वॉशिंग्टन – ‘सौदी अरेबियाला अणुबॉम्ब नको. पण जर इराणने अणुबॉम्ब तयार केला, तर मात्र सौदी देखील अणुबॉम्ब विकसित केल्यावाचून राहणार नाही’, असे सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी बजावले. प्रिन्स मोहम्मद लवकरच अमेरिकेला भेट देणार असून त्याच्या आधी अमेरिकी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी या इशार्याद्वारे अमेरिकेसह जगाला संदेश दिल्याचे दिसत आहे.
सौदीचे क्राऊन प्रिन्स आणि संरक्षणमंत्री प्रिन्स मोहम्मद यांनी अमेरिकन वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीचा पहिला भाग गुरुवारी प्रसिद्ध झाला. यामध्ये प्रिन्स मोहम्मद यांनी सौदी उभारीत असलेल्या अणुप्रकल्पांचे समर्थन केले. जगातील सर्वात मोठा इंधन उत्पादक देश असलेल्या सौदीने अणुऊर्जा निर्मितीची घोषणा केली असून या अणुप्रकल्पांचा वापर नागरी वापरासाठी करण्यात येईल, असे प्रिन्स मोहम्मद यांनी स्पष्ट केले.
या अणुप्रकल्पांच्या आड सौदीला अणुबॉम्ब तयार करायचा नाही. पण इराणने अणुबॉम्ब तयार केला तर सौदीही अणुबॉम्ब विकसित करील, असा सज्जड इशारा प्रिन्स मोहम्मद यांनी दिला. सौदीमध्ये अणुप्रकल्प उभारण्यासाठी अमेरिका, फ्रान्स, दक्षिण कोरिया या मित्रदेशांनी निविदा सादर केल्या आहेत. रशिया आणि चीन देखील सौदीला अणुप्रकल्प उभारून देण्यासाठी उत्सुक आहेत. मात्र सौदीने या निविदांबाबतचा निर्णय राखून ठेवला आहे.
इराणला अणुबॉम्बची धमकी दिल्यानंतर प्रिन्स मोहम्मद यांनी इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते आयातुल्ला खामेनी यांची तुलना जर्मनीचा हुकूमशहा अॅडॉल्फ हिटलरशी केली. ‘दुसर्या महायुद्धात हिटलरने लष्करी सामर्थ्याच्या जोरावर युरोपिय देशांवर वर्चस्व प्रस्थापित करण्यास सुरुवात केली तोपर्यंत युरोपमधील बहुतांश देशांना हिटलरच्या या महत्त्वाकांक्षेची जाणीव झाली नव्हती. अगदी त्याचप्रकारे इराण देखील आखातात आपले वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. पण सौदी आखातावर तशी परिस्थिती ओढावू देणार नाही’, असे सांगून प्रिन्स मोहम्मद यांनी इराणचे कारस्थान हाणून टाकण्याचा निर्धार या मुलाखतीत केला.
प्रिन्स मोहम्मद यांच्या या इशार्यावर इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून प्रतिक्रिया उमटली आहे. ‘प्रिन्स मोहम्मद यांचा मेंदू भ्रामक कल्पनांनी भरलेला असून त्यातून फक्त विद्वेष आणि खोटारडेपणाच बाहेर निघत असतो. त्यामुळे प्रिन्स मोहम्मद यांच्या शब्दांना अर्थ नाही’, अशी टीका इराणच्या परराष्ट्रमंत्रालयाचे प्रवक्ते बाहराम घासेमी यांनी केली.
याआधीही सौदीच्या प्रिन्स मोहम्मद यांनी इराणवर अशाच स्वरुपाचे आरोप केले होते. इराणनेही त्यांच्या या आरोपांकडे गंभीरपणे पाहण्याची आवश्यकता नसल्याचा दावा केला होता. पण गेल्या काही महिन्यांपासून सौदी व इराणमधील या आरोप व प्रत्यारोपांच्या तीव्रतेत वाढ झाल्याचे दिसू लागले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणबरोबर केलेला अणुकरार मोडीत काढण्याचा सुस्पष्ट इशारा दिला असून या कराराच्या बाजूने भूमिका घेणारे परराष्ट्रमंत्री टिलरसन यांना हटविले आहे. या घडामोडी सुरू असताना, सौदी अरेबियाने आपली इराणविषयक भूमिका अधिकच कठोर केली असून सौदीचे नेते आखातातील अस्थैर्य, दहशतवाद व कट्टरपंथीयांच्या वाढीमागे इराणचा हात असल्याचा आरोप अधिक प्रखरतेने करीत आहेत.
(Courtesy: www.newscast-pratyaksha.com)