रशियाच्या आण्विक पाणबुडीची अमेरिकन तळापर्यंत धडक रशियाच्या वृत्तवाहिनीचा दावा

रशियाच्या आण्विक पाणबुडीची अमेरिकन तळापर्यंत धडक रशियाच्या वृत्तवाहिनीचा दावा

मॉस्को – रशियाची आण्विक पाणबुडी अमेरिकन लष्करी तळाच्या जवळ पोहोचली आणि अमेरिकेच्या प्रगत यंत्रणांना याचा थांगपत्ता लागू शकला नाही, अशी घोषणा रशियन वृत्तवाहिनीने केली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन अमेरिकेला रशियाच्या मारक क्षमतेची आठवण करून रशियाकडे सारे जग भस्मसात करण्याची क्षमता असल्याच्या धमक्या देत आहेत. तर अमेरिकेचे वरिष्ठ लष्करी अधिकारी आपला देश कुठल्याही आव्हानाचा सामना करण्यासाठी सज्ज असल्याचे प्रत्युत्तर देत आहेत. अशा परिस्थितीत रशियन लष्कराशी निगडित असलेल्या या वृत्तवाहिनीने रशियाची आण्विक पाणबुडी अमेरिकेच्या किनारपट्टीपर्यंत जाऊन आल्याचे वृत्त दाखवून खळबळ माजविली आहे.

रशियन नौदलाच्या ताफ्यातील अकूला श्रेणीतील ‘शहुका-बी’ ही आण्विक पाणबुडी अमेरिकेच्या लष्करी तळाच्या अगदी समीप पोहोचली होती. रशियन नौदलाने केलेल्या सागरी सरावाचा भाग म्हणून ही पाणबुडी या ठिकाणी तैनात करण्यात आली होती. या पाणबुडीचा वेध अमेरिकन यंत्रणांना घेता आला नाही, या अपयशाकडे रशियाच्या वृत्तवाहिनीने लक्ष वेधले. आपल्या पाणबुडीच्या या क्षमतेची चाचणी घेणे हा या युद्धसरावाचा महत्त्वाचा भाग असल्याचे सदर वृत्तवाहिनीवर बोलताना रशियन नौदलाचे अधिकारी सर्जेई स्टारशिनोव्ह यांनी दिली. ही चाचणी झाल्यानंतर रशियन पाणबुडी माघारी फिरली असे या अधिकार्‍याने म्हटले आहे. मात्र रशियाची ही पाणबुडी अमेरिकेच्या नक्की कोणत्या लष्करी तळाजवळ किंवा कुठल्या किनारपट्टीवर दाखल झाली होती, याबाबतची माहिती उघड करण्यात आलेली नाही.

गेल्या काही दिवसांपासून रशिया व अमेरिका परस्परांना आपापल्या लष्करी क्षमतेचा दाखला देऊन इशारे देत आहेत. रशियन क्षेपणास्त्रांच्या मार्‍यापासून कुठलाही देश सुरक्षित नाही, असे रशियन राष्ट्राध्यक्षांनी काही दिवसांपूर्वीच अमेरिकेला बजावले होते. तर रशियाची क्षमता आम्हाला ठाऊक असून अमेरिका कुठल्याही धोक्याचा सामना करण्यासाठी सज्ज आहे, असे अमेरिकेच्या स्ट्रॅटेजिक कमांडचे चीफ जनरल जॉन हायटेन यांनी म्हटले होते. पण अमेरिकेला थांगपत्ता लागू न देता रशियन पाणबुडी अमेरिकेच्या लष्करी तळापर्यंत धडक मारू शकते, हा संदेश रशियाच्या लष्करी वृत्तवाहिनीने दिला आहे. हा रशियाकडून अमेरिकेला देण्यात आलेला आणखी एक महत्त्वाचा इशारा ठरतो.

काही आठवड्यांपूर्वी रशियाचे बॉम्बर विमान अमेरिकेच्या कॅलिफोर्नियापर्यंत पोहोचल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर रशियन पाणबुडीबाबतची ही माहिती समोर आल्यानंतर त्याची अमेरिकेत जोरदार चर्चा अपेक्षित आहे. रशियाचे लष्करी सामर्थ्य प्रचंड प्रमाणात वाढल्याचा दावा काही अमेरिकी विश्‍लेषक करीत आहेत. यापासून अमेरिकेच्या सुरक्षाविषयक हितसंबंधांना धोका निर्माण झाल्याचा दावाही या विश्‍लेषकांनी केला आहे. अशा परिस्थितीत रशियन लष्करी वाहिनीने दिलेली ही माहिती अमेरिकेत खळबळ माजवण्याची दाट शक्यता असून या प्रकरणी ट्रम्प प्रशासनाला खुलासा द्यावा लागेल, अशी चिन्हे दिसत आहेत.