मॉस्को/लंडन – ‘कुणीही अण्वस्त्रसज्ज रशियाला धमकावू नये’, अशा जळजळीत शब्दात रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या ‘मारिया झाखारोव्हा’ यांनी ब्रिटनला प्रत्युत्तर दिले. रशियाच्या माजी हेरावर ब्रिटनमध्ये झालेल्या विषप्रयोगाबाबत रशियाने योग्य तो खुलासा दिला नाही, तर त्याचे गंभीर परिणाम होतील, असा इशारा ब्रिटनच्या पंतप्रधानांनी दिला होता. त्याला उत्तर देताना रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या देशाकडे असलेल्या आण्विक क्षमतेची आठवण ब्रिटनला करून दिली आहे.
रशियाचा माजी हेर ‘सर्जेई स्क्रिपल’ व त्याच्या मुलीवर ब्रिटनमध्ये झालेल्या विषप्रयोगात, रशियाने विकसित केलेल्या लष्करी दर्जाच्या नर्व्ह एजंटचा वापर झाल्याचे सांगून यामागे रशियाचा हात असल्याचा संशय ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी व्यक्त केला होता. रशियाने मंगळवारी रात्रीपर्यंत स्पष्टीकरण न दिल्यास ब्रिटन आक्रमक कारवाईची घोषणा करेल, असा इशाराही पंतप्रधान मे यांनी दिला होता. त्यावर रशियाची तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे.
रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लाव्हरोव्ह यांनी, ‘स्क्रिपल विषप्रयोग प्रकरणा’त रशियाचा हात नसल्याचे स्पष्ट केले होते. रशियाच्या काही अधिकार्यांनी तसेच नेत्यांनी ‘स्क्रिपल’ यांच्यावरील विषप्रयोगाचा फायदा ब्रिटनलाच होणार असून त्यामागे ब्रिटीश यंत्रणांचा हात असू शकतो, असा दावा केला होता. या मुद्यावर आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी रशियाने ब्रिटनच्या रशियातील राजदूतांना समन्स धाडून समज दिल्याचेही उघड झाले होते. त्यानंतर रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या झाखारोव्हा यांनी अधिक आक्रमक भूमिका घेऊन ब्रिटनला प्रत्युत्तर दिले.
रशियाच्या अण्वस्त्रसज्ज असण्याची आठवण करून दिल्यानंतर रशियाकडूनही ब्रिटनवर कारवाई केली जाऊ शकते, असा इशारा रशियन अधिकार्यांनी दिला. रशियाच्या ब्रिटनमधील दूतावासाने काही ‘ट्विट्स’ प्रसिध्द केले असून त्यात ब्रिटनची भूमिका चिथावणीखोर असल्याचा आरोप केला आहे. त्याचवेळी ब्रिटनमध्ये घडलेली घटना व त्यावरून देण्यात आलेला इशारा हा रशियाची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न असल्याचा दावाही केला.
रशिया आण्विक धमकी देत असतानाच ब्रिटनने आंतरराष्ट्रीय स्तरावरील हालचालींना वेग दिला आहे. ब्रिटीश पंतप्रधान थेरेसा मे यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी संपर्क साधून या मुद्यावर त्यांचे समर्थन मिळविल्याचा दावा ब्रिटनने केला. त्याचवेळी बुधवारी स्क्रिपल प्रकरण ‘संयुक्त राष्ट्रसंघ’ तसेच ‘नाटो’च्या विशेष बैठकीत उपस्थित करण्यात येईल, असेही ब्रिटनने स्पष्ट केले.
रशियन सरकारकडून चालविण्यात येणार्या ‘आरटी’ या वृत्तवाहिनीचा ब्रिटनमधील परवाना रद्द केला, तर रशियामधील सर्व ब्रिटीश प्रसारमाध्यमे व पत्रकारांची हकालपट्टी करण्यात येईल, असा इशारा रशियाने दिला आहे. रशियन हेराच्या विषप्रयोगाच्या घटनेवरून ब्रिटनने रशियाविरोधात आक्रमक कारवाईचे संकेत दिले असून त्याअंतर्गत ब्रिटनमधील ‘आरटी’चा परवाना रद्द करण्याचाही प्रस्ताव आहे. ब्रिटनमधील ‘ऑफकॉम’ या यंत्रणेने ‘आरटी’ला याबाबत नोटीस दिल्याची माहिती प्रसिद्ध झाली आहे.
(Courtesy: www.newscast-pratyaksha.com)