सर्जेई स्क्रिपल प्रकरणी ब्रिटन, अमेरिका, फ्रान्स व जर्मनीचे रशियावर गंभीर आरोप

सर्जेई स्क्रिपल प्रकरणी ब्रिटन, अमेरिका, फ्रान्स व जर्मनीचे रशियावर गंभीर आरोप

ब्रुसेल्स – रशियाचा माजी हेर असलेल्या सर्जेई स्क्रिपल याच्यावर लंडनमध्ये विषप्रयोग करून रशियानेच त्याला संपविल्याचा आरोप ब्रिटनने केला होता. ब्रिटनचा हा आरोप अमेरिकेने उचलून धरला असून या प्रकरणी ब्रिटनला संपूर्ण पाठिंबा घोषित केला. त्याच्या पाठोपाठ फ्रान्स व जर्मनी या देशांनीही ब्रिटनची बाजू घेऊन याबाबत रशियावर आरोप केले आहेत. ब्रिटनसह, अमेरिका, फ्रान्स व जर्मनीने या प्रकरणी संयुक्त निवेदन प्रसिद्ध केले असून रशियाला धारेवर धरले आहे.

‘सर्जेई स्क्रिपल याला व त्याच्या मुलीला संपविण्यासाठी ‘नर्व्ह गॅस’चा वापर झाला. हा वापर एखाद्या देशाकडूनच केला जाऊ शकतो. दुसर्‍या महायुद्धानंतरच्या काळात युरोपमध्ये झालेला हा अशाप्रकारचा पहिला हल्ला आहे. यामुळे सर्वच देशांची सुरक्षा धोक्यात आल्याचे दिसत आहे’, असे सांगून ब्रुसेल्समध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या या संयुक्त निवेदनात ब्रिटन, अमेरिका, फ्रान्स व जर्मनीने त्यावर तीव्र चिंता व्यक्त केली. याबाबत ब्रिटनने रशियावर केलेला आरोप योग्यच असून या हल्ल्याबाबतचे दुसरे स्पष्टीकरण असूच शकत नाही, असेही या निवेदनात ठामपणे नमूद करण्यात आले आहे.

याआधी अमेरिकेच्या संयुक्त राष्ट्रसंघातील राजदूत निक्की हॅले यांनी रशियाने केलेल्या या विषप्रयोगामुळे सर्वच देशांची सुरक्षा धोक्यात आल्याचा ठपका ठेवला होता. तसेच या प्रकरणी रशियावर कडक कारवाई करण्याची आवश्यकता असल्याचे सांगून हॅले यांनी त्यासाठी सुरक्षा परिषदेच्या सर्वच देशांना आवाहन केले होते. त्यानंतर फ्रान्स व जर्मनी या युरोपातील अतिशय महत्त्वाच्या देशांनीही ब्रिटन व अमेरिकेचे म्हणणे मान्य करून रशियाच्या विरोधात कडक भूमिका घेतली आहे. दरम्यान, ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी युरोपिय देशांनी रशियाकडून खरेदी केल्या जाणार्‍या इंधनात कपात करावी, अशी मागणी केली होती. यावर रशियाकडून प्रतिक्रिया आली आहे.

ब्रिटनच्या पंतप्रधानांनी केलेली ही मागणी राजकीय असल्याचे सांगून यामागे रशियाविरोधी राजकारण असल्याचा आरोप रशियन ऊर्जामंत्री अलेक्झँडर नोव्हॅक यांनी केला आहे. प्रत्येक देशाला आपले ऊर्जाविषयक धोरण राबविण्याचा अधिकार आहे आणि त्यात कुणीही ढवळाढवळ करता कामा नये, अशी अपेक्षा नोव्हॅक यांनी व्यक्त केली.

 प्रिन्स चार्ल्स यांची ‘एमआय५’ला भेट

लंडन – सर्जेई स्क्रिपल याच्यावरील विषप्रयोगावरून ब्रिटन व रशियामध्ये कमालीचा तणाव निर्माण झालेला असताना, ब्रिटनचे राजपुत्र प्रिन्स चार्ल्स यांनी ब्रिटनची गुप्तचर संस्था ‘एमआय५’ च्या मुख्यालयाला भेट दिली. या भेटीची बातमी ब्रिटनच्या माध्यमांनी उचलून धरली आहे.

ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी स्क्रिपल प्रकरणी रशियाने योग्य तो खुलासा न दिल्यास, त्याचे परिणाम भोगावे लागतील, असे रशियाला बजावले होते. मात्र आण्विक क्षमता असलेल्या देशाला कुणीही धमकावू शकत नाही, असे सांगून रशियाने ब्रिटनच्या पंतप्रधानांनी दिलेला इशारा धुडकावला होता.

यामुळे ब्रिटन व रशिया थेट युद्धाच्या उंबरठ्यावर असून कुठल्याही क्षणी दोन देशांमधील संघर्ष पेट घेऊ शकतो, असा दावा केला जातो. या परिस्थितीत ब्रिटनची गुप्तचर संस्था ‘एमआय5’च्या मुख्यालयाला प्रिन्स चार्ल्स यांनी दिलेली भेट अतिशय महत्त्वाची असून यातून फार मोठा संदेश दिला जात असल्याचे ब्रिटनच्या माध्यमांचे म्हणणे आहे.