मॉस्को – ध्वनीच्या दसपट वेगवान असलेल्या ‘किंझाल’(डॅगर) या नव्या हायपरसोनिक क्षेपणास्त्राची चाचणी करून रशियाने पुन्हा एकदा जगभरात खळबळ माजविली. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या स्फोटक विधानांच्या पार्श्वभूमीवर रशियाने केलेली ही चाचणी लक्षवेधी ठरते. ‘किंझाल’ क्षेपणास्त्राची चाचणी करून रशियन राष्ट्राध्यक्षांनी आपण तिसरे महायुद्ध छेडू शकतो, हे सार्या जगाला दाखवून दिले आहे, असा दावा ब्रिटनच्या एका दैनिकाने केला आहे.
रविवारी रशियाने ‘किंझाल’(डॅगर) या नव्या हायपरसोनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली. ‘मिग-३१’ या ‘सुपरसॉनिक इंटरसेप्टर’ लढाऊ विमानातून ‘किंझाल’ची चाचणी करण्यात आली असून त्याचा वेग ध्वनीच्या तब्बल १० पट असल्याचा दावा करण्यात आला आहे.
रशियाच्या साऊथ मिलिटरी ड्रिस्ट्रिक्टमधून मिग-३१ लढाऊ विमानाने हाय प्रिसिजन किंझाल क्षेपणास्त्र यंत्रणेची चाचणी घेतली. योजनेप्रमाणे चाचणी पार पडली व लक्ष्य अचूक भेदण्यात क्षेपणास्त्र यशस्वी ठरले. किंझाल क्षेपणास्त्र यंत्रणेने सर्व निकष पूर्ण केले’, अशा शब्दात रशियन संरक्षण मंत्रालयाने हायपरसोनिक क्षेपणास्त्र चाचणीची माहिती दिली. ‘किंझाल हायपरसोनिक मिसाईल’चा वेग प्रति तास १२ हजार ३९० किलोमीटरहून जास्त असून क्षेपणास्त्राने दोन हजार किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावरील लक्ष्य भेदल्याचा दावा करण्यात आला आहे.
‘किंझाल’ क्षेपणास्त्राच्या चाचणीचा व्हिडिओ प्रदर्शित करण्यात आला असून त्यात वैमानिक ‘मिग-३१’मध्ये चढण्याची तसेच क्षेपणास्त्र डागण्याची दृश्ये आहेत. रविवारी चाचणी घेण्यापूर्वी ‘मिग-३१’ने ‘किंझाल’ क्षेपणास्त्रासह जवळपास २५० वेळा उड्डाण केल्याची माहितीही रशियन संरक्षण मंत्रालयाने दिली. चाचणी घेण्यापूर्वीच सदर क्षेपणास्त्र रशियाच्या ‘साऊथ मिलिटरी डिस्ट्रिक्ट’मध्ये तैनात असणार्या ‘मिग-३१’ पथकात सामील करण्यात आले आहे. ‘किंझाल हायपरसोनिक मिसाईल’ ‘क्षेपणास्त्रभेदी यंत्रणां’ना गुंगारा देऊन जमीन तसेच सागरी क्षेत्रातील लक्ष्ये भेदू शकते, असा दावाही रशियाने केला आहे.
आपल्या आधीच्या भाषणात ‘किंझाल’ क्षेपणास्त्राबद्दल बोलताना राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी हे सर्वोत्तम शस्त्र असल्याचा दावा केला होता. तसेच हे क्षेपणास्त्र रशियाच्या दक्षिणेकडे तैनात करण्यात आले आहे, असेही राष्ट्राध्यक्ष पुतिन म्हणाले होते. ‘रशियाने आजवर उपस्थित केलेले मुद्दे व आक्षेप याकडे पाश्चिमात्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केले. पण आता मात्र त्यांना रशियाचे ऐकावेच लागेल’, असे सांगून राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी रशियाच्या अतिप्रगत क्षेपणास्त्रांच्या क्षमतेवर विश्वास व्यक्त केला.
दरम्यान, ‘किंझाल’ची चाचणी करून रशियन राष्ट्राध्यक्षांनी आपण तिसरे महायुद्ध छेडण्यास तयार असल्याचा ‘संदेश’ सार्या जगाला दिल्याचा दावा ‘डेलि मेल’ नावाच्या ब्रिटनच्या दैनिकाने केला आहे.
(Courtesy: www.newscast-pratyaksha.com)