगाणिस्तानातून ‘अल कायदा’ संपल्याचा दावा करणारे अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी, ‘नॅशनल टेररिझम इमर्जन्सी डिक्लरेशन’ लागू केले असून हल्ल्यांचा धोका कायम असल्याची कबुली दिली आहे.

अमेरिकेवरील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला ठरलेल्या ९/११च्या हल्ल्याला शनिवारी दोन दशके पूर्ण झाली. या पार्श्‍वभूमीवर शुक्रवारी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी अमेरिकी जनतेला उद्देशून केलेल्या भाषणाचा व्हिडिओ प्रदर्शित करण्यात आला. यात राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी ९/११च्या दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्यांना आदरांजली वाहतानाच, त्यानंतर देशाला सावरण्यासाठी योगदान देणार्‍या प्रत्येकाचे आभार मानले. ९/११च्या हल्ल्यानंतर अमेरिकेत दिसून आलेली राष्ट्रीय एकजुटीची भावना सर्वात महत्त्वाची असून, माझ्यासाठी तोच हल्ल्यातून मिळालेला धडा असल्याचे बायडेन म्हणाले.

दहशतवादी हल्ल्यांचा धोका

शनिवारी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी, ९/११च्या हल्ल्याचे लक्ष्य ठरलेल्या न्यूयॉर्क, पेनसिल्व्हेनिया व संरक्षण मुख्यालय ‘पेंटॅगॉन’ला भेट दिली. न्यूयॉर्कमध्ये झालेल्या कार्यक्रमादरम्यान त्यांच्याबरोबर अमेरिकेचे दोन माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा व बिल क्लिंटनही उपस्थित होते. राष्ट्राध्यक्ष बायडेन ९/११ हल्ल्याच्या स्मृतिस्थळाला भेट देत असतानाच अमेरिकेसह पाश्‍चात्य देशांवर पुन्हा दहशतवादी हल्ले होण्याचा धोका वाढल्याचे समोर येत आहे.

राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी गेल्या महिन्यात अफगाणिस्तानमधील माघारीचे समर्थन करताना, ‘अल कायदा’ संपल्याचा दावा केला होता. मात्र ९/११ च्या स्मृतिदिनाला दोन दिवस असतानाच बायडेन यांनी अल कायदासह इतर दहशतवादी संघटनांकडून हल्ल्याचा धोका कायम असल्याची कबुली दिल्याचे उघड होत आहे. बायडेन यांनी दहशतवादी हल्ल्यांविरोधातील आणीबाणी कायम ठेवणारा आदेश जारी केला आहे. दहशतवादाचा धोका कायम असल्यामुळेच आपण आणीबाणी कायम ठेवण्याचा निर्णय घेत असल्याचे सांगून बायडेन यांनी, ‘नॅशनल टेररिझम इमर्जन्सी डिक्लरेशन’ लागू करीत असल्याचे जाहीर केले.

दहशतवादी हल्ल्यांचा धोका

अमेरिकेचा मित्रदेश असणार्‍या ब्रिटनच्या गुप्तचर प्रमुखांनीही दहशतवादी हल्ल्याचा धोका कायम असल्याचा इशारा दिला आहे. ‘एमआय५’चे प्रमुख केन मॅक्कॉलम यांनी, अफगाणिस्तानातील तालिबानच्या राजवटीने कट्टरपंथिय व दहशतवादी गटांना बळ मिळाल्याचा दावा केला आहे. नजिकच्या काळात पाश्‍चात्य देशांवर ‘अल कायदा स्टाईल’ दहशतवादी हल्ले होण्याचा धोका वाढला आहे, असेही मॅक्कॉलम यांनी बजावले. तालिबानला मिळालेल्या सत्तेमुळे दहशतवादी गटांचे धैर्य अधिक वाढल्याचेही ब्रिटीश गुप्तचर प्रमुखांनी आपल्या इशार्‍यात म्हंटले आहे.

गेल्या काही दिवसात अमेरिका तसेच ब्रिटनमधील अनेक विश्‍लेषक व अधिकार्‍यांकडून दहशतवादी हल्ल्याचा धोका वाढल्याचे इशारे देण्यात येत आहेत. ९/११ हल्ल्याच्या स्मृतिदिनाच्या पार्श्‍वभूमीवर ही बाब लक्ष वेधून घेणारी ठरते.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info