हैफा – ‘इस्रायलच्या सुरक्षेसाठी हा युद्धसराव सुरू असून तशी परिस्थिती निर्माण झाली तर अमेरिकेचे सैनिक इस्रायलसाठी आपल्या प्राणाची आहुती देताना कचरणार नाहीत’, असे अमेरिकेच्या युरोपियन कमांडच्या वरिष्ठ अधिकार्याने म्हटले आहे. आखातातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि इस्रायलच्या लष्करात ‘जुनीपर कोब्रा’ युद्धसराव सुरू झाला असून त्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या अधिकार्याने ही घोषणा केली. आखातातील तणाव वाढत असताना अमेरिका व इस्रायली संरक्षणदलांचा हा संयुक्त युद्धसराव म्हणजे सिरिया, हिजबुल्ला व पॅलेस्टाईन अशा तिन्ही आघाड्यांवरील संघर्षाची तयारी असल्याचे दावे केले जात आहेत.
‘जुनीपर कोब्रा’ युद्धसरावात दोन्ही देशांचे सुमारे ४५०० सैनिक, दोन युद्धनौका आणि २५ लढाऊ विमाने सहभागी झाली आहेत. अमेरिकेची ‘युएसएस आयोवा जिमा’ ही ऍम्फिबियस युद्धनौका इस्रायलच्या सागरीक्षेत्रात तर ‘युएसएस माऊंट व्हिटनी’ युद्धनौका इस्रायलच्या हैफा बंदरात तैनात आहे. तर अमेरिकेची पॅट्रियॉट, एजिस, थाड आणि ‘टीपीवाय-२’ या क्षेपणास्त्रभेदी यंत्रणा इस्रायलच्या अश्दोद शहरातील ‘हत्झोर तळा’वर तैनात केल्या आहेत. तर इस्रायलची आयर्न डोम, ऍरो तसेच ‘डेव्हिडस् स्लिंग’ या क्षेपणास्त्रभेदी यंत्रणाही सदर युद्धसरावात धडाडणार आहेत. गेल्या वर्षी कार्यरत झालेली ‘डेव्हिडस् स्लिंग’ यंत्रणा या युद्धसरावाच्या निमित्ताने पहिल्यांदाच वापरली जाणार आहे.
इस्रायलच्या दक्षिण तसेच उत्तर सीमेवर लघू आणि मध्यम पल्ल्याच्या रॉकेटस्, क्षेपणास्त्रांचे हल्ले झाले तर त्यांचा सामना कसा करायचा, याचा अभ्यास या युद्धसरावात केला जाणार असल्याची माहिती या युद्धसरावाचे नेतृत्व करणारे इस्रायली अधिकारी ब्रिगेडिअर जनरल ‘झिविका हैमोविच’ यांनी दिली. या अनुभवाचा फायदा इस्रायली लष्कर तसेच हवाईदलाला भविष्यातील युद्धासाठी होईल, असा दावा ब्रिगेडिअर जनरल हैमोविच यांनी केला. ‘आपल्या शत्रूंचा सामना करण्यासाठी इस्रायलकडे सामर्थ्य आहेच. पण अमेरिकेच्या लष्करामुळे इस्रायलचे हे सामर्थ्य अधिकच वाढले आहे’, असे इस्रायली अधिकारी पुढे म्हणाले. हैमोविच यांच्याकडे इस्रायलच्या हवाईसुरक्षा विभागाचे प्रमुखपद असून ते या युद्धसरावाचे नेतृत्त्व करणार आहेत.
या युद्धसरावात अमेरिकी लष्कराचे नेतृत्त्व करणार्या लेफ्टनंट जनरल ‘रिचर्ड क्लार्क’ यांनी अमेरिका व इस्रायलमधील लष्करी सहकार्याचे महत्त्व अधोरेखित केले. दोन्ही देशांमध्ये झालेल्या कराराप्रमाणे अमेरिकेचे लष्कर इस्रायलच्या सुरक्षेसाठी तैनात केले जाईल. या युद्धसरावानंतर इस्रायलमध्ये तैनात असणार्या अमेरिकी सैनिकांची हीच जबाबदारी असेल. युद्ध झाल्यास इस्रायलच्या सुरक्षेसाठी अमेरिकन सैनिक इस्रायलसाठी आपल्या प्राणांचीही पर्वा करणार नाहीत, असे लेफ्टनंट जनरल क्लार्क यांनी म्हटले आहे.
गेल्या गुरुवारपासून सुरू झालेला हा युद्धसराव १५ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. पण त्यानंतरही अमेरिकेचे सैनिक मार्च महिन्याच्या अखेरीपर्यंत इस्रायलमध्ये तैनात असतील, अशी माहिती हैमोविच यांनी दिली. सदर युद्धसराव इस्रायलसमोरील धोक्यांविरोधात असल्याचे सांगून हैमोविच यांनी इराण, हिजबुल्लाह आणि हमासचा थेट उल्लेख टाळला. पण सदर युद्धसराव ‘स्टेट अँड नॉन स्टेट ऍक्टर्स’विरोधात असल्याचे सूचक विधान हैमोविच यांनी केले आहे. त्यामुळे हे स्टेट व नॉन स्टेट ऍक्टर्स म्हणजे सिरिया, हिजबुल्लाह व हमास असल्याचा दावा इस्रायली माध्यमांकडून केला जात आहे.
(Courtesy: www.newscast-pratyaksha.com)