तिसरे महायुद्ध भडकल्यास अंतराळातील तळ मानवी जीवन सुरक्षित राखतील – उद्योजक एलॉन मस्क यांचा दावा

तिसरे महायुद्ध भडकल्यास अंतराळातील तळ मानवी जीवन सुरक्षित राखतील – उद्योजक एलॉन मस्क यांचा दावा

ऑस्टिन(टेक्सास) – तिसर्‍या महायुद्धामुळे पृथ्वीवर पुन्हा एकदा ‘अंधारयुग’ येण्याची शक्यता आहे. असे घडल्यास, पृथ्वीवर पुन्हा मानवी जीवनाची सुरुवात करण्यास चंद्र तसेच मंगळावरील तळ महत्त्वाची भूमिका बजावतील, असा दावा जगातील आघाडीचे उद्योजक आणि ‘टेसला’ व ‘स्पेसेक्स’ कंपनीचे प्रमुख एलॉन मस्क यांनी केला. अमेरिकेतील टेक्सास राज्यात झालेल्या एका कार्यक्रमात मस्क यांनी हा दावा करतानाच मानवाला मंगळावर पोहोचविणारी अंतराळयाने पुढील वर्षी सज्ज असतील, अशी ग्वाहीदेखील दिली.

‘जर तिसरे महायुद्ध भडकले तर त्यानंतर पृथ्वीवर पुन्हा एकदा अंधारयुग येण्याची शक्यता आहे. या अंधारयुगानंतर पृथ्वीवर पुन्हा एकदा मानवी जीवनाची सुरुवात करायची असेल तर त्याचे आवश्यक व पुरेसे बीज दुसर्‍या कोणत्या तरी जागी तयार असणे गरजेचे आहे. त्यामुळे अंधारयुगाचा कालावधी कमी होण्यास सहाय्य होईल. अशा परिस्थितीत चंद्रावर तसेच मंगळावर मानवी तळ असणे महत्त्वाचे ठरणार असून हे तळ कदाचित पृथ्वीवर पुन्हा एकदा मानवी जीवनाची नवी सुरूवात करण्यासाठी अत्यंत मोलाची भूमिका बजावू शकतील’, असा दावा आघाडीचे उद्योजक एलॉन मस्क यांनी केला.

अमेरिकेतील टेक्सास राज्यातील ऑस्टिन शहरात ‘एसएक्सएसडब्ल्यू कॉन्फरन्स’ सुरू असून यादरम्यान झालेल्या एका कार्यक्रमात मस्क यांनी अंतराळक्षेत्रातील योजना व पृथ्वीचे भवितव्य याबाबतची आपली मते व्यक्त केली. अंतराळक्षेत्रातील आघाडीची खाजगी कंपनी म्हणून ओळखण्यात येणार्‍या ‘स्पेसेक्स’ या कंपनीचे प्रमुख असणार्‍या एलॉन मस्क यांनी गेल्या वर्षीच चंद्रावर मानवी वस्तीचा समावेश असणारा ‘मून बेस अल्फा’ व मंगळावरील मानवी वस्तीची योजना असणारा ‘मार्स सिटी प्लॅन’ यांची घोषणा केली होती.

या मुद्यावर बोलताना त्यांनी पुढील वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यातच ‘स्पेसेक्स’ची ‘इंटरप्लॅनेटरी’ प्रकारातील अंतराळयाने तयार होतील व त्यामुळे दोन ग्रहांमधील प्रवासाचा अवधी खूपच कमी होईल, अशी ग्वाही दिली. मंगळावर जाण्याचा सुरुवातीचा खर्च थोडा जास्त असला तरी कालांतराने तो कमी होऊ शकतो, असा दावाही मस्क यांनी केला. त्याचवेळी मंगळावर जाणारे पहिले मानवी पथक मोठा धोका पत्करणारे असेल, असे संकेतही एलॉन मस्क यांनी दिले.